गडचिरोली | उत्तम प्रशासक

गडचिरोलीची आरोग्य भरारी: ‘किलकारी’ उपक्रमात जिल्ह्याचा राज्यभरात डंका

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता, माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता आणि जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी कॉल सेवा’ (Kilkari Mobile Audio Services) या महत्त्वपूर्ण उपक्रमात गडचिरोली जिल्ह्याने अत्यंत कौतुकास्पद आणि मोठी झेप घेतली आहे. जून २०२६ या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक ‘किलकारी कॉल’ ऐकणाऱ्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याने राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. नक्षलग्रस्त आणि अत्यंत दुर्गम भौगोलिक परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात आहे.

गडचिरोलीतील आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक बदल

किलकारी उपक्रमाच्या या राज्यस्तरीय क्रमवारीत वर्धा जिल्हा पहिल्या, चंद्रपूर दुसऱ्या आणि वाशीम जिल्हा तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. गडचिरोली जिल्हा परिषद आणि जिल्हा आरोग्य विभागाने मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राबविलेल्या सूक्ष्म नियोजनामुळेच गडचिरोली जिल्ह्याला हे यश साध्य करता आले आहे. एकेकाळी नक्षलवाद, मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आणि राज्याचा शेवटचा जिल्हा अशी ओळख असलेला गडचिरोली जिल्हा आज एका वेगळ्याच वळणावर येऊ लागला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोलीतील नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात आला असून, तो आता स्टील उत्पादक जिल्हा म्हणून नावारूपास येत आहे. तिथे वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्या गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे नोकरी, रोजगाराची संख्या वाढू लागली आहे. त्यात आता नवजात बाळाच्या निरोगी भविष्यासाठी राबवण्यात आलेल्या आरोग्य व्यवस्थेच्या रचनेत गडचिरोली जिल्ह्याने चौथा क्रमांक पटकावला आहे. यातून गडचिरोलीतील आरोग्य व्यवस्थेतील सकारात्मक बदल दिसून येत आहेत.

काय आहे किलकारी उपक्रम?

किलकारी (मोबाईल ऑडिओ सेवा) या उपक्रमांतर्गत नोंदणीकृत गरोदर माता आणि बाळंतिणींना त्यांच्या मोबाईलवर आरोग्य, पोषण, लसीकरण आणि बाळाची काळजी घेण्याबाबतचे मोफत ऑडिओ संदेश पाठवले जातात. गरोदरपणाच्या चौथ्या महिन्यापासून ते बाळ एक वर्षाचे होईपर्यंत दर आठवड्याला ऑडिओ संदेश येतात आणि त्यात सोप्या मराठी भाषेत घरबसल्या डॉक्टरांसारखेच मोफत मार्गदर्शन पुरवले जाते. जून महिन्यात गडचिरोलीतील ग्रामीण व अतिदुर्गम भागातील मातांनी हे संदेश अत्यंत गांभीर्याने ऐकल्याचे प्रशासकीय आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या यशात थेट क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि प्रामुख्याने आशा स्वयंसेविका व आरोग्य सेवक-सेविकांनी गृहभेटी दरम्यान मातांना या ऑडिओ कॉलचे महत्त्व पटवून दिले, त्यामुळेच आदिवासी व दुर्गम भागातील महिलांमध्ये आरोग्यविषयक संदेशांबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली आहे.

२६ राज्यांमध्ये किलकारी उपक्रम कार्यरत

सध्या हा उपक्रम देशातील २६ राज्यांमध्ये राबवला जात आहे. हे ऑडिओ संदेश मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेसह गुजराती, भोजपुरी, उडिया, आसामी, बंगाली, तेलुगु, कन्नड, मितई, मिझो आदी भाषांमध्ये पाठवले जातात. महाराष्ट्रात फेब्रुवारी २०२४ पासून हा उपक्रम सुरू झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बरीचशी गावे ही दुर्गम भागात आणि जंगलात आहेत. तिथल्या नागरिकांना रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा खडतर प्रवास करावा लागतो. पण अशा परिस्थितीतही आशा सेविका, अंगणवाडी सेविका, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांनी घराघरात जाऊन गर्भवती महिलांची नोंद केली. त्यांच्या नियमित तपासणीसाठी आणि मार्गदर्शनासाठी किलकारी सेवेशी जोडले. यामुळे या महिलांना योग्य मार्गदर्शन मिळत गेले. त्याचेच हे यश आहे.

जिल्हा प्रशासनाने आगामी काळात गडचिरोली जिल्ह्याला महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा मानस व्यक्त केला आहे. आता केवळ कॉल उचलणे पुरेसे नसून मातांनी तो ऑडिओ संदेश पूर्ण ऐकावा यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर याचा साप्ताहिक आढावा घेतला जाणार आहे. एकंदरीत, योग्य मार्गदर्शन आणि सर्वांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोलीतील माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी होऊन सुरक्षित मातृत्वाच्या दिशेने जिल्ह्याची वाटचाल अधिक गतिमान होत आहे. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्याने पुन्हा एकदा विकास हा फक्त शहरांमध्ये नाही तर ग्रामीण भागात आणि विशेषकरून आरोग्य क्षेत्रातही होऊ शकतो, हे दाखवून दिले.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *