एससी | उत्तम प्रशासक | एसटी

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता: विमुक्त व भटक्या जमातींच्या हक्क व कल्याणासाठी विशेष अभियान

महाराष्ट्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लोकांच्या अनिश्चित व भटक्या जीवनशैलीमुळे सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ तसेच महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज त्यांच्यापर्यंत सहजतेने पोहोचत नाहीत. परिणामी या समुदायातील अनेकांना त्यांचे मूलभूत अधिकार वापरण्यात अडचणी येतात. त्या दूर करून त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळावा, यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ या अभियानांतर्गत राज्यात विशेष ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ वस्तीनिहाय सेवा पंधरवडा राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

भटक्या-विमुक्तांना मुख्य प्रवाहात आणणारा विशेष उपक्रम

‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ या व्यापक अभियानांतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि तालुक्यांमध्ये २७, २८ आणि २९ सप्टेंबर २०२६ या तीन दिवसांत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेनंतर प्रत्येक तीन महिन्यानंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी हे अभियान नियमितपणे राबवले जाणार आहे. या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश विमुक्त व भटक्या जमातींतील नागरिकांना आवश्यक असणारी ओळखपत्रे, सरकारी दाखले आणि विविध योजनांचे लाभ डिजिटल सेवांच्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे. या शिबिराच्या माध्यमातून विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लोकांना महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांचे वितरण केले जाणार आहे.

  • आधार कार्ड
  • निवडणूक ओळखपत्र
  • रेशनकार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • रहिवास दाखला
  • विवाह नोंदणी
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • आयुष्मान भारत कार्ड

याशिवाय श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि पीएम किसान योजना यासारख्या महत्त्वाच्या सरकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांना मिळवून दिला जाणार आहे.

भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान

आत्मसन्मान आणि अधिकारांची हमी

या अभियानाची अंमलबजावणी प्रभावी व जलद व्हावी यासाठी वस्तीनिहाय लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांना आवश्यक असणारी कागदपत्रे बनवून दिली जाणार आहेत. यासाठी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक खासदार-आमदार, इतर लोकप्रतिनिधी आणि भटके-विमुक्त समुदायासाठी कार्यरत असणाऱ्या अशासकीय सेवाभावी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. या उपक्रमामुळे भटक्या-विमुक्त घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना स्थैर्य आणि आत्मसन्मान मिळवून देण्यास मोठी मदत होणार आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *