गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानात झालेला अनपेक्षित बदल आणि सतत पडणारा अवकाळी पाऊस यामुळे राज्यातील शेती आणि शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झालेला अवकाळी पावसाचा तडाखा एप्रिल २०२६ पर्यंत सुरू होता. त्यामुळे राज्यातील लाखो हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. या अवकाळी पावसाचा साधारण ६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना थेट फटका बसला आहे. या बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मधील अवकाळीच्या नुकसानीपोटी एकत्रित १६६ कोटी ३६ लाख रुपयांचा मदतनिधी मंजूर केला आहे.
बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न…
सातत्याने पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेती आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी, तसेच त्याला मानसिक स्थैर्य मिळावे यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा मदतनिधी मंजूर केला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये नागपूर विभागातील नागपूर, भंडारा आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या २ हजार २९४ बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने १ कोटी ५३ लाख ५२ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
अवकाळी पावसामुळे नागपूर, भंडारा आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांतील साधारण १३४०.४४ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर पाठोपाठ मार्च महिन्यातही राज्याला अवकाळी पावसाचा तीव्र तडाखा बसला. मार्च महिन्यातील नुकसानीपोटी राज्य सरकारने राज्यातील १९ जिल्ह्यांसाठी तब्बल १६४ कोटी ८३ लाख ४४ हजार रुपयांच्या भरघोस निधी वितरणास मंजुरी दिली. सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी करत प्रशासनाने मदतीचे शासन निर्णय १८ मे २०२६ रोजी प्रसिद्ध केले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे १९ जिल्ह्यांतील १ लाख ६७ हजार ५९५ बाधित शेतकऱ्यांना तर नागपूर विभागातील ३ जिल्ह्यातील २,२९४ बाधित शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून मदत मिळणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने एप्रिल २०२६ मध्ये सातारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेत तेथील शेतकऱ्यांसाठीही ६० लाख ४९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
डीबीटीद्वारे बँक खात्यात जमा होणार मदतनिधी
मार्च २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या भागांमध्ये पुणे विभागातील पुणे आणि सांगली; नागपूर विभागातील नागपूर आणि चंद्रपूर; कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी; छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड, धाराशिव, जालना, लातूर आणि हिंगोली; अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ आणि वाशिम, तसेच नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण मदत २४ जानेवारी २०२३ च्या निर्णयानुसार डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे, यामुळे निधी वाटपात पारदर्शकता असणार आहे.
राज्य सरकारने सदर मदतनिधीचे वाटप करताना एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चालू हंगामामध्ये यापूर्वीच्या पिकांच्या नुकसानीकरीता वितरित केलेल्या मदतनिधीमध्ये नव्याने मागणी केलेल्या निधीचा समावेश केलेला नाही. ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत राज्यातील सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला आहे. त्यातील जानेवारी ते मार्च २०२६ या तीन महिन्यांच्या काळात अवकाळीची तीव्रता अधिक होती. या काळात १ लाख ४५ हजार ६०६ हेक्टर क्षेत्रावरील केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे यासारख्या नगदी पिकांसह गहू, हरभरा आणि ज्वारी या हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने कोट्यवधींचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित लेख:
