सध्या संपूर्ण महाराष्ट्रासमोर ‘एल निनो’च्या प्रभावामुळे दुष्काळाचे मोठे संकट उभे राहिले असून राज्यातील जवळपास ९० टक्के भाग दुष्काळाच्या झळा सोसत आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. तसेच आगामी काळात पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. या संकटाचे संधीत रूपांतर करण्यासाठी आणि भविष्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या ‘जलसंचय जनभागीदारी: कॅच द रेन २०२६ (सीटीआर)’ या उपक्रमांतर्गत एक व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्याच्या माध्यमातून राज्यात तब्बल ३४ लाख ८३ हजार ९४० भूजल पुनर्भरण संरचनांची निर्मिती केली जाणार आहे.
राज्याचे वॉटर मॅन देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या विविध महाराष्ट्र जलसंधारण योजना आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्तीच्या उपाययोजनांमुळे मागील कार्यकाळात राज्यातील शेतकऱ्यांना फायदा झाल्याचे दिसून आले. या उपाययोजनांमुळे राज्यातील शेतीला शाश्वत सिंचनाचा भक्कम आधार मिळाला होता. जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या यशस्वी अंमलबजावणीनंतर जलयुक्त शिवार ३.० योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेतल्यामुळे ग्रामीण भागातील पाण्याच्या प्रश्नावर दिलासा मिळणार आहे. लोकसहभागातून राबवला जाणारा महाराष्ट्र दुष्काळमुक्त उपक्रम आणि जलसंधारणाच्या योजनांना लोकचळवळीचे स्वरूप दिले जाणार आहे.
संकटाचे संधीत रूपांतर करणारा कृती आराखडा
केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत नुकतीच याविषयी बैठक झाली. या बैठकीत सदर आराखड्याची दिशा स्पष्ट करण्यात आली. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवून भूजल पातळी वाढवणे, जुन्या जलसंधारण संरचनांचे पुनरुज्जीवन करणे आणि नव्या संरचनांची निर्मिती करणे, हा जलसंचय जनभागीदारी मोहिमेचा मुख्य गाभा आहे. या मोहिमेंतर्गत मे २०२७ पर्यंत संपूर्ण राज्यात ३४ लाख ८३ हजार ९४० भूजल पुनर्भरण संरचनांची निर्मिती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्याची महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार ३.० योजना १८ हजार गावांमध्ये राबवली जाणार आहे. त्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मनरेगा आणि इतर योजनांमधील निधी व कामांची मदत घेतली जाणार आहे. या कामांचे शास्त्रीय पद्धतीने मॅपिंग करून, जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन, तलावांची दुरुस्ती, शेततळी आणि पुनर्भरण खड्ड्यांच्या निर्मितीवर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच या कामांसाठी प्रचलित निकषांच्या पलीकडे जाऊन केंद्र सरकारकडे विशेष आर्थिक मदतीची मागणी राज्य सरकारने केली आहे.
रेनवॉटर हार्वेस्टिंगला बढावा व कोरड्या नद्यांचे पुनरुज्जीवन
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामविकास, वन, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, कृषी आणि पाणीपुरवठा या विभागांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वन विभागामार्फत वनबंधारे आणि वनतळ्यांची निर्मिती केली जाणार आहे; तर सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागामार्फत खासगी घरे व सरकारी इमारतींच्या छतावरील पावसाचे पाणी साठविण्यासाठी रूफटॉप रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. याशिवाय, पावसाळ्यात वाहणाऱ्या आणि नंतर कोरड्या ठाक पडणाऱ्या ५० किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक लांबीच्या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. जलसंधारणासोबतच ‘जल जीवन मिशन’च्या कामांना गती देणाऱ्या धोरणाचा देखील या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. यात पाण्याचा खात्रीशीर स्रोत आणि वीजबिल भरणा या दोन मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर प्रत्येक राज्याच्या भौगोलिक व स्थानिक अडचणी लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे अभ्यास करून राज्यासाठी स्वतंत्र उपाययोजना व नियोजन करण्याची सूचना केली आहे.
लोकचळवळ आणि पुरस्काराच्या माध्यमातून जलक्रांती
कोणतीही जलसंधारण मोहीम लोकसहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही, हे लक्षात घेऊन या अभियानातही लोकांचा सहभाग (जनभागीदारी) वाढवण्यावर भर दिला आहे. यापूर्वी जलयुक्त शिवार आणि वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावागावांत उभी राहिलेली लोकचळवळ अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरावर जलसंधारण पुरस्कार आणि स्पर्धांचे आयोजन करून गावांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण केली जाणार आहे. तसेच, या कामांमध्ये लोकप्रतिनिधींच्या स्थानिक विकास निधीचा उपयोग वाढवण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. मे २०२७ पर्यंत ही सर्व उद्दिष्टे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी प्रशासकीय पातळीवर संबंधित विभागांकडून कामांचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. महाराष्ट्राला जलसमृद्ध आणि दुष्काळमुक्त करण्यासाठी या उपाययोजना निश्चितच मोलाच्या ठरतील.
संबंधित लेख:
