मुंबई आणि पुणे या दोन महानगरांमधील प्रवासाचे समीकरण बदलून टाकणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (मुंबई-पुणे एक्सप्रेसवे) आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. खंडाळा घाटातील अवघड वळणे, दरडींचा धोका आणि वाहतूक कोंडी या कायमच्या समस्यांवर मात करण्यासाठी महाराष्ट्राचे ‘इन्फ्रामॅन’ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या टर्ममध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ प्रोजेक्टसाठी पाठपुरावा केला होता. हा मिसिंग लिंक फक्त रस्ता नसून तो आधुनिक अभियांत्रिकीचा एक नमुना असणार आहे. साधारण १९ किलोमीटरचा वळणावळणाचा घाट रस्ता वगळून, लोणावळा तलावाच्या खालून जाणारे अवाढव्य बोगदे आणि ढगांना गवसणी घालणारे केबल-स्टेड पूल यांच्या माध्यमातून तयार होणारा मिसिंग लिंक महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील एक क्रांती ठरणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार आहे. २०१५ पासून सततच्या पाठपुराव्यामुळे आणि टेक्निकल अडचणींवर मात करून तो मार्गी लावण्याच्या जिद्दीमुळे, आज हा प्रकल्प पूर्णत्वाच्या शेवटच्या टप्प्यात आला आहे. १ मे रोजी हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे अपडेट
मुंबई आणि पुणे या महाराष्ट्राच्या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग ही राज्याची आर्थिक नस मानली जाते. पण, लोणावळा-खंडाळा घाटातील तीव्र वळणे, पावसाळ्यातील दरडी कोसळण्याच्या घटना आणि सातत्याने होणारी वाहतूक कोंडी यामुळे या प्रवासात अडथळे निर्माण होत होते. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा करत तो पूर्ण व्हावा यासाठी जलदगतीने निर्णय घेतले होते. ३० नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा समितीने या प्रकल्पाला मान्यता दिली होती. पुढे २०१८ मध्ये सवलत करारनाम्याद्वारे याच्या कामाला खऱ्या अर्थाने गती देण्यात आली होती.

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ आहे काय?
सध्या मुंबईहून पुण्याकडे जाताना खालापूर टोल नाका ते खंडाळा एक्झिट या दरम्यान जुना राष्ट्रीय महामार्ग ४ आणि द्रुतगती मार्ग एकत्र येतात. यामुळे १० लेनची वाहतूक अचानक ६ लेनच्या अरुंद घाट रस्त्यावर येते, ज्याला तांत्रिक भाषेत ‘बॉटलनेक’ म्हणतात. हे अंतर सुमारे १९ किमी आहे. या १९ किमी वळणावळणाच्या रस्त्याला पर्याय म्हणून दोन भव्य बोगदे आणि दोन व्हायाडक्ट्सच्या माध्यमातून १३.३ किमीचा एक नवीन थेट मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यालाच ‘मिसिंग लिंक’ म्हटले जाते. हा मार्ग जुन्या घाटाचा रस्ता पूर्णपणे वगळून (बायपास करून) तयार करण्यात आला आहे. यामुळे मुंबई-पुणे हे अंतर सुमारे ६ किमीने कमी होणार असून प्रवासाच्या वेळेत २० ते ३० मिनिटांची बचत होणार आहे.
भारतातील सर्वाधिक उंचीचा पूल ‘मिसिंग लिंक’वर
मिसिंग लिंक प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे अभियांत्रिकी कौशल्य. यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विशेष आग्रह धरला होता. या प्रकल्पात लोणावळा तलावाच्या तब्बल १७० फूट खालून जाणारा ८.९ किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे. जो जगातील सर्वात रुंद ८ पदरी बोगद्यांपैकी एक आहे. तसेच, टायगर व्हॅलीमध्ये उभारण्यात आलेला १३२ ते १८० मीटर उंचीचा भव्य ‘केबल-स्टेड ब्रिज’ हा भारतातील सर्वाधिक उंचीचा पूल ठरणार आहे. या मार्गाला फक्त रस्त्याचे स्वरूप न देता, त्यात येणारे पूल आणि बोगदे हे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात आले. जेणेकरून हा प्रकल्प जागतिक आकर्षणाचे केंद्र ठरेल.
सुरुवातीला साधारण ३,२१५ कोटींचा असलेला हा प्रकल्प तांत्रिक गुंतागुंत आणि वाढीव व्याप्तीमुळे ४,७९७ कोटी आणि त्यानंतर ६,६९५ कोटींवर पोहोचला. राज्य हितासाठी महायुती सरकारने या प्रकल्पासाठी लागणारा निधी आणि प्रशासकीय अडथळे दूर केले. मुंबई-पुणे हा मार्ग सर्व गोष्टींनी खूपच महत्त्वाचा असल्याने त्याला २०२४ च्या लॉजिस्टिक धोरणात विशेष महत्त्व देण्यात आले. या मार्गामुळे मालाची वाहतूक अधिक वेगवान होणार आहे. लोणावळी – खंडाळातील मुसळधार पाऊस आणि इतर टेक्निकल अडचणींमुळे याच्या कामाला विलंब झाला. पण याचे काम आता ९६ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. पुढील ३-४ महिन्यात अंदाजे १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर हा मार्ग खुला होईल.
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची वैशिष्ट्ये
मुंबई – पुणे मिसिंग लिंकची हा घाटातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होणार आहे. यामुळे खोपोली ते कुसगाव यादरम्यानचा ३० ते ६० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाची एकूण लांबी १३.३ किमी असून यासाठी साधारण ७ हजार कोटी रुपये खर्च आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ मे २०२६ रोजी या प्रकल्पाचे लोकार्पण होणार असून त्याच दिवसापासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
- मिसिंग लिंक या प्रकल्पात ८.९२ किमी लांबीचा आणि २३.७५ मीटर रुंदीचा जगातील सर्वात रुंद ८-पदरी बोगदा बांधण्यात आला आहे. ज्याची गिनीज बुकमध्ये नोंद होण्याची शक्यता आहे.
- टायगर व्हॅली येथे ६५० मीटर लांबीचा आणि १८० मीटरपेक्षा जास्त उंचीचा भारतातील सर्वात उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे.
- या प्रकल्पातील एक बोगदा लोणावळा तलावाच्या तळापासून सुमारे १८० मीटर खोल जमिनीखालून गेला आहे.
- मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास सुमारे १ तासाने जलद होणार आहे.
- हा प्रकल्प ॲक्सेस कंट्रोल्ड आहे आणि यात प्रगत अशी आपत्कालीन सुविधा आणि सीसीटीव्हीची सुविधा देण्यात आली आहे.
मुंबई-पुणे मिसिंग लिंक टाईमलाईन
१९९५
‘RITES’ या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार घाटासाठी पर्यायी मार्गाची शिफारस. तांत्रिक सल्लागार समितीची ‘मिसिंग लिंक’ आराखडा आणि सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) मंजुरी.
३० नोव्हेंबर २०१५
मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मुंबई – पुणे मिसिंग लिंकला मान्यता.
२० सप्टेंबर २०१६
मुंबई – पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गातील खोपोली एक्झीट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या भागातील १२ किमीच्या मार्गासाठी (मिसिंग लिंक) दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह ८ पदरी नवीन रस्ता बांधण्याच्या कामास मंजुरी.
१३ जून २०१७
पायाभूत सुविधा उपसमितीची मिसिंग लिंकच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून या बैठकीमध्ये २०१५-१६ च्या दरानुसार यासाठी ४,७९७.५७ कोटी रुपये अंदाजित खर्च देखील मंजूर करण्यात आला.
२४ नोव्हेंबर २०१७
मिसिंग लिंकच्या १९.८ किमी लांबीच्या नवीन मार्गिकेसह काम करण्यास व २०१५-१६ च्या दरसूचीनुसार ४७९७.५७ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. तसेच प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार विशेष कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.
२६ डिसेंबर २०१७
या प्रकल्पासाठी ‘मे. जिओडेटा-एल.बी. कन्सोर्टियम’ यांची जनरल कन्सल्टंट म्हणून नियुक्ती करण्यात आली.
२४ ऑगस्ट २०१८
पर्यावरण विभागाची मुंबई-पुणे मिसिंग लिंकला परवानगी.
२९ ऑगस्ट २०१८
मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या २९ ऑगस्ट २०१८च्या बैठकीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व या प्रकल्पाचे विशेष उद्देश वाहन यांच्यामध्ये करावयाच्या सवलत करारनाम्याच्या प्रारुपास व त्यानुसार सवलत करारनामा करण्यास तसेच प्रकल्पाच्या सुधारित किमतीस मान्यता देण्यात आली.
३० ऑगस्ट २०१८
पॅकेज १ कामाच्या अंतर्गत मे. नवयुगा इंजिनिअरिंग कंपनीला १.७५ किमी आणि ८.९२ किमी लांबीचे दोन ८-पदरी बोगदे तयार करण्याचे तर पॅकेज २ अंतर्गत ७९० मीटर आणि ६५० मीटर लांबीचे दोन ८-पदरी पूल, तसेच खालापूर टोल प्लाझा ते खोपोली एक्झिट दरम्यानच्या ६.५ किमी रस्त्याच्या ८ पदरी रुंदीकरणाचे काम ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. कंपनीला देण्यात आले.
६ सप्टेंबर २०१८
वन विभागाची ७४.७१०२ हेक्टर जमिन वापराचा प्रस्ताव सादर.
३ ऑक्टोबर २०१८
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाटमाथावरील नवीन मार्गिकेचे (मिसिंग लिंक) बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या सवलत करारास मान्यता देण्यात आली. तसेच या प्रकल्पाची सुधारित किंमत ६,६९५.३७ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
मार्च २०१९
मुंबई – पुणे मिसिंग लिंकच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आली.
१२ जुलै २०२५
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १२ जुलै २०२५ रोजी मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी केली. यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. यातील एक बोगदा देशातील सर्वात लांबीचा आहे. यामुळे मुंबई – पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिकूल परिस्थितीत मिसिंग लिंकचे काम करणारे अभियंते आणि कामगारांचे यावेळी विशेष कौतुक केले.
१ मे २०२६
मुंबई – पुणे मिसिंग लिंकचे लोकार्पण शुक्रवारी (१ मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झाले. या प्रकल्पाचे लोकार्पण झाल्यानंतर काही तासांत मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सध्या या मार्गावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सुमारे ७ हजार १८१ कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरू करून हा मार्ग उभारण्यात आला आहे. यातील २२.३३ मीटर रुंदीच्या बोगद्याची जगातील सर्वाधिक रुंद भूमिगत बोगदा म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
६ जुलै २०२६
दरड कोसळलेला भाग त्वरित हटवून वाहतूक पूर्ववत
लोणावळा आणि खंडाळा घाट परिसरात सतत मुसळधार पाऊस पडत होता. लोणावळ्यात २४ तासात ४९० मिमी पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे आणि वेगवान वाऱ्यामुळे मिसिंग लिंकच्या बोगदा क्रमांक २ च्या प्रवेशद्वाराजवळ बाहेरच्या भागावर सुमारे १५० फूट उंचावरून जवळपास १०० टन माती, दगड आणि राडारोडा खाली कोसळला. या दरडीमुळे सरंक्षक भिंतीचे नुकसान झाले आणि रस्त्यावर मातीचा मोठा ढिग साचला. त्यामुळे प्रशासनाने लगेच पुणे – मुंबई एक्सप्रेसवे आणि कनेक्टिंग लिंक महामार्गावरील वाहतूक तातडीने रोखून ती जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर वळवली. दरम्यान एमएसआरडीसीच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने घटनास्थळावर धाव घेत तिथला ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले. रात्री साडेदहाच्या दरम्यान रस्त्यावरील १०० टनांहून अधिक माती आणि दगडांचा मलबा पूर्णपणे बाजूला करण्यात आला. त्यानंतर रस्ता स्वच्छ करून पुणे – मुंबई मार्गिकेवरील दोन लेन वाहतुकीसाठी मर्यादित स्वरूपात खुल्या करण्यात आल्या.
संबंधित लेख:
