महाराष्ट्राच्या पर्यटन आणि पर्यावरण संवर्धनाच्या प्रवासात एक ऐतिहासिक गोष्ट जोडली गेली. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर व गुहागर आणि रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना २०२६-२७ या हंगामासाठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’ मानांकन जाहीर झाले आहे. डेन्मार्क येथील ‘फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन’ या संस्थेमार्फत हा जागतिक सन्मान दिला जातो.

‘ब्लू फ्लॅग’ मानांकन म्हणजे नेमके काय?
राज्यातील समुद्रकिनाऱ्यांना पहिल्यांदाच असा जागतिक दर्जा प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्राने प्रथमच आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग किनाऱ्यांच्या यादीत आपले नाव कोरले आहे. या तिन्ही समुद्र किनाऱ्यांची स्वतःची अशी वेगळी वैशिष्ट्ये आहेत. दापोली तालुक्यातील लाडघर समुद्रकिनारा आपल्या तांबूस वाळू आणि स्वच्छ पर्यावरणासाठी प्रसिद्ध आहे, तर गुहागरचा किनारा सुरुची झाडे, पांढरीशुभ्र वाळू आणि शांत वातावरणासाठी पर्यटकांना भुरळ घालतो. दुसरीकडे, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनारा पर्यटकांची सुरक्षितता आणि उत्तम सुविधांमुळे आता जागतिक नकाशावर पोहोचला आहे. कोणत्याही समुद्रकिनाऱ्याला ब्लू फ्लॅग मिळवण्यासाठी पर्यावरण संवर्धन, पाण्याची शुद्धता, स्वच्छता, जैवविविधतेचे रक्षण, पर्यटकांची सुरक्षा आणि शाश्वत पर्यटन व्यवस्थापन यासारखे आंतरराष्ट्रीय निकष पूर्ण करावे लागतात. राज्य सरकारचे पर्यटन धोरण, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायती, बीच मॅनेजमेंट कमिटी आणि स्थानिक नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे.
देशभरात २०२६-२७ च्या हंगामासाठी एकूण २२ समुद्रकिनाऱ्यांना अशी मान्यता मिळाली आहे. यामध्ये १३ जुन्या किनाऱ्यांचे नूतनीकरण आणि ९ नवीन किनाऱ्यांचा समावेश आहे. नव्या यादीत महाराष्ट्रातील तीन समुद्र किनाऱ्यांना स्थान मिळणे ही राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या किनाऱ्यांचा अधिकृत ब्लू फ्लॅग हंगाम १५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होत असून, त्यानिमित्ताने नेदरलँड्स येथून मागवलेले अधिकृत आंतरराष्ट्रीय ध्वज या किनाऱ्यांवर फडकवले जाणार आहेत.
या जागतिक ओळखीमुळे कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. आगामी काळात राज्याच्या विस्तीर्ण किनारपट्टीवरील इतर पात्र समुद्रकिनाऱ्यांचाही अशाच आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास करण्याचा मानस राज्य सरकारने केला आहे. निसर्गाचे संवर्धन करत शाश्वत पर्यटनाकडे टाकलेले हे पाऊल कोकणच्या विकासासाठी निश्चितच मैलाचा दगड ठरेल.
संबंधित लेख:
