उत्तम प्रशासक

पल्स २०२६: महाराष्ट्राच्या आरोग्य क्रांतीचा नवा अध्याय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेली ‘पल्स २०२६’ ही आंतरराष्ट्रीय परिषद (जागतिक आरोग्य शिखर परिषद) महाराष्ट्राला जगाच्या आरोग्य पटलावर नेणारी एक अनोखी परिषद ठरली. या परिषदेत आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक वैद्यकीय शिक्षण आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधांचा एक प्रभावी संगम दिसून आला. विकसित महाराष्ट्र २०४७ चे स्वप्नं उराशी बाळगून, आरोग्य क्षेत्राला सामाजिक उत्तरदायित्वासोबतच आर्थिक विकासाचे आणि नवनिर्मितीचे मुख्य केंद्र बनवण्याच्या उद्देशाने, जगभरातील नामवंत डॉक्टर्स, संशोधक आणि उद्योगपतींना एकाच व्यासपीठावर आणण्यात आले होते. महाराष्ट्राने आगामी 5 दशकातील आरोग्य व्यवस्थेची आणि वैद्यकीय शिक्षणाची दिशा या परिषदेच्या माध्यमातून निश्चित केली. डिजिटल हेल्थ, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रीवर आधारित ही परिषद महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रातील नव्या परिवर्तनाचा राजमार्ग ठरणार आहे.

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे संपन्न झालेली दोन दिवसीय ‘पल्स २०२६’ (प्लॅटफॉर्म फॉर युनिफाईड लर्निंग, स्किल्स, हेल्थ अ‍ॅण्ड एज्युकेशन) ही आंतरराष्ट्रीय परिषद महाराष्ट्राच्या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक वळण ठरणार आहे. राज्याला जागतिक स्तरावरील आरोग्य केंद्र (ग्लोबल हेल्थकेअर हब) म्हणून प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आयोजित या परिषदेत जगभरातील १३० हून अधिक नामवंत डॉक्टर्स आणि २९०० पेक्षा जास्त संशोधकांनी सहभाग नोंदवला होता. ही परिषदेत आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि धोरणात्मक भागीदारी यावर सखोल चर्चा झाली. काही निर्णय घेण्यात आले. राज्याची भविष्यातील आरोग्य व्यवस्थेची दिशा स्पष्ट करण्याच्या उद्देशाने तसेच फ्युचर रेडी हेल्थकेअर इकोसिस्टम निर्माण करण्यासाठी या परिषदेत प्रामुख्याने सहा स्तंभांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. ज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण सुधारणा, आरोग्य व्यवस्थेत एआय तंत्रज्ञानाचा वापर, वैद्यकीय पर्यटन आणि पायाभूत सुविधांचा विकास यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला.

 'पल्स 2026 – ग्लोबल फ्युचर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड हेल्थकेअर'

दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासाठी युनिफाईड लर्निंग प्लॅटफॉर्म

वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा जागतिक स्तरावर नेण्यासाठी या परिषदेत युनिफाईड लर्निंग प्लॅटफॉर्म विकसित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मेडिकल सेक्टरमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी देण्याबरोबरच त्यांना प्रत्यक्ष कौशल्य शिकवण्यावर सरकारचा भर असणार आहे. भविष्यातील आरोग्य विषयक आव्हाने पेलण्यासाठी, तसेच या क्षेत्रातील मनुष्यबळ अधिक सक्षम व्हावे, याकरिता विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे हाताळण्याविषयीच्या कौशल्यांचा थेट अभ्यासक्रमात समावेश केला जाणार आहे. विशेषतः ३६० डिग्री डोममध्ये रोबोटिक सर्जरी आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीच्या माध्यमातून दिले जाणारे प्रशिक्षण महाराष्ट्राला वैद्यकीय संशोधनात देशात अग्रस्थानी नेणारे ठरेल. यासोबतच ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टरांचे कार्यबल तयार करून प्रत्येक नागरिकाला त्याच्या घरापासून ५ ते ८ किलोमीटरच्या परिसरात दर्जेदार सेवा मिळवून देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेडिकल कॉन्क्लेव्ह - 'पल्स 2026

मेडिकल सेक्टरमध्ये टेक्नॉलॉजीच्या वापरावर भर

सरकारकडे उपलब्ध असलेला मोठ्या प्रमाणातील वैद्यकीय डेटा कृत्रिम बुद्धिमत्तेशी (AI) जोडून आरोग्य क्षेत्रातील डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अधिक बळकट केले जात आहे. याद्वारे कर्करोग आणि क्षयरोग यासारख्या आजारांचे लवकर निदान करण्यासाठी विशेष प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहेत. कर्करोग उपचारांसाठी महाकेअर हे त्रिस्तरीय मॉडेल राबवले जाणार आहे. या मॉडेलच्या माध्यमातून जिल्हास्तरावर निदान, प्रादेशिक स्तरावर उपचार आणि उच्चस्तरावरील केंद्रांमध्ये प्रगत सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. टेलिमेडिसिन आणि ई-संजीवनी सारख्या डिजिटल माध्यमांमुळे आता दुर्गम भागातील रुग्णांनाही तज्ज्ञांचा सल्ला मिळणे सोपे होणार आहे. याशिवाय, जीवशास्त्रातील संशोधनाला (लाईफ सायन्सेस रिसर्च) प्रोत्साहन देण्यासाठी आणि पीएचडी स्तरावरील संशोधनासाठी सरकार भरीव आर्थिक मदत उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर नागपूर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थची स्थापना करून सार्वजनिक आरोग्य धोरणांना नवीन गती दिली जाणार आहे.

आरोग्य क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी या परिषदेत ७२० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. ज्यामुळे औषधनिर्माण आणि वैद्यकीय उपकरण निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्राला मोठी झेप घेणे शक्य होणार आहे. मेडिकल फिल्डशी संबंधित उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी इज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत ३३ पैकी २० परवानग्या स्व-प्रमाणावर आणून प्रशासकीय प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली आहे. वीज दरात टप्प्याटप्प्याने कपात करून आणि मैत्री पोर्टलद्वारे सेवांचा मागोवा घेऊन उद्योजकांसाठी एक स्पर्धात्मक वातावरण तयार केले जात आहे. महाराष्ट्राला वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी महाराष्ट्र ब्रॅण्ड विकसित केला जात आहे. यामुळे विदेशी पर्यटकांसाठी महाराष्ट्र हे अत्याधुनिक, दर्जेदार आणि चांगल्या उपचारांचे ठिकाण ठरेल. विकसित महाराष्ट्र २०४७चे स्वप्नं साकारताना आरोग्यसेवा ही फक्त सामाजिक जबाबदारी न राहता आर्थिक प्रगतीचे आणि नवनिर्मितीचे मुख्य केंद्र बनावे, असा विश्वास या परिषदेतून दिला गेला आहे. अशाप्रकारे, पल्स २०२६ ही परिषद महाराष्ट्राला भविष्यातील आरोग्य क्षेत्रातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज करणारी परिषद ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *