प्रगतीशील | उत्तम प्रशासक

मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी: महाराष्ट्राच्या शैक्षणिक पटलावर विज्ञानाची नवी भरारी

विज्ञानाची कास धरल्याशिवाय प्रगतीचे चक्र पूर्ण होऊ शकत नाही, हे सूत्र ओळखून राज्य सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांच्या कल्पक आणि नवनिर्मितीच्या वृत्तीला बळ देण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला आहे. ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळेच्या भिंती ओलांडून विज्ञानाचे प्रत्यक्ष धडे देण्यासाठी इस्रो (ISRO) आणि नासा (NASA) सारख्या नामांकित संस्थांना भेटी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी हा अत्यंत अभिनव उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम राज्यातील शालेय शिक्षण पद्धतीत क्रांती घडवणारा उपक्रम ठरेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या उद्दिष्टांशी सुसंगत असलेल्या या योजनेचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, त्यांच्यातील कल्पकता आणि नवनिर्मितीच्या वृत्तीला चालना देणे हा आहे. फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष अनुभवातून आणि कृतीतून विज्ञानाचे धडे मिळावेत. यासाठी ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत जगातील प्रसिद्ध अशा संशोधन संस्थांना भेट देण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजनेच्या माध्यमातून तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर निवड प्रक्रिया राबवून गुणवान विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. तालुका स्तरावरील शालेय विज्ञान प्रदर्शनात चमकदार कामगिरी करणाऱ्या २१४८ विद्यार्थ्यांची नागपूर, पुणे किंवा मुंबई येथील विज्ञान केंद्रांच्या सहलीसाठी निवड केली जाणार आहे. याचा खर्च जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केला जाणार आहे. तर जिल्हा स्तरावरून निवडलेल्या १८० विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना बंगळूरू येथील इस्रो अंतराळ संशोधन केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, राज्यस्तरीय प्रदर्शनातून आपल्या संशोधनाने सर्वांची मने जिंकणाऱ्या ५१ बाल वैज्ञानिकांना थेट अमेरिकेतील नासा या जागतिक संस्थेमध्ये आठ दिवसांच्या अभ्यासासाठी पाठवले जाणार आहे. या परदेश दौऱ्यासाठी सरकारने प्रति विद्यार्थी ६ लाख रुपयांच्या भरीव निधीची तरतूद केली आहे. यामध्ये सर्वसाधारण, दिव्यांग आणि आदिवासी अशा सर्व प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश केला जाणार आहे.

मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रम

राज्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी नासासारख्या जागतिक संस्थेत जाऊन विज्ञानाचे धडे गिरवावेत आणि भविष्यात एक चांगला वैज्ञानिक म्हणून नावारूपाला यावे, हे या उपक्रमाचे मूळ उद्दिष्ट आहे. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात (अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६) घोषणा केलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ६ मे रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गुणवान विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी तालुका स्तरापासून राज्य स्तरापर्यंत विशेष समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस सरकार विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी क्षितिजे दाखवण्याचे आणि त्यांच्या पंखांना बळ देण्याचा प्रयत्न करत आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात संशोधनाचे एक नवे पर्व सुरू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *