मुसळधार पाऊस आणि निसर्गाचा प्रकोप कितीही मोठा असला, तरी खंबीर राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय तत्परता असेल तर कोणत्याही संकटावर मात करता येते, हे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’ प्रकल्पावर नुकत्याच घडलेल्या घटनेने सिद्ध झाले आहे. कनेक्टिंग लिंकच्या बोगद्याच्या प्रवेशद्वारावर अतिवृष्टीमुळे दरड कोसळली. पण त्यानंतरच्या १८ तासांत प्रशासनाने तत्परता दाखवत हा रस्ता पूर्ववत करून वाहतूक पुन्हा सुरू केली. निसर्गाचे आव्हान पेलत, कोणतीही संरचनात्मक हानी न होऊ देता वाहतूक पूर्ववत करण्याचे हे यश म्हणजेच प्रशासकीय नियोजन, आधुनिक अभियांत्रिकी आणि खंबीर नेतृत्वाचा त्रिवेणी संगम आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या परिसरात झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेने काही वेळ चिंता निर्माण झाली होती. पण या संकटाच्या प्रसंगी राज्याच्या प्रशासनाने दाखवलेली तत्परता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. इन्फ्रा मॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीतही हा धाडसी प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. भूतकाळात आधीच्या सरकारांनी ‘शक्य नाही’ म्हणून ज्या प्रकल्पाची फाईल बंद करून ठेवली होती. तोच प्रकल्प मार्गी लावून महाराष्ट्राच्या विकासाची नवी दिशा देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित केली होती. ६ जुलै, २०२६ रोजी लोणावळा-खंडाळा परिसरात २४ तासांत ४९० मिमी इतका पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे मुंबई – पुणे कनेक्टिंग लिंकच्या बोगद्याच्या प्रवेशद्वारावर १०० टनांहून अधिक माती व दगडाचा मलबा कोसळला होता. यावर महामार्ग पोलीस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) टीमने कोणत्याही विलंबाशिवाय अवघ्या १८ तासांत हा प्रचंड मलबा हटवून वाहतूक पूर्ववत केली.

एमएसआरडीसीच्या टीमने अत्यंत कठीण परिस्थितीत या रस्त्यावरील अडथळे दूर करून, तो स्वच्छ करून रात्री साडेदहाच्या सुमारास पुन्हा वाहतुकीसाठी खुला करून दिला. सुरूवातीला फक्त दोन मार्गिका खुल्या करण्यात आल्या. तर मुख्यमंत्र्यांनी उभारलेल्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा आणि प्रशासनावर ठेवलेल्या विश्वासाचा हा प्रत्यक्ष पुरावा होता. भविष्यात अशा घटना होऊ नये, यासाठी या मार्गावर तात्काळ हाय-टेन्साईल जाळ्या बसवणे, पाण्याचे प्रवाह वळवण्यासाठी कॅच ड्रेन तयार करणे आणि आयआयटी मुंबईमधील तज्ज्ञांच्या सल्ल्याने अधिक सक्षम उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने आणि सुरक्षेला प्राधान्य देत उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई – पुणे कनेक्टिंग लिंकच्या घटनेनंतर विरोधकांनी उठवलेल्या टीकेच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडली. कनेक्टिंग लिंक प्रकल्प हा फक्त एक वाहतूक प्रकल्प नसून, तो महाराष्ट्राच्या अभियांत्रिकी क्षमतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रकल्पात जगातील सर्वात रुंद बोगदा, भारतातील सर्वाधिक उंच व्हायाडक्ट आणि सर्वाधिक उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे मलबा कोसळला असला तरी बोगदा आणि पुलाला कोणतीही संरचनात्मक हानी झालेली नाही. तसेच आपल्याकडील आपत्कालीन यंत्रणांनी अवघ्या १८ तासांत वाहतूक पूर्ववत करून प्रशासन किती कार्यतत्पर आहे, हे सुद्धा दाखवून दिले. कोकण रेल्वेच्या उभारणीत कितीतरी आव्हाने आली. पण त्यावर मात करून ती आज यशस्वीपणे सुरू आहे. मोठ्या आणि क्लिष्ट पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये सुरुवातीला निसर्गाची आव्हाने येतात, पण त्यातून शिकूनच अभियांत्रिकी अधिक प्रगल्भ होते, हे महाराष्ट्राने पाहिले आहे.
इन्फ्रा मॅन ही फक्त एक बिरुदावली नाही. तर ती जबाबदारी आहे. धाडसी निर्णय घेण्याचे आणि संकटाच्या वेळी प्रशासनाच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याची ताकद आहे, हे या घटनेवरून दिसून येते. राजकीय हेतूने होणाऱ्या टीकेला आपल्या कामातून आणि १८ तासांत मिळवलेल्या यशातून उत्तर देत महायुती सरकारने हे दाखवून दिले की, निसर्गाच्या कोपापुढे न झुकता आधुनिक तंत्रज्ञान, प्रशासकीय गती आणि खंबीर राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर महाराष्ट्र कोणत्याही आपत्तीवर मात करू शकतो.
संबंधित लेख:
