महाराष्ट्राने मागील दोन वर्षांत ऊर्जा क्षेत्रात केलेल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे राज्याची प्रतिमा जागतिक स्तरावर उंचावली आहे. ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा ऊर्जा विभाग आणि विशेषकरून महावितरणने टेक्निकल इनोव्हेशन, ग्राहक सेवा आणि शाश्वत ऊर्जा निर्मितीमध्ये नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे मागील २ वर्षापासून राज्याच्या ऊर्जा क्षेत्राला २१ पेक्षा जास्त प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या यशामागे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेली ऊर्जा परिवर्तनाची धोरणे अत्यंत महत्त्वाची ठरली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात साकारलेली ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ ही ऊर्जा क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल ठरली आहे. शेतकऱ्यांना दिवसा हक्काची आणि शाश्वत वीज उपलब्ध करून देणाऱ्या या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित प्रकल्पासाठी राज्याला ‘इंडियन स्मार्ट ग्रीड फोरम’चा प्रतिष्ठित ‘डायमंड पुरस्कार’ आणि ‘स्टेट लेव्हल एक्सलन्स अवॉर्ड इन एनर्जी ट्रान्झिशन’ यांसारखे प्रतिष्ठित असे पुरस्कार मिळाले आहेत. या योजनेद्वारे १६,००० मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले, यामुळे राज्याची वीज खरेदीच्या खर्चात १० हजार कोटींची वार्षिक बचत होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीलाही चालना मिळत आहे. यासोबतच ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर राहिल्याने राज्याची सौर ऊर्जेतील आघाडी अधोरेखित झाली आहे.
सोलर मॅन देवेंद्र फडणवीस!
सोलर मॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर ऊर्जेच्या क्षेत्रात उभे केलेले काम प्रभावशाली आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज आपले राज्य‘ग्रीन महाराष्ट्र’ या दिशेने वाटचाल करत आहे. योजनाबद्ध आणि विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोनामुळे महाराष्ट्र सौर ऊर्जा उत्पादनात देशात आघाडीवर आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, सौर कृषीपंप योजना, पाणीपुरवठा प्रकल्पांसाठी सौर ऊर्जेचा वापर आणि घराघरात मोफत वीज पोहोचवणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीस दिलेली चालना यामुळे त्यांची महाराष्ट्राचे ‘सोलर मॅन’ अशी नवी ओळख निर्माण होऊ लागली आहे.
महाराष्ट्राचे सर्वोत्कृष्ट वीज वितरण
राष्ट्रीय स्तरावर दिल्ली येथे आयोजित विविध शिखर परिषदांमध्ये महावितरणला ‘सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी’ (Power Distribution) म्हणून गौरविण्यात आले आहे. विशेषतः नवी दिल्लीतील ‘नॅशनल एनर्जी लीडरशिप समिट’मध्ये ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांना ‘वूमन इन एनर्जी अवॉर्ड’ आणि महावितरण कंपनीला ‘एनर्जी कंपनी ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ऊर्जा विभागाने तयार केलेल्या ‘रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅन’मुळे राज्याची नवीकरणीय ऊर्जा क्षमता १३ टक्क्यांवरून ५२ टक्क्यांपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष गाठणे आता शक्य झाले आहे. महावितरणने वीज मागणीच्या अचूक अंदाजासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (AI) जो प्रभावी वापर केला, त्याची दखल घेत ‘फिक्की’ने (FICCI) देखील महावितरण कंपनीचा गौरव केला आहे.
ऊर्जा क्षेत्रातील यशाची गुंज सातासमुद्रापार!
महाराष्ट्राच्या या यशाची गुंज सातासमुद्रापारही पोहोचली आहे. इंग्लंडच्या ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ या संस्थेने महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल ‘एनर्जी लीडरशिप अवॉर्ड २०२५’ प्रदान केला. तसेच, लोकसहभागातून राबवलेल्या ‘शून्य विद्युत अपघात’ जनजागृती मोहिमेने आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. थायलंड येथे ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मिळालेला ‘बिझनेस टायटन्स अवॉर्ड’ हा देखील राज्याच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. तांत्रिक सुधारणांसोबतच ग्रामीण भागातील महिला बचत गटांना आणि छोट्या व्यावसायिकांना आर्थिक संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘महापॉवरपे वॅलेट’ सारख्या डिजिटल उपक्रमांना मिळालेले यश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अंत्योदय’ विचारांचे प्रतिबिंब आहे.
एकूणच, वीज दरातील कपात, अक्षय ऊर्जेवर दिलेला भर आणि पारदर्शक प्रशासकीय कामामुळे महाराष्ट्र आज देशाच्या ऊर्जा क्रांतीचे केंद्र बनले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मिळालेले हे २१ पुरस्कार केवळ राज्याचा गौरव नसून, महाराष्ट्राला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आणि प्रगत बनवण्याच्या दिशेने पडलेले एक भक्कम पाऊल आहे.
ऊर्जा विभागाला मिळालेले विविध पुरस्कार
- नॅशनल एनर्जी कॉन्सर्व्हेशन अवॉर्ड्स, २०२५
- महावितरणला ६ राष्ट्रीय पुरस्कार
- महावितरण सर्वोत्कृष्ट वितरण कंपनी, राष्ट्रीय पुरस्कार
- उत्कृष्ट इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, राष्ट्रीय पुरस्कार
- आरएफ मीटरिंग आणि ग्राहक सेवेत नावीन्यपूर्ण प्रयोग, राष्ट्रीय पुरस्कार
- वेगवान ग्रामीण विद्युतीकरण, राष्ट्रीय पुरस्कार
- वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स, इंग्लंड
- बिझनेस टायटन्स अवॉर्ड
- मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक
- एनर्जी लीडरशिप अवॉर्ड, नवी दिल्ली
- वूमन इन एनर्जी अवॉर्ड, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला
- एनर्जी कंपनी (पॉवर) अवॉर्ड, महावितरण
- स्टेट लेव्हल एक्सलन्स ॲवॉर्ड इन एनर्जी ट्रान्झिशन, राष्ट्रीय पुरस्कार
- एनर्जी लीडरशिप अवॉर्ड २०२५, इंग्लंड
- महावितरणची आशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
- बेस्ट इनोव्हेशन इन पॉवर / एनर्जी
- अॅवार्ड फॉर एक्सलेन्स इन ट्रेनिंग
- बेस्ट एन्वायरनमेंट फ्रेंडली प्रोजेक्ट
- सीएमडी ऑफ द इयर
- लिडरशिप एक्सलेन्स इन टेक्नोलॉजी इनोव्हेशन
- प्राईड ऑफ द प्रोफेशन
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, कल्पक ऊर्जा प्रकल्प, डायमंड पुरस्कार
- महावितरण सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी
- युटिलायझेशन कॉन्फरन्स एक्स्पो अवॉर्ड्स २०२४ (२ पुरस्कार)
संबंधित लेख:
