मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यातील मुंबईची रूपरेषा आणि युवाशक्तीची भूमिका प्रभावी शब्दांत मांडत तरुणांना लोकशाहीच्या केंद्रस्थानी आणण्याची गरज अधोरेखित केली. त्याचबरोबर तरुणांनी प्रत्यक्ष राजकारणात येऊन शहरांच्या पायाभूत सोयीसुविधांमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी आणि त्यांचा जागतिक स्तरावर विकास करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
मुंबईतील वरळी डोम येथे इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाईट नेशन्स (आय.आय.एम.यू.एन.) यांनी आयोजित केलेल्या युथ कनेक्ट कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांशी मनमोकळा संवाद साधत लोकशाहीत त्यांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले. ‘आजचा तरुण हा फक्त प्रेक्षक नाही, तर तो लोकशाहीचा महत्त्वाचा घटक आहे,’ असे सांगत त्यांनी तरुणांना निर्णयप्रक्रियेचा भाग बनण्याचे आवाहन केले. तरुणांच्या आवाजाला राजकीय सिस्टीममध्ये स्थान मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये ३५ वर्षांखालील युवकांना मोठ्या प्रमाणात संधी देण्याची त्यांनी घोषणा केली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जवळपास ४० टक्के तरुणांना निवडणुकीची तिकिटे देऊन त्यांना प्रत्यक्ष राजकारणात नेतृत्वाची संधी दिली जाणार आहे. लोकशाही सशक्त होण्यासाठी नव्या पिढीची ऊर्जाशक्ती आणि त्यांचे नवे विचार महत्त्वाचे असून त्यांनी, आपल्या शहराच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मुंबईसाठी ‘पाताळ लोक’ भूमिगत नेटवर्क उभारणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या भविष्यातील विकासाची इत्यंभूत माहिती उपस्थित तरुणांना दिली. यामध्ये वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मुंबईमध्ये अत्याधुनिक भूमिगत बोगद्यांचे विस्तृत जाळे उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी सांगितली. ज्याला त्यांनी ‘पाताळ लोक’ बोगदा प्रकल्प असे नाव दिले. हे भूमिगत नेटवर्क विद्यमान रस्ते व्यवस्थेचे पर्यायी शॅडो नेटवर्क ठरेल आणि संपूर्ण शहराला अनेक दिशांनी अखंडपणे जोडेल. बोगद्यांच्या या जाळ्यामुळे मुंबईतील प्रवासाचा वेग लक्षणीयरीत्या वाढेल आणि दैनंदिन कोंडीचा त्रास कमी होईल. २०३२ पर्यंत हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले. हे नेटवर्क बांद्रा सी लिंक, बीकेसी कनेक्टर, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि शहरातील इतर प्रमुख मार्गांना जोडणार आहे.

मुंबईच्या चारी दिशांना कनेक्टिव्हिटी!
मुंबईतील ईस्ट आणि वेस्ट भाग तसेच नॉर्थ मुंबई आणि साऊथ मुंबईला जोडण्यासाठी अनेक पूल, उड्डाणपूल आणि लिंक रोड्स उभारले जात आहेत. शिवडी – वरळी दरम्यानच्या नव्या उड्डाणपुलामुळे दोन्ही भागांतील प्रवासवेळ मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. तसेच शहरात मुक्त वाहतुकीला चालना देण्यासाठी ‘फ्री-फ्लो ब्रिजेस’ उभारण्याचेही काम सुरू केले. याबरोबर मुंबईतील लोकल ट्रेन सेवा टप्प्याटप्प्याने वातानुकूलित केली जाणार आहे. हे करताना त्या एसी ट्रेनच्या भाड्यात कोणतीही वाढ केली जाणार नाही. मुंबई मेट्रो प्रकल्पांचा विस्तार करून आणि ‘पाताळ लोक’ या संकल्पनेची सांगड घालून मुंबईची वाहतूक व्यवस्था जगातील प्रगत शहरांच्या बरोबरीने आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकार प्रयत्न करत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तरुणांना सल्ला
- तरुणांनी पुढे यावे, नेतृत्व घ्यावे आणि शहराच्या विकासाला हातभार लावावा.
- तरुणांनी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारून राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा.
- शहरांच्या विकासाची सूत्रे स्वतः हातात घ्यावीत.
- तरुणांनी फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेत न राहू नये.
- सोशल मीडियावर मतप्रदर्शन करण्यापेक्षा प्रत्यक्ष निर्णयप्रक्रियेत उतरावे.
- युवकांनी टेक्निकल, सामाजिक आणि राजकीय पातळीवर नेतृत्व स्वीकारावे.
मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चर विकास, भविष्यातील विकास आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्पाबरोबरच इथल्या पर्यावरणाच्या गरजाही हे सरकार लक्षात घेत आहे. वाढत्या काँक्रीटच्या जंगलात अधिक ग्रीन स्पेसेस तयार करण्यावर सरकारचा भर देत आहे. उद्याने, मोकळी मैदाने आणि प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक असलेले पर्यावरणपूरक पायाभूत प्रकल्प यांचा व्यापक आराखडा प्रशासकीय पातळीवर तयार होत असून टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन गोष्टी स्पष्टपणे मांडल्या. त्या म्हणजे जास्तीत जास्त तरुणांनी लोकशाहीत सक्रियपणे सहभाी व्हावे आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्र सरकार भविष्यातील मुंबईला अधिक वेगवान, सुसंगत आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी सज्ज आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी तरुणांच्या नेतृत्वाला चालना देण्याची आणि शहराचे भविष्य बदलण्याची इच्छाशक्ती व्यक्त करत त्यासाठी दिवसरात्र काम करत असल्याचे सांगितले.
संबंधित लेख:
