वॉटर मॅन

जलयुक्त शिवार ३.०: १८ हजार गावे जलयुक्त करण्याचा संकल्प

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि राज्यातील पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार योजना’ पुन्हा एकदा युद्धपातळीवर राबविण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन टप्प्यांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर येत्या डिसेंबरपासून योजनेचा तिसरा टप्पा जलयुक्त शिवार ३.० सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १८ हजार गावे जलयुक्त केली जाणार आहेत.

पहिल्या दोन टप्प्यांत ४५ हजारांहून अधिक गावांना लाभ

वॉटर मॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेची सुरूवात डिसेंबर २०१४ मध्ये सुरू झाली होती. पावसाचे पाणी गावाच्या शिवारात जमिनीत मुरवून गावे टंचाईमुक्त करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात (२०१४ ते २०१९) २२ हजार ५९३ गावांमध्ये ६ लाख ३२ हजार ८९६ कामे पूर्ण करण्यात आली. यातून २० हजार ५४४ गावे शंभर टक्के जलयुक्त होऊन मोठ्या प्रमाणात जलसाठा आणि सिंचन क्षमता निर्माण झाली. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत पाणलोट कार्यक्रम न झालेल्या आणि गरज असलेल्या अशा ५ हजार ८५८ हून अधिक गावांमध्ये नाला खोलीकरण, सिमेंट व मातीचे बंधारे, शेततळी आणि जुन्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची १ लाख १० हजारहून अधिक कामे पूर्ण करण्यात आली.

पारदर्शकता व अचूकतेसाठी जीआय मॅपिंगचा वापर

सध्या राज्यासमोर असलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वॉटर मॅन देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित विभागांनी याची तयारी पूर्ण केली आहे. या नवीन टप्प्यात कामातील पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. याच्या अंमलबजावणीत कोणताही गैरव्यवहार होऊ नये, यासाठी जीआय मॅपिंग (GI Mapping) आणि उपग्रह छायाचित्रांची मदत घेतली जाणार आहे. प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी संबंधित ठिकाण जलसंधारणासाठी योग्य आहे की नाही याची शास्त्रीय पद्धतीने तपासणी केली जाणार आहे. तसेच कामाच्या प्रगतीचे अचूक मोजमाप करणेही टेक्नॉलॉजीमुळे शक्य होणार आहे. याशिवाय, पावसाळ्यात वाहणाऱ्या आणि उर्वरित काळात कोरड्या राहणाऱ्या ५० किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक लांबीच्या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, विद्यमान जलसंधारण संरचनांची दुरुस्ती, तलावांचे पुनरुज्जीवन, शेततळी आणि पुनर्भरण खड्ड्यांची निर्मिती यासाठी केंद्र सरकारकडे विशेष आर्थिक मदतीची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या तिसऱ्या टप्प्यामुळे राज्याला दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल ठरणार आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *