कृषिगाथा

१० हजार शेतकऱ्यांच्या मदतीने राज्यात ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्प राबवणार!

महाराष्ट्राच्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे, शेतीचा खर्च कमी करणे आणि नैसर्गिक आव्हानांवर मात करण्याच्या उद्देशाने देवेंद्र फडणवीस सरकारने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ या अत्याधुनिक संकल्पनांचा स्वीकार करून पहिल्या टप्प्यात या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पासाठी १० हजार शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे.

टेकसॅव्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत नुकतीच (दि.२१ ऑगस्ट २०२६) शेतीतील अडचणी आणि एआय इन अ‍ॅग्रीकल्चर याबाबत एक बैठक पार पडली. या बैठकीत शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग याचा वापर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. हवामान बदल, पाण्याची कमतरता, जमिनीची घटती सुपीकता, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि वाढता उत्पादन खर्च यासारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने एका विशेष मॉडेलची आखणी केली. त्याबाबतही चर्चा करण्यात आली.

डिजिटल ट्विन लर्निंग

‘डिजिटल ट्विन’ म्हणजे काय?

‘डिजिटल ट्विन’ (Digital Twin) ही एक अशी आधुनिक डिजिटल प्रणाली आहे, ज्यामध्ये भौतिक जगातील एखाद्या वस्तूचे, शेताचे किंवा पिकाचे तंतोतंत आभासी (Virtual) किंवा डिजिटल मॉडेल तयार केले जाते. शेती संदर्भात सांगायचे झाले तर, प्रत्यक्ष शेतातील जमिनीचा ओलावा, हवामान, पिकांची वाढ, पाण्याची गरज आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव या सर्वांची सॅटेलाईट तंत्रज्ञान, ड्रोन, आयओटी (IoT) सेन्सर्स आणि डेटा ॲनालिटिक्सच्या मदतीने माहिती गोळा केली जाते. या जमा केलेल्या माहितीच्या आधारे कॉम्प्युटरवर त्या विशिष्ट शेताची आणि पिकाची एक हुबेहूब डिजिटल प्रतिकृती तयार केली जाते. या आभासी प्रतिकृतीचे एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि मशीन लर्निंगद्वारे विश्लेषण करून पिकाची भविष्यातील स्थिती, अपेक्षित उत्पादन आणि उद्भवणाऱ्या समस्यांचा आगाऊ अंदाज लावला जातो, त्याला डिजिटल ट्विन लर्निंग म्हटले जाते.

डिजिटल ट्विन लर्निंगसाठी १० हजार शेतकऱ्यांची निवड

डिजिटल ट्विन लर्निंग या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रातील शेतीत प्रत्यक्ष वापर करण्यासाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक (पायलट) तत्त्वावर १० हजार शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यातील मुख्य पिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यात कापूस, सोयाबीन, तूर, ऊस, संत्रे, हळद, कांदा आणि मका या आठ प्रमुख पिकांचा समावेश आहे. हा अभ्यास विभागनिहाय आणि पिकानुसार केला जाणार आहे. त्यातून मिळणाऱ्या डेटाच्या आधारे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेताच्या भौगोलिक व हवामान परिस्थितीनुसार अचूक सल्ला दिला जाणार आहे. सुरूवातीच्या टप्प्यात ड्रोनच्या मदतीने पिकांचे फोटो घेऊन एआयच्या मदतीने त्यावर पडणाऱ्या रोगांचे निदान केले जाणार आहे. त्यानंतर पिकांना पाणी कधी आणि किती द्यायचे? तसेच औषधांची फवारणी कधी करायची? याचा थेट मॅसेज शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाठवण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

‘एआय’मुळे प्रति हेक्टर प्रतिदिन सुमारे ९० हजार लिटर पाण्याची बचत

बारामती येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने शेतीत एआय आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्पाचा यशस्वीरित्या वापर केला आहे. त्यांना या टेक्नॉलॉजीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने ऊसाच्या शेतीवर एआय आणि डिजिटल ट्विनचा यशस्वी प्रयोग केला आहे. या ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे यांनी सांगितले की, २०० शेतकऱ्यांपैकी १६४ शेतकऱ्यांच्या वैध नोंदींचा अभ्यास करून, त्यांच्या सरासरी उत्पादनात ६५.४५ टन प्रति एकरवरून ७३.१२ टन प्रति एकर इतकी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. त्यासोबत एआय आधारित सिंचन व्यवस्थापनामुळे पाण्याचा वापर तब्बल ४२ टक्क्यांनी कमी झाल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे प्रति हेक्टर प्रतिदिन सुमारे ९० हजार लिटर पाण्याची बचत होते. पहिल्या टप्प्यातील हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राबवल्यास पाण्याचा अपव्यय टळेल, शेतीचा उत्पादन खर्च घटेल आणि राज्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *