भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबवली जाणारी एक अत्यंत महत्त्वाची कल्याणकारी योजना आहे. अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध प्रवर्गातील जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विविध शहरांमधील विद्यापीठे आणि शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेतात, पण सरकारी वसतिगृहांची क्षमता मर्यादित असल्यामुळे त्यांना त्या वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळू शकत नाही; अशा विद्यार्थ्यांची सोय व्हावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या वार्षिक अनुदानाच्या रकमेत लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
आर्थिक मदत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा
स्वाधार योजना ही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी २०१७ मध्ये सुरू केली होती. सरकारी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती. स्वाधार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या भोजन, निवास, निर्वाह आणि शैक्षणिक साहित्याचा खर्च भागवण्यासाठी थेट आर्थिक मदत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
योजनेच्या अनुदानात वाढ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (दि. ६ ऑक्टोबर) या योजने अंतर्गत मिळणाऱ्या वार्षिक अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन सुधारित दरानुसार विविध शहरांच्या श्रेणीनुसार विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे वाढीव अनुदान दिले जाणार आहे.
मुख्य शहरे (मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, ठाणे आणि नागपूर):
एकूण वार्षिक अनुदान: ८०,००० रुपये
- भोजन भत्ता: ४२,००० रु.
- निवास भत्ता: २८,००० रु.
- निर्वाह भत्ता: १०,००० रु.
महसूल विभागीय शहरे व उर्वरित ‘क’ वर्ग महापालिका क्षेत्र:
एकूण वार्षिक अनुदान: ६८,००० रुपये
- भोजन भत्ता: ३७,००० रु.
- निवास भत्ता: २१,००० रु.
- निर्वाह भत्ता: १०,००० रु.
इतर जिल्ह्यांची ठिकाणे (मनपा क्षेत्रापासून ५ किमीतील संस्था):
एकूण वार्षिक अनुदान: ५७,००० रुपये
- भोजन भत्ता: ३२,००० रु.
- निवास भत्ता: १७,००० रु.
- निर्वाह भत्ता: ८,००० रु.
तालुक्याची ठिकाणे:
एकूण वार्षिक अनुदान: ५०,००० रुपये
- भोजन भत्ता: ३०,००० रु.
- निवास भत्ता: १३,००० रु.
- निर्वाह भत्ता: ७,००० रु.
अतिरिक्त शैक्षणिक साहित्य सहाय्य (वार्षिक):
- वैद्यकीय व अभियांत्रिकी: ८,००० रु. अतिरिक्त
- कला, वाणिज्य, सायन्स व इतर शाखा: ४,००० रु.
आतापर्यंत या योजनेंतर्गत मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६० हजार रुपये दिले जात होते. तर इतर महसूल किंवा ‘क’ वर्ग महापालिका क्षेत्रासाी ५१ हजार रुपये, इतर जिल्हा स्तरासाठी ४३ हजार आणि तालुका स्तरासाठी ३८ हजार रुपये दिले जात होते. त्या अनुदानात राज्य सरकारने बऱ्यापैकी वाढ केली आहे.
योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
- लाभार्थी विद्यार्थी अनुसूचित जाती (SC) किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
- सदर विद्यार्थ्याने इयत्ता ११ वी, १२ वी किंवा १२ वी नंतरच्या पदवी/पदव्युत्तर व्यावसायिक किंवा बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमास मान्यताप्राप्त महाविद्यालय / संस्थेत प्रवेश घेतलेला असावा.
- विद्यार्थ्याने सरकारी वसतिगृहासाठी अर्ज केलेला असावा. पण गुणवत्तेनुसार त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेला नसावा किंवा तिथे वसतिगृहाची सोय उपलब्ध नसावी.
- विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
- विद्यार्थ्यांला पूर्व परीक्षेत किमान ५० टक्के आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४५ टक्के गुण असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी ज्या शहरात शिकत आहे, त्याच शहराचा तो रहिवासी नसावा.
अर्ज कसा आणि कुठे करायचा?
स्वाधार योजनेचा अर्ज संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या कार्यालयात उपलब्ध असतो किंवा विद्यार्थी महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सुद्धा अर्ज करू शकतात.
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना किंवा सामाजिक न्याय विभागाच्या पोर्टल वर जा.
- पोर्टलवर जाऊन मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून नवीन युजर म्हणून नोंदणी करा.
- नोंदणीनंतर युजरनेम व पासवर्डच्या मदतीने पोर्टलवर लॉगिन करा.
- स्वाधार योजनेच्या अर्जावर क्लिक करून खालील माहिती भरा.
वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, मोबाईल नंबर)
जात आणि उत्पन्न तपशील (उत्पन्न मर्यादा २.५० लाखापर्यंत असणे आवश्यक)
शैक्षणिक संस्था, अभ्यासक्रम आणि चालू वर्षाचा तपशील
बँक खाते क्रमांक आणि आधार लिंक तपशील
- आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
जातीचा दाखला (Caste Certificate)
उत्पन्नाचा दाखला (Parental Income Certificate)
रहिवासी दाखला (Domicile Certificate)
गुणपत्रके (Marksheets)
शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याचा पुरावा / अर्ज पावती
कॉलेज प्रवेश पावती व बोनाफाइड प्रमाणपत्र
भाडे करारनामा (Rent Agreement) / खानावळ (Mess) पावती
बँक पासबुक प्रत (बँक खाते आधारशी लिंक असणे अनिवार्य)
आधार कार्ड
- सर्व माहिती आणि कागदपत्रे तपासल्यानंतर ऑनलाईन अर्ज सबमिट करा.
- सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढा आणि संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथे जमा करा.
