महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६ हा कायद्याची अधिसूचना राज्य सरकारने प्रसिद्ध केली असून, २८ ऑगस्ट २०२६ पासून महाराष्ट्रात हा कायदा लागू झाला आहे. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ नुसार, एखाद्या व्यक्तीची फसवणूक करून, बळजबरीने किंवा जबरदस्ती धर्मपरिवर्तन केल्यास तो गुन्हा ठरणार आहे. या नवीन धर्मांतर कायद्यातील तरतुदीनुसार दोषी व्यक्तीला ७ वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

अनैतिक धर्मांतराला पायबंद
मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक, २०२६ हे दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून या कायद्याला मंजुरी मिळाली. राष्ट्रपतींच्या सहीनंतर हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६, हा राज्यातील सामाजिक सलोखा, धार्मिक स्वातंत्र्य आणि कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आणलेल्या या कायद्याचा मुख्य उद्देश बळजबरी, प्रलोभने, फसवणूक किंवा कपटपूर्ण मार्गाने होणाऱ्या धर्मांतराला पायबंद घालणे हा आहे. भारतातील घटनेने प्रत्येक नागरिकाला आपल्या आवडीनुसार धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. पण या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन अनैतिक किंवा दबावाखाली होणारे धर्मांतर सामाजिक रचनेला तडे देऊ शकते. याच पार्श्वभूमीवर समाजातील दुर्बल घटक, महिला आणि आदिवासी बांधवांचे संरक्षण करण्यासाठी या कठोर कायद्याची निर्मिती करण्यात आली.
सर्व धर्मांचे संरक्षण सरकारचे संवैधानिक कर्तव्य!
या नवीन कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला आमिष दाखवून, धमकावून किंवा लग्नाचे खोटे आमिष देऊन धर्मांतर करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक दंडात्मक आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. यामुळे बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्यांवर मोठा वचक बसणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही स्पष्ट केले आहे की, हा कायदा कोणत्याही विशिष्ट धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात नाही. तो नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे आणि स्वेच्छेने निवडलेल्या धार्मिक विश्वासाचे रक्षण करण्यासाठी आहे. फसवणुकीवर आधारित धर्मांतर हे धार्मिक स्वातंत्र्याचा अनादर करणारे कृत्य आहे. अशा घटनांना अटकाव करणे हे सरकारचे संवैधानिक कर्तव्य असून, राज्य सरकारने त्यादृष्टीने हा कायदा आणला आहे.
कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी
- धर्मांतर करण्यापूर्वी ६० दिवसांची नोटीस बंधनकारक
- संबंधितांना नोटीशीवर तक्रार नोंदवता येणार
- धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीचे नातेवाईक तक्रार करू शकतात
- आईचा धर्म तोच मुलाचा धर्म
- जबरदस्ती धर्मांतराचा गुन्हा अजामीनपात्र गुन्हा
- दोषी व्यक्तीला ७ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते
या कायद्याच्या अमलबजावणीमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होईल. तसेच, धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या घटकांना आळा बसून विविध समाजांमध्ये परस्पर विश्वास आणि बंधुभाव वाढीस लागेल. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक मानले जात आहे. एकंदरीत, महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ हा राज्याच्या सामाजिक सुरक्षेसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या खऱ्या अर्थाने असलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या जपणुकीसाठी एक क्रांतिकारी व दूरगामी परिणाम करणारा निर्णय ठरणार आहे.
संबंधित लेख:
