राज्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे हे तीन जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित ३३ जिल्ह्यांतील तब्बल ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना पुढील तीन महिन्यांसाठी मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः जे शेतकरी अद्याप राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नाहीत, अशा गरजू शेतकरी कुटुंबांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे.
महाराष्ट्र दुष्काळ २०२६ – सरकारी मदत
सध्या राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत ५ कोटी ७९ लाख ३४ हजार ७०२ लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वाटप केले जाते. तर १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील २१ लाख ६० हजार ६८२ शेतकऱ्यांना दरमहा १७० रुपये रोख स्वरूपात दिले जातात. मात्र, या दोन्ही योजनांच्या कक्षेबाहेर राहिलेल्या आणि दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांचा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार केला आहे.
३ किलो तांदूळ, २ किलो गहू मिळणार
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम आणि एपीएल-डीबीटी योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या या सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला माणशी पाच किलो मोफत धान्य दिले जाणार आहे. यामध्ये तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गव्हाचा समावेश असेल. सध्या हा निर्णय पुढील तीन महिन्यांसाठी लागू करण्यात आला आहे. त्यानंतर तत्कालीन परिस्थितीचा आढावा घेऊन ही योजना पुढे सुरू ठेवण्याबाबता निर्णय घेतला जाणार आहे.
मोफत अन्नधान्याचे लाभार्थी कोण?
मोफत धान्य वितरणाच्या प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. ज्या रेशनकार्ड धारकांचे आधार सीडिंग पूर्ण झाले आहे, त्यांना स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करून मोफत धान्य दिले जाणार आहे. तर ज्यांचे आधार सीडिंग अद्याप बाकी आहे, त्यांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच त्यांना बायोमेट्रिक पडताळणीद्वारे धान्य दिले जाणार आहे. मोफत धान्य वितरणासाठी लागणाऱ्या अतिरिक्त धान्य साठ्याचे नियोजन राज्य सरकारने आपल्या पातळीवर केले आहे. त्यासाठी राज्याने केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडे अधिकृत मागणी नोंदविण्यास मान्यता दिली आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या ग्रामीण भागातील बळीराजाची चूल पेटती ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारचा हा निर्णय आधाराचा ठरणार आहे.
संबंधित लेख:
