मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)च्या माध्यमातून महामुंबई परिसरात दळणवळण आणि वाहतुकीमध्ये सुधारणा करण्यासाठी इन्फ्रा मॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांद्वारे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्याचा संकल्प केला होता. हा संकल्प आता प्रत्यक्षात पूर्ण होण्याच्या मार्गावर येऊ लागला आहे. महामुंबईतील वाहतूक व्यवस्थेच्या या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष ठेवून आहेत आणि हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी खाजगी गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सक्रिय वापर करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीए अंतर्गत साधारण १२ हजार कोटी रुपयांचे १९ वाहतूक आणि दळणवळणाशी संबंधित मुंबईचे विकास प्रकल्प मंजूर केले आहेत. २०४७ पर्यंत एमएमआरडीए क्षेत्रातून जवळपास १.५ ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा त्यांचा रोडमॅप तयार आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार, ग्रीन ट्रान्सपोर्ट सिस्टिम्स, मुंबई ट्रान्सपोर्ट मॉडर्नायझेशन आणि मल्टी-मोडल इंटिग्रेशनचा समावेश असलेली सर्वसमावेशक योजना तयार करण्यात आली. वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीतील तब्बल ९० टक्के प्रणालीचे विद्युतीकरण करण्याची योजना आहे. त्याचबरोबर विविध गोष्टींसाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेपैकी ७० टक्के ऊर्जा पुनर्वापराद्वारे मिळवण्याचा प्लॅन तयार केला जात आहे.
मुंबई मेट्रो
महामुंबईतील मेट्रो नेटवर्क हे या वाहतूक क्रांतीचे केंद्रबिंदू ठरत आहे. सध्या ३३७ किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे एमएमआरडीए रिजनमध्ये उभारले जात आहे. मुंबई मेट्रोच्या १, २, ३, ७ आणि ८ या पाच लाईन्स फुल स्विंगमध्ये सुरू झाल्या आहेत, तर २बी आणि ९ या लाईन्सची चाचणी सुरू आहे. मेट्रो नेटवर्कच्या या विस्तारामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होत आहे. प्रवासाचा कालावधी कमी होत आहे. प्रदूषणातही घट होत असल्याचे दिसून येत आहे. नुकतीच सुरू झालेली मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो मुंबई मेट्रो ३ (अॅक्वा लाईन) या मार्गाला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एमएमआरडीएने मुंबईतील मेट्रो प्रकल्पाची कामे मार्गी लावण्यासाठी जवळपास १०,९७० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातून विविध मेट्रो मार्गांच्या नेटवर्क विस्ताराचे आणि संबंधित सुविधा प्रकल्पांचे काम गतीने पूर्ण केले जाणार आहे.

कोस्टल रोडमुळे मुंबईच्या सौंदर्यात भर!
कोस्टल रोडच्या अंतिम टप्प्याचे ऑगस्ट २०२५ मध्ये लोकार्पण झाल्यानंतर संपूर्ण कोस्टल रोड १५ ऑगस्ट २०२५ पासून नागरिकांसाठी २४ तास खुला करण्यात आला आहे. या रोडमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ झाला आहेच, पण त्याचबरोबर शहराच्या सौंदर्यातही मोठी भर पडली आहे. कोस्टल रोडलगतचा परिसर सुशोभित करण्यात आला असून, सायकल ट्रॅक आणि पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग उभारले गेले आहेत. या रस्त्यामुळे मुंबईकरांचा फक्त वेळ वाचत नाही, तर त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधांचा अनुभव घेता येत आहे. एमएमआरडीएच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मुंबईसाठी जागतिक मापदंडांनुसार पायाभूत सुविधा प्रकल्प साकार होत आहेत. बीकेसीमधील नियोजित सहा एक्झिट पॉईंट्सपैकी पाच पूर्ण झाले असून, शेवटचा पॉईंट डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. नवीन लिंक ब्रिज, बोगदे, उड्डाणपूल आणि २१५ मीटर लांबीचा केबल-स्टे ब्रिज या प्रकल्पांमुळे शहरातील वेगवेगळ्या भागात पर्यायी मार्ग उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना सिग्नल-फ्री प्रवास शक्य होत आहे. शहरातील गर्दीच्या मार्गांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागला आहे.

मुंबई वन अॅप – सबका साथ, सबका विकास
महामुंबईतील वाहतूक व्यवस्थेला डिजिटल स्वरूप देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीए अंतर्गत ‘मुंबई वन अॅप’ ही नवी सुविधा आणली आहे. या अॅपद्वारे मुंबई महानगर प्रदेशातील ११ सार्वजनिक वाहतूक सेवा, मुंबई मेट्रो, उपनगरी रेल्वे, मोनोरेल आणि मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, मीरा-भाईंदर येथील बससेवा या सर्व एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्र आणल्या आहेत. दररोज लाखो प्रवासी या वाहतूक साधनांचा वापर करतात, ज्यासाठी त्यांना अनेक अॅप्स, वेगवेगळी तिकिटे आणि लांबच लांब रांगांचा सामना करावा लागत होता. परंतु आता हे सर्व बदलले आहे. या अॅपच्या मदतीने प्रवासी मेट्रो, लोकल ट्रेन, बस आणि मोनोरेलची तिकिटे एका ठिकाणी बुक करू शकतात, तसेच त्यांना सर्वात जलद, जवळचा आणि सोयीस्कर मार्ग हे अॅप दाखवते. यावरून एकच तिकीट वापरून सर्व वाहतूक साधनांचा उपयोग करता येतो, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ, मेहनत आणि पैसा अशी सर्वांची बचत होत आहे. या अॅपमुळे प्रवाशांचे प्रवासाचे नियोजन सुलभ झाले आहे. लांबलचक रांगा, सुट्ट्या पैशांची समस्या आणि वेगवेगळे अॅप्स वापरण्याची गरज आता संपली आहे. हे अॅप मुंबईकरांसाठी एका नव्या डिजिटल युगाची सुरूवात झाली आहे.

परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’
कुर्ला ते वांद्रे या दोन स्थानकांदरम्यान व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बीकेसी (बान्द्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स) मध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्यांची, बँकांची अधिकृत कार्यालये आहेत. वेगवेगळ्या देशातील कॉन्स्युलेट या भागात आहेत. तसेच या भागात मुंबई उच्च न्यायालय प्रस्तावित आहे. बुलेट ट्रेनचे स्टेशन प्रस्तावित आहे. त्यामुळे या भागातील वर्दळ दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या वाहतूक सुविधांवर मोठा ताण येत आहे. कुर्ला व वांद्रे येथून अगदी काही मिनिटांचे अंतर असलेल्या बीकेसीत जाण्यासाठी मुंबईकरांना ताटकळत वाट पाहावी लागत आहे. यासाठी सरकारने इथे पॉड टॅक्सी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पॉड टॅक्सी ८.८० किमीची असणार असून, त्यावर ३८ स्टेशन्स असणार आहेत. या प्रत्येक पॉड टॅक्सीमध्ये ६ प्रवाशी बसू शकतात आणि ही पॉड टॅक्सी ४० किमी प्रतितास वेगाने धावू शकते. हा प्रकल्प सार्वजनिक – खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर राबवला जाणार आहे. ही सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी. तसेच बीकेसीचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेऊन पॉड टॅक्सीची सेवा जागतिक दर्जाची राहील, यावर राज्य सरकारकडून विशेष भर दिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर महिन्यात प्रस्तावित पॉड टॅक्सीच्या कामाचा आढावा घेऊन त्याला चालना देण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबईतील मेट्रो लाईन्स, उपनगरी रेल्वे सेवांतील सुधारणा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ‘मुंबई इन ५९ मिनिट्स’ ही संकल्पना आता वास्तवात उतरू लागली आहे. येत्या काही महिन्यांत नवीन मेट्रो मार्ग टप्प्याटप्प्याने सुरू होतील, ज्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान, सोयीस्कर आणि ताणमुक्त होईल. यासोबतच मानखुर्द मंडाले येथील मेट्रो ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि मालवणीतील कर्मचारी निवास प्रकल्पांमुळे मेट्रोच्या कार्यक्षमतेत आणि सेवा गुणवत्तेत मोठी सुधारणा अपेक्षित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे मुंबई महानगर प्रदेश आज खऱ्या अर्थाने एका नव्या युगात प्रवेश करत आहे.
संबंधित लेख:
