नाशिक | गुंतवणूक गाथा

नाशिक: विकासाचे नवे ग्रोथ इंजिन आणि जागतिक गुंतवणुकीचे केंद्र

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पावन भूमीत नाशिक आता फक्त धार्मिक आणि अध्यात्मिक केंद्र न राहता महाराष्ट्राच्या विकासाचे एक प्रमुख ग्रोथ इंजिन म्हणून वेगाने पुढे येत आहे. नुकत्याच हॉटेल ताज येथे पार पडलेल्या कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषद २०२६ मध्ये नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला एक नवी दिशा मिळाली. इन्व्हेस्टमेंट पूलर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या परिषदेत ३०० हून अधिक सामंजस्य करार करण्यात आले. नाशिकच्या या गुंतवणूक महाकुंभातून साधारण १३,१९० कोटींचे सामंजस्य करार झाले आहेत. या गुंतवणुकीमुळे आगामी काळात सुमारे ३२ हजार नवीन रोजगार उपलब्ध होणार असून, नाशिकच्या आर्थिक प्रगतीला मोठी चालना मिळणार आहे.

 कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषद २०२६

नाशिकची औद्योगिक झेप पाहता, गेल्या तीन वर्षांत स्थानिक पातळीवर झालेली एकूण ३१,९४५ कोटींची गुंतवणूक ही शहराच्या उद्योगस्नेही वातावरणाची साक्ष देते. राज्य सरकारच्या मैत्री सारख्या एक खिडकी योजनेमुळे आणि पारदर्शक धोरणांमुळे उद्योजकांचा नाशिकवरचा विश्वास वाढला आहे. नाशिकमध्ये औद्योगिक विकासासह पर्यटन विकासावरही भर दिला जात आहे. नाशिक जिल्ह्याच्या विकासात फक्त स्थानिकच नाही, तर दावोस सारख्या जागतिक व्यासपीठावरूनही १२,००० कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र सरकारला यश आले आहे. गेल्या दोन वर्षांत मोठमोठ्या उद्योगांनी नाशिकमध्ये ५७,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. नाशिक हे आता उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक मॅग्नेट म्हणून उदयास येत आहे. विशेष म्हणजे, देशातील एकूण जीसीसींपैकी (ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर्स) २४ टक्के वाटा महाराष्ट्रात आहे आणि नाशिकमध्ये या क्षेत्रासाठी असलेली प्रचंड क्षमता लक्षात घेऊन सरकारकडून याला विशेष प्रोत्साहन दिले जात आहे.

नाशिक गुंतवणूक परिषद २०२६

दहा वर्षात दरडोई उत्पन्नात वाढ

नाशिकच्या आर्थिक प्रगतीचा आलेख पाहिल्यास, २०१४ मध्ये १ लाख १३ हजार रुपये असलेले दरडोई उत्पन्न २०२६ मध्ये २ लाख ६५ हजारांपर्यंत पोहोचले आहे, यातून शहराची प्रगती आणि समृद्धी प्रतित होते. राज्याच्या सकल उत्पन्नात (जीडीपी) नाशिकचा वाटा २०२० मध्ये १९ बिलियन डॉलर्स होता, तो आज २८ बिलियन डॉलर्स इतका झाला आहे. विशेष म्हणजे, नाशिकमध्ये झालेल्या एकूण सामंजस्य करारांपैकी ७७ टक्के करार प्रत्यक्षात कार्यान्वित झाले आहेत. आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने ३३,००० कोटींची विकासकामे हाती घेतली आहेत. यातून या परिसरात पायाभूत सुविधांचे जाळे अधिक मजबूत होणार आहे. ज्यामुळे येणाऱ्या काळात सुमारे ३ लाख कोटींची अर्थव्यवस्था उभी राहण्यास मदत होणार आहे.

नाशिक विकास

वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गुंतवणूक

कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक शिखर परिषदेत विविध क्षेत्रांतील कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात वेस्टिन वाईनयार्ड रिसॉर्ट ४०० कोटींची गुंतवणूक करत आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्रात ७५० कोटींची मोठी गुंतवणूक होत आहे. याव्यतिरिक्त लॉजिस्टिक्स, टेक्सटाईल, फूड प्रोसेसिंग, आयटी आणि इलेक्ट्रिकल उत्पादन क्षेत्रातही शेकडो कोटींचे करार झाले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत अनेक उद्योगांनी कुंभमेळ्यासाठी आणि नाशिकच्या सुशोभिकरणासाठी आर्थिक सहकार्य दिले आहे. यामध्ये त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंडाचे जलशुद्धीकरण, ई-लायब्ररीची स्थापना आणि आदिवासी भागातील उद्योगांसाठी ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर सारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवले जात आहेत. उमेद-विकास सारख्या उपक्रमातून महिला बचत गटांना पूजेच्या साहित्य निर्मितीतून शाश्वत रोजगार मिळवून दिला जात आहे. नाशिक रिंग रोड आणि कुंभमेळ्यानिमित्त उभारल्या जाणाऱ्या शाश्वत सुविधांमुळे हे शहर भविष्यात महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचे एक प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून ओळखले जाईल.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *