मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी

प्रत्येक कुटुंबाला ५ लाखांपर्यंत मोफत उपचारांचे कवच; ११ महिन्यांत ११ लाखांहून अधिक रुग्णांना आधार

गंभीर आजारांचा उपचार खर्च हा सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक कंबरडे मोडणारा ठरतो. पण, महाराष्ट्र सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आणि केंद्र सरकारची आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या (AB-PMJAY) एकत्रित अंमलबजावणीमुळे राज्यातील प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्ष ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा आणि कॅशलेस वैद्यकीय उपचार उपलब्ध होत आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ११ लाखांहून अधिक रुग्णांनी १७ लाखांहून अधिक उपचारांचा लाभ घेतला आहे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने यासाठी २,८६९ कोटी ४५ लाख रुपये खर्च केले आहेत.

लोककल्याणकारी उपक्रमाला भरभरून प्रतिसाद

राज्यातील सर्व अधिवासी कुटुंबांना आरोग्य संरक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या योजनांमध्ये कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड विकार, अवयव प्रत्यारोपण, अपघात आणि अन्य गंभीर आजारांसह २ हजार ३९९ उपचार व शस्त्रक्रिया पद्धतींचा समावेश आहे. राज्यातील पाच हजारांहून अधिक सरकारी व खासगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये पात्र लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळतात. तसेच ७० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना ‘आयुष्मान वय वंदना’ योजनेंतर्गत अतिरिक्त पाच लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण उपलब्ध आहे. राज्यात आतापर्यंत ४ कोटी ४५ लाख आयुष्मान कार्डे आणि १२ लाख २० हजार ज्येष्ठ नागरिकांची वय वंदना कार्डे तयार करण्यात आली आहेत. राज्य सरकारने या योजनेची व्याप्ती वाढवून ती राज्यातील सर्व कुटुंबांसाठी खुली केली आहे. यामध्ये लाभार्थी कुटुंबांना खालीलप्रमाणे पाच प्रमुख गटांतर्गत संरक्षण दिले आहे.

गट अ व ब (सर्व रेशनकार्डधारक व अधिवासी):

पिवळे, केशरी, अंत्योदय आणि अन्नपूर्णा रेशनकार्डधारक कुटुंबांसह आता पांढरे रेशनकार्डधारक आणि महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असलेले सर्व नागरिक प्रति कुटुंब ५ लाखांच्या आरोग्य संरक्षणास पात्र आहेत.

गट क (विशेष घटक):

आश्रमशाळेतील विद्यार्थी, अनाथाश्रम, महिला व वृद्धाश्रमातील नागरिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबीय.

गट ड व इ (अपघातग्रस्त व सीमाभाग):

महाराष्ट्रातील रस्त्यांवर अपघात झालेले राज्याबाहेरील किंवा देशाबाहेरील रुग्ण (१ लाखांपर्यंत उपचार), तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ८६५ गावांतील पात्र कुटुंबे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतूद:

७० वर्षे आणि त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नाची कोणतीही अट न ठेवता ‘आयुष्मान वय वंदना’ योजनेंतर्गत स्वतंत्रपणे अतिरिक्त ५ लाख रुपयांचे आरोग्य कवच देण्यात आले आहे.

इतर राज्यातही उपचार घेता येणार?

आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना इतर राज्यातही उपचार घेता येतात. या योजनेची योजनेची सुविधा पोर्टेबल आहे. पात्र लाभार्थी त्याच्या राज्याबाहेरही योजनेशी संबंधित रुग्णालयात कॅशलेस उपचार घेऊ शकतात.

२,३९९ गंभीर आजारांवर मोफत उपचार

या एकत्रित योजनेत कर्करोग (कॅन्सर), हृदयरोग, मूत्रपिंड विकार (किडनीचे आजार), अवयव प्रत्यारोपण, अपघात आणि इतर गंभीर आजारांसह तब्बल २,३९९ उपचार व शस्त्रक्रिया पद्धतींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, रुग्णाला आधीपासून असलेले आजार (Pre-existing diseases) पहिल्या दिवसापासून या योजनेत कव्हर केले जातात. राज्यातील ५ हजारांहून अधिक सरकारी आणि खासगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये या मोफत उपचारांची सोय उपलब्ध आहे.

आयुष्मान कार्ड असे काढा

ज्या नागरिकांनी अजूनही आपले कार्ड काढलेले नाही. ते अद्ययावत शिधापत्रिका (रेशनकार्ड) किंवा अधिवास प्रमाणपत्र (डोमीसाईल), आधार क्रमांक आणि आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकाच्या आधारे खालील ठिकाणी कार्ड तयार करून घेऊ शकतात.

  • गावातील आशा (ASHA) कर्मचारी
  • आपले सरकार सेवा केंद्र
  • स्वस्त धान्य दुकाने (रेशन दुकान)
  • मोबाईलवरील ‘आयुष्मान ॲप’ (Ayushman App) द्वारे

योजनेची अधिक माहिती किंवा तक्रारींसाठी नागरिकांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या १५५३८८ किंवा १८००-२३३-२२०० या क्रमांकावर, तर आयुष्मान भारत योजनेच्या १४५५५ किंवा १८००-१११-५६५ या टोल-फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *