ओबीसी | नागपूर

नागपूरमध्ये साकारतंय बहुजनांच्या हक्काचं ‘महाज्योती’ भवन; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या पुढाकारातून ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)’ या संस्थेची निर्मिती झाली आहे. ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक आणि महिलांना शिक्षण, प्रशिक्षण, नोकरी तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही संस्था आजच्या काळातील एक अत्यंत महत्त्वाची पायाभूत रचना ठरली आहे. नागपूर येथे महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीचे (महाज्योती भवन) भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १९ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडले.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारने २०१६ मध्ये ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करून एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्या विभागांतर्गत सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांमधून ओबीसी समाजातील नव्या पिढीला बळ देण्याचे काम वेगाने सुरू झाले. त्यानंतर सरकारने बार्टी आणि सारथीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजघटकांसाठी जुलै २०१९ मध्ये महाज्योती संस्थेची स्थापना केली. महाज्योती फक्त एक शैक्षणिक किंवा प्रशासकीय संस्था न राहता, ती ओबीसी समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा मिळाव्यात, त्यांना संशोधन व प्रशिक्षणाच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेता यावी, यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे, महाज्योतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएच.डी., स्पर्धा परीक्षा आणि इतर अभ्यासक्रमांसाठी दर्जेदार मार्गदर्शन व आधार मिळत आहे. त्याचा थेट परिणाम त्यांच्या यशामधून दिसत आहे.

नागपूर येथे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थांचा सत्कार

होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्नं साकार होणार!

महाज्योतीच्या माध्यमातून आज राज्यभरात ६० हून अधिक वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. ज्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. याशिवाय, ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांमधून १५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळत आहे. या संधीमुळे ओबीसी समाजातील तरुणांना स्वाभिमानाने स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी मिळत आहे. या संधीमुळे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडून येत आहे. त्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आणि त्यांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने महाज्योतीसाठी भरीव निधी देखील उपलब्ध करून दिला आहे. नागपूरमध्ये उभारण्यात येणाऱ्या या संस्थेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे आता कार्यक्षमता आणि सेवा पोहोचवण्याची व्याप्ती आणखी वाढणार आहे. नागपूरमधील ही ७ मजली इमारत भविष्यात हजारो विद्यार्थ्यांच्या आकांक्षांचे केंद्र ठरेल. अत्याधुनिक सुविधा, अभ्यास कक्ष, नियंत्रण कक्ष, ट्रेनिंग सेंटर आणि ५०० आसन क्षमतेचे ऑडिटोरियम यासारख्या सुविधांमुळे महाज्योतीचा उपयोग अधिक व्यापक आणि प्रभावी होणार आहे. या इमारतीत २४८ विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय असणार आहे. दरम्यान, नाशिक येथे देखील महाज्योतीचे प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी विभागाकडून १७४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर'च्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

‘बार्टी’, ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’

महाज्योतीची स्थापना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या ‘बार्टी’ आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या ‘सारथी’ या संस्थांच्या धर्तीवर करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा फुले या त्रिकुटाने समाजात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्रांती घडवून आणली आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, वंचित आणि मागासवर्गीय समाजासाठी धोरणात्मक कामकाज करण्याच्या हेतूने या संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. २२ डिसेंबर १९७८ मध्ये बार्टी, तर २५ जून २०१८ मध्ये सारथी आणि ३० जुलै २०१९ मध्ये महाज्योती संस्थेची स्थापना करण्यात आली. महाज्योती संस्थेची स्थापना म्हणजे ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी देवेंद्र फडणवीस सरकारच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. ही संस्था आता ओबीसी समाजाच्या नव्या पिढीच्या आत्मनिर्भरतेचा पाया बनू लागली आहे. या सरकारने ओबीसी समाजासाठी नॉन-क्रिमिलिअरची मर्यादा वाढवून ८ लाख रुपये केली आहे. या निर्णयाचाही ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत आहे. या सर्व निर्णयांतून सरकारची ओबीसी समाजबांधवांबद्दल असलेली कल्याणकारी भूमिका आणि बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते.

महाज्योती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना

महाज्योती संस्थेमार्फत राज्य सरकारतर्फे प्रशिक्षण योजना, अर्थसहाय्य योजना आणि इतर उपक्रम योजना अशा तीन प्रकारच्या योजना राबवल्या जातात. प्रशिक्षण योजनेंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, एमपीएससीच्या ब आणि क गटासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व प्रशिक्षण, युजीसी, सीएसआयआर-नेट आणि महाराष्ट्र सेट या परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षण, आयबीपीएस बँक परीक्षा पूर्व प्रशिक्षण, सैनिक भरती पूर्व प्रशिक्षण, कौशल्य विकास आदी योजना राबवल्या जातात. अर्थसहाय्य योजनेंतर्गत पीएचडीकरीता अर्थसहाय्य योजना आणि स्पर्था परीक्षा अर्थसहाय्य योजना राबवली जाते. तर इतर उपक्रमांतर्गत विविध अभ्यासक्रमांसाठी पूर्व प्रशिक्षण, पुस्तक संच वाटप आणि मुलींसाठी वसतिगृह योजना राबवली जाते.

आज महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी समाजातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमधून यश मिळवत आहेत. उच्च शिक्षण घेत आहेत. स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहेत आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होत आहेत. हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने घेतलेल्या निर्णयांमुळे शक्य होत आहे. त्यांच्या नेतृत्वात महाज्योती संस्था हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारी परिवर्तनाचे साधन बनली आहे. सामाजिक समता, शैक्षणिक संधी आणि आर्थिक सशक्तीकरण यांच्या दिशेने टाकलेले हे पाऊल खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक ठोस आणि प्रेरणादायी पायाभूत कार्य ठरत आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *