मुंबई

बजेट २०२६: मुंबईच्या लोकल, मेट्रो, हायस्पीड रेल्वेसाठी विशेष निधी; मुंबई-पुणे अवघ्या ४८ मिनिटांत!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मुंबईसाठी अत्यंत आशादायी ठरला आहे. देशाच्या विकासाचे इंजिन असलेल्या मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली असून, मुंबई महानगर क्षेत्राचा कायापालट करण्यावर विशेष भर दिल्याचे दिसून येते. केंद्र सरकारने पायाभूत सुविधा, विविध विकास प्रकल्प, मुंबई-पुणे हायस्पीड रेल्वे, लोकल सुधारणा आणि मेट्रो विस्तार असे स्पेशल मुंबई बजेट दिले.

या अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे मुंबई-पुणे हाय-स्पीड रेल्वे. या प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचे अंतर अवघ्या ४८ मिनिटांवर येणार आहे. ही दोन मोठी शहरे अत्यंत कमी वेळेत एकमेकांशी जोडली जाऊन व्यवसाय आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे कामही २०२७ पर्यंत पूर्ण करण्यासाठी विशेष निधी देण्यात आला आहे. मालवाहतुकीसाठी समर्पित असलेल्या ‘वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’चे काम आता अंतिम टप्प्यात असून, जेएनपीटी बंदरातून होणारी मालवाहतूक वेगळ्या मार्गावरून होईल. याचा सर्वात मोठा फायदा मुंबईच्या लोकल ट्रेनला होणार आहे. मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होत असल्यामुळे लोकल गाड्या वेळेवर आणि अधिक वेगाने धावू शकतील. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27

मुंबई मेट्रोच्या विस्तारासाठी १७०२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर उपनगरी रेल्वेच्या सुधारणेसाठीही अर्थसंकल्पात मोठा वाटा ठेवण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी २३,९२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मेट्रोच्या १३ लाईनचे काम सुरू आहे. एमएमआर प्रदेशात उपनगरीय रेल्वेचे नवे मार्ग उभारण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हाती घेतलेल्या प्रकल्पांना अर्थपुरवठा केला जाणार आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयुटीपी) अंतर्गत लोकल मार्गांचे विस्तारीकरण व आधुनिकीकरणासाठी अतिरिक्त निधी अर्थसंकल्पात देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईत मेट्रो प्रकल्प उभारण्यात महत्त्वची भूमिका बजावणाऱ्या टनेल बोरिंग मशिन स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पाताळ लोक (जमिनीखाली भुयारांचे जाळे निर्माण करणारा प्रकल्प) या मुंबईच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा खर्च कमी होणार आहे.

मुंबई लोकलचा एमयुटीपी ३ अंतर्गत सुमारे ४०० किमी प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहेत. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी नवीन ६वी लाईन टाकली जात आहे. स्टेशन्स उभारली जात आहेत. तसेच १०० नवीन साध्या लोकल ट्रेन्सचे नियोजन केले जात आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर १५ डब्याच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यासाठी नियोजन केले जात आहे. मुंबईकरांसाठी नवीन एसी ट्रेन्स आणल्या जाणार आहेत. एकूण मुंबईकरांचा प्रवास सुखमय करण्यासाठी केंद्र सरकारकडून बजेटच्या माध्यमातून अनेक प्रकल्पांना पाठिंबा देण्यात आला आहे.

फक्त वाहतूक सुधारणाच नाही, तर मुंबईला आधुनिक उद्योगांचे केंद्र बनवण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) या संस्थेला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. ही संस्था आता देशभर अ‍ॅनिमेशन, गेमिंग आणि कॉमिक्स क्षेत्रातील प्रशिक्षण देण्याचे काम करणार आहे. यामुळे मुंबईतील तरुणांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होतील. या अर्थसंकल्पामुळे मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी मोठी आर्थिक रसद मिळाली आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *