उत्तम प्रशासक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: नवकल्पना, विकास आणि नव्या महाराष्ट्राचे नेतृत्व

महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांत विकासाची आणि नवकल्पनेची नवी ओळख निर्माण केली आहे. अर्थातच या प्रगतीच्या प्रवासामागे दूरदृष्टी, नियोजन आणि तंत्रज्ञानावर आधारित निर्णय घेणारे कणखर नेतृत्व आहे; ते नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अनेक ‘पहिल्यांदा’च घडवलेले उपक्रम साकार झाले आहेत. देशातील पहिली एआय तंत्रज्ञान आधारित अंगणवाडी, महाराष्ट्रातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजेंट गाव, पहिले सौरग्राम, पहिले पुस्तकांचे गाव, तसेच पहिली डिजिटल चार्जशीट, फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठ, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनसारखे आधुनिक उपक्रम यामधून त्यांच्या दुरदृष्टीपूर्ण विचारांची झलक दिसते. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या एका अनोख्या उंचीवर पोहोचला आहे. तसेच महाराष्ट्राने देशात एक आदर्श निर्माण केला आहे.

राज्याला विकासाची नवी दिशा दाखवणारे आणि नवनवीन उपक्रम राबवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ‘पहिल्यांदा’ घडलेल्या अनेक गोष्टी आहेत. ज्यातील काही गोष्टींमुळे महाराष्ट्राचा गौरव झाला. तर काही गोष्टींमुळे महाराष्ट्राने त्या क्षेत्राची सुरूवात केली. दूरदृष्टी आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून देवेंद्र फडणवीस यांनी आपले प्रशासकीय कौशल्य महाराष्ट्राला वेळोवेळी दाखवून दिले आहे. अनेकवेळा असे दिसून आले आहे की, अंमलबजावणी केली जाणारी गोष्ट खूपच साधी असते. पण त्यासाठी घ्यावा लागणारा निर्णय हा कसोटीचा असतो. त्यासाठी काहीवेळेस राजकीय इच्छाशक्तीचा वापर करावा लागतो. तर काही वेळेस तंत्रज्ञानाची कमाल सर्वसामान्यांना पटवून द्यावी लागते. अशा दोन्ही पातळीवर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात काम करून महाराष्ट्राच्या विकासात भर घातली आहे.

देशातील पहिली ‘एआय’ अंगणवाडी

नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथे देशातील पहिली ‘एआय’ अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे. ही कल्पना फक्त शिक्षणातच नाही, तर लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी टेक्नॉलॉजीचा कसा वापर करता येतो, याचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे. या अंगणवाडीत लहान मुलांना कुत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बडबडगीते, चित्रकला, डान्स शिकवला जातो. त्यासोबतच मुलांचा तार्किक आणि बौद्धिकरीत्या विकास व्हावा यासाठी व्हर्च्युअल रिअ‍ॅलटीच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवावर आधारित प्रशिक्षण दिले जाते. इथे प्रत्येक विद्यार्थ्याला दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची आणि त्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांत होणाऱ्या बदलांची नोंद देखील ठेवली जाते. या एआय अंगणवाडीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ जुलै २०२५ रोजी झाले.

देशातील पहिली ‘एआय’ अंगणवाडी

‘सातनवरी’ भारतातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजेंट गाव!

नागपूरजवळील सातनवरी हे गाव भारतातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजेंट गाव म्हणून ओळखले गेले. गाव विकास, डिजिटल सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण भारताचे नवे रूप या उपक्रमातून दिसून येते. या गावात स्मार्ट व्हिलेज उपक्रमांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. शेतीसाठी सेन्सरच्या मदतीने पाणी देण्याची सोय, तसेच खत आणि कीटकनाशक फवारणीचा अचूक वापर करून उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर दिला जात आहे. या तांत्रिक उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी सेन्सर बसविण्यात आले आहेत. गावकऱ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. सौरऊर्जेचा वापर करून विजेवरील खर्च कमी केला जात आहे. गावातील शाळांमध्ये स्मार्ट एज्युकेशन कीटचा वापर करून विद्यार्थ्यांना देश-विदेशातील शिक्षण पद्धती शिकवल्या जात आहेत. तसेच प्रथमोपचाराच्या सुविधाही तंत्रज्ञानाच्या मदतीने गावातच उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

सातनवरी भारतातील पहिले स्मार्ट गाव

साताऱ्यातील ‘मान्याची वाडी’ पहिले सौरग्राम!

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी हे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम ठरले आहे. पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर आणि शाश्वत विकासाचा संदेश या गावाने राज्याला दिला. राज्या सरकारची माझी वसुंधरा, तर केंद्र सरकारची प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणि ग्रामस्थांच्या योगदानामुळे मान्याची वाडीत सौरग्राम प्रकल्प यशस्वीरीत्या राबविला गेला. इथल्या प्रत्येक घरात १ किलोवॉट, ग्रामपंचायत ऑफिस, शाळा, अंगणवाडीसाठी ५ किलोवॉट, तर विहिरींसाठी ४ किलोवॉटचा स्वतंत्र सौरऊर्जा प्रकल्प आहे.

‘पुस्तकांचे गाव’ भिलार

महाबळेश्वर तालुक्यातील भिलार, जे स्ट्रॉबेरी आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून पूर्वी प्रसिद्ध होते. ते आता राज्यातील पहिले ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून ओळखले जाते. इथली २५ घरे वेगवेगळ्या विषयांची पुस्तकालये झाली आहेत. त्यांची रचना देखील कलात्मकरीत्या करण्यात आली आहे. या घरांमधून १८ वेगवेगळ्या प्रकारच्या शैलीची साधारण २० हजारांहून अधिक पुस्तके वाचकांसाठी ठेवण्यात आली आहेत. ज्यातून वाचन संस्कृतीचा प्रसार होत आहे. मे २०१७ मध्ये पुस्तकाच्या गावाचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. दरम्यान, साताऱ्यातीलच मांघर गावाने देशातील पहिले मधाचे गाव म्हणून नावलौकिक मिळवला आहे. हे गाव महाबळेश्वर तालुक्यात असून, इथले बहुतांश म्हणजे ८० टक्के लोक मधमाशी पालनाचा व्यवसाय करतात.

पुस्तकांचे गाव भिलार

पहिली डिजिटल चार्जशीट नागपुरात दाखल

देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राज्यातील पोलीस विभागाने डिजिटल क्रांतीकडे पाऊल टाकले. स्मार्ट आणि हायटेक अशी ख्याती मिळवलेल्या महाराष्ट्रातील नागपूर पोलिसांनी राज्यातील पहिली डिजिटल चार्जशीट २०१८ मध्ये न्यायालयात सादर केली होती. नागपूरमधील यशोधरानगर पोलिसांना हा मान मिळाला आहे. चोरी केल्या संशयावरून हत्या झालेल्या या प्रकरणात एफआयआर, घटनास्थळाचा पंचनामा, आरोपींचा कबुलीजबाब, जप्ती पंचनामा, साक्षीदारांचे जबाब यासह संपूर्ण प्रकरणाचे चित्रीकरण करून याची डिजिटल चार्जशीट न्यायालयात सादर केली होती. तसेच महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हे तपासासाठी जानेवारी २०२५ मध्ये ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू केली. अशाप्रकारे गुन्हे सिद्धतेकरीता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. मार्च २०१७ मध्ये ४७ सायबर लॅब सुरू करून सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यात राज्याने देशात आघाडी घेतली होती. यासाठी ८३७ कोटी रुपयांचा सुरक्षा प्रकल्प तयार करण्यात आला होता. तसेच त्या काळात ५१ पोलीस ठाणी तसेच न्यायालयात व चौकशीसाठी ३२९ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यंत्रणा उभारण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर विविध ठिकाणांहून येणाऱ्या तक्रारींसाठी ११२ हा एकच क्रमांक देण्यात आला. त्यावेळी मुंबईच्या वेगवेगळ्या भागात १५१० ठिकाणी ४४१७ कॅमेरे बसवण्यात आले होते. या कॅमेऱ्यामुळे अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आले होते.

राज्यातील पहिली 'डिजिटल चार्जशीट'

जगातील पहिले आणि एकमेव न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रात

न्यायवैद्यक विज्ञान क्षेत्रातही महाराष्ट्राने जगात पहिले पाऊल टाकले. कारण येथे जगातील पहिले आणि एकमेव न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाचे भूमिपूजन मे २०२५ मध्ये करण्यात आले. नागपूरमधील कामठी तालुक्यातील चिंचोली गावात ५० एकर जागेवर न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ (नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी) उभे राहणार आहे. राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ हे जगातील पहिले आणि एकमेव न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ आहे. महाराष्ट्रात या नवीन कॅम्पसमुळे ‘कुशल फॉरेन्सिक तज्ज्ञांचा’ समूह तयार होणार आहे. यामार्फत कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना ‘फॉरेन्सिक सायन्स’च्या वैज्ञानिक वापराद्वारे गुन्हे रोखण्यास, कमी करण्यास आणि शोधण्यास मदत होणार आहे.

सॉईल मॅपिंग करणारे देशातील पहिले राज्य

शेतीच्या विकासासाठी मातीची चांगली जाण आणि माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी केंद्रीय कृषी विभागाकडून सॉईल मॅपिंग म्हणजे मातीचा नकाशा तयार केला जात आहे. संपूर्ण राज्याच्या मातीचा डिजिटल नकाशा तयार करण्यात आला आहे. अशा पद्धतीने शेतीसाठी काम करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने राज्य सरकारने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. सॉईल मॅपिंग द्वारे एखाद्या भागातील मातीचे प्रकार, तिची रचना, रंग, रासायनिक व भौतिक गुणधर्म, मातीची सुपिकता, जलधारण क्षमता आदी बाबींचा अभ्यास करून त्याचे मॅपिंग केले जाते. या मातीच्या नकाशामुळे शेतकऱ्यांना कोणत्या पिकासाठी कोणती माती योग्य आहे, हे समजण्यास मदत होते. तसेच पिकासाठी खते, पाणी याचे व्यवस्थापन करण्यास मदत होते.

सॉईल मॅपिंग करणारे देशातील पहिले राज्य

आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे पहिले कॅम्पस

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे पहिले कॅम्पस सुरू झाले आहे. या कॅम्पसमध्ये जगभरातील नावाजलेली विद्यापीठे आपला अभ्यासक्रम सुरू करणार आहेत. यामध्ये यॉर्क विद्यापीठ, अ‍ॅबरडीन विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इन्स्टिट्यूट युरोपियो डी डिझाइन (आयईडी) यांचा समावेश आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) या विद्यापीठांना मुंबईत कॅम्पस स्थापन करण्यासाठी मंजुरी दिली आहे. या विद्यापीठांच्या माध्यमातून इथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुद्धा होत आहे. या शैक्षणिक हबमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाण्याची गरज पडणार नाही. तसेच यामुळे मुंबई हे एक जागतिक शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित होण्यास मदत होणार आहे.

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे पहिले कॅम्पस

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेले हे उपक्रम फक्त तात्पुरत्या गरजा भागवणारे नाहीत, तर भविष्यासाठी मार्गदर्शक आहेत. एआय अंगणवाडीपासून ते सौरग्राम, स्मार्ट गाव, फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठ, डिजिटल चार्जशीट अशा अनेक ‘पहिल्यांदा’ घडवलेल्या उपक्रमांमुळे महाराष्ट्र देशाच्या विकासाच्या नकाशावर एक आदर्श राज्य ठरत आहे. महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांत विकास, तंत्रज्ञान आणि नवकल्पनेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि परिणामकारक नेतृत्वाचा हाच खरा ठसा आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *