तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१८ मध्ये घेतलेल्या १ टक्का अनाथ आरक्षणाच्या निर्णयाने महाराष्ट्रातील असंख्य अनाथ तरुण-तरुणींच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने परिवर्तन झाल्याचे दिसून येते आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाभ घेत आज जवळपास ८६२ अनाथ युवक-युवती शिक्षण, नोकरी आणि समाजातील विविध प्रवाहात सामील झाले आहेत. ज्यांच्या वाट्याला कुटुंब, आधार किंवा पाठबळ नव्हते, अशा मुलांसाठी हे आरक्षण म्हणजे नवे आयुष्य आणि नवी दिशा देणारे ठरले.
देवेंद्र फडणवीस सरकारने २०१४ – १९ या कालावधीत १ टक्का अनाथ आरक्षण लागू करून १८ वर्षांवरील अनाथ मुलांसाठी शिक्षण आणि रोजगारासाठी मोठी संधी निर्माण करून दिली. महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या अनाथ आरक्षणाच्या निर्णयामुळे राज्यातील ८६२ अनाथ युवकांच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळाली आहे. महाराष्ट्र सरकार सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनाथ तरुणांसाठी शासकीय नोकरी व शिक्षणाच्या योजना प्रभावीपणे राबवत आहे. संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या ‘संधीची समानता’ या तत्त्वाने प्रेरित होऊन हे आरक्षण तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने दिले होते. समानता ही फक्त सामाजिक आरक्षणापुरती मर्यादित न राहता समाजातील अनाथ, दिव्यांग आणि इतर वंचित घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे, या विचारातून हा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला. या आरक्षणामुळे महाराष्ट्रातील अनाथ मुलांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधीबरोबरच आत्मविश्वास, स्थैर्य आणि समाजात सन्मानाने उभे राहण्याचा अधिकार मिळाला. या पार्श्वभूमीवर आणि महायुती सरकारला ५ डिसेंबर २०२५ रोजी १ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन सरकारी सेवेत रुजू झालेल्या अनाथ मुलांशी संवाद साधून वर्षपूर्तीच्या दिवसाची सकारात्मक ऊर्जेने सुरूवात केली. यावेळी अनेक तरुण-तरुणींनी आपल्या संघर्षाची आणि यशाची कहाणी सांगून राज्य सरकारचे आभार मानले. दारिद्र्य, एकाकीपणा आणि अपूर्ण स्वप्नांमधून मार्ग काढत आज हे युवक विविध जबाबदार पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या डोळ्यांत दिसणारी कृतज्ञता, आत्मविश्वास आणि नव्या स्वप्नांची चमक ही या निर्णयाची खरी पावती ठरली आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेषत्वाने सांगितले की, सरकार वेळोवेळी अनेक निर्णय घेत असते. पण काही निर्णय मनाला गहिवर देणारे असतात. त्यातीलच हा एक निर्णय आहे.

आज घ्यायला नाही सर, काही द्यायला आलोय…
मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास अनेक अनाथ तरुण-तरुणी उपस्थित होते. हे तरुण परिस्थितीशी झगडून स्वत:च्या हिमतीने इथपर्यंत आले आहेत. त्यांना अर्थात महाराष्ट्र सरकारने आरक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याने या तरुणांनी या संधीचे सोनं करत आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. यासाठी त्यांनी सरकारचे आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. कृतज्ञता व्यक्त केली. एका तरुणाने आपल्या भावना कवितेतून मांडताना म्हटले की, आज घ्यायला नाही सर, तर द्यायला आलोय, तुम्ही आरक्षण दिलं, दारिद्र्यातून बाहेर आलोय. या ओळीतून या तरुणाने आपले अस्तित्व कसे निर्माण झाले, हे सांगितले. सरकारच्या त्या एका निर्णयामुळे या मुलांचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे आणि आता ती अभिमानाने सांगत आहेत की, आज घ्यायला नाही सर, तर द्यायला आलोय. हे सरकारचे यश आहे. एका निर्णयामुळे समाजातील एका वंचित घटकाला न्याय मिळाला आणि त्यांच्या जीवनाचे नंदनवन झाले.

२०१८ मधील या आरक्षणाच्या निर्णयापासून २०२५ पर्यंतचा प्रवास म्हणजे सामाजिक न्यायाचा विजय आणि परिवर्तनाचा उत्सव आहे. या उपक्रमाने अनाथ मुलांचे जीवन उजळलेच, पण समाजालाही संवेदनशील आणि समताधिष्ठित दिशेने नेण्याची प्रेरणा दिली. एका योग्य संधीने आयुष्य कसे बदलू शकते, हे या ८६२ युवक-युवतींच्या यशस्वी कथांनी सिद्ध केले आहे. स्वप्नं पाहण्याची, त्यासाठी झगडण्याची आणि योग्य संधी मिळाल्यास उंच भरारी घेण्याची ताकद प्रत्येकात असते, हे यातून सिद्ध होते. या आरक्षणाने त्या ताकदीला दिशा आणि आधार दिला.
संबंधित लेख:
