विदर्भातील रणरणते ऊन आणि वाढत्या पाऱ्यामुळे जनजीवन तर विस्कळीत होतेच. पण त्याचबरोबर शिक्षणासाठी घराबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही मोठा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येते. नागपूरच्या बेसा येथील सरकारी मुलींच्या वसतिगृहात असाच काहीसा दाहक अनुभव विद्यार्थिनींना येत होता. उकाड्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण झाले होते, तर दुसरीकडे उष्णतेमुळे अनेक विद्यार्थिनींना त्वचेच्या विकारांनी ग्रासले होते. प्रशासकीय दिरंगाई आणि नियमावलीच्या तांत्रिक अडचणींमुळे या विद्यार्थिनींना कूलर मिळणे दुरापास्त वाटत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने हाताळले. राजकारणापलीकडे जाऊन माणुसकी जपणारा लोकनेता, ही ओळख सार्थ ठरवत, मुख्यमंत्र्यांनी फक्त एका वसतिगृहासाठी नाही, तर संपूर्ण विदर्भातील वसतिगृहांसाठी तातडीने कूलर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.

विदर्भातील कडक उन्हाचा तडाखा आणि त्यामुळे होणारी लाहीलाही लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत संवेदनशील निर्णयाने आणि मानवतेच्या भूमिकेतून नागपूरमधील विद्यार्थिनींच्या समस्येवर तत्काळ तोडगा काढला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेमुळे विद्यार्थिनींच्या डोळ्यांत साचलेली चिंतेची जागा कृतज्ञतेने घेतली. त्यांनी या कृतज्ञतेच्या भावनेतून आपल्या ‘देवाभाऊ’चे पत्राद्वारे आभार मानले आहेत. नागपूरच्या बेसा येथील १ हजार मुलींच्या शासकीय वसतिगृहात कूलरची सोय नसल्याने विद्यार्थिनींना विदर्भातील प्रचंड अशा उष्णतेचा आणि त्वचेच्या आजारांचा सामना करावा लागत होता. विशेष म्हणजे, परीक्षेचा काळ असतानाही काही तांत्रिक नियमांचे कारण पुढे करत वसतिगृह प्रशासन कूलर लावण्यास नकार देत होते. ही गंभीर समस्या नागपूर भाजपचे शहराध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवक यांच्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचली. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय दिरंगाईला धारेवर धरत, तातडीने जुन्या नियमावलीत शिथिलता आणण्याचे आदेश दिले. तसेच हा निर्णय फक्त एका वसतिगृहापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण विदर्भातील शासकीय वसतिगृहांसाठी ६०० कूलर उपलब्ध करून देण्याचे निर्देश समाज कल्याण विभागाला दिले.
मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक आणि वेगवान निर्णयामुळे शेकडो विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थिनींना दिलासा मिळाला आहे. आपल्या हक्काच्या नेत्याने वेळेवर धावून येत मोठ्या भावाप्रमाणे आपल्या लाडक्या बहिणींची अडचण दूर केल्याची भावना या विद्यार्थिनींनी पत्रातून व्यक्त केली आहे. वसतिगृहातील काही निवडक विद्यार्थिनींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत ‘धन्यवाद देवाभाऊ’ अशा शब्दांत त्यांचे आभार मानले आहेत. राजकारणासोबत लोकसेवा करताना प्रशासकीय भिंती बाजूला सारून मानवतेच्या नात्याने, संवेदनशील मनाने घेतलेला हा निर्णय या लोकनेत्याबद्दल बरंच काही सांगून जातो.
