ठाणे

ठाणे रिंग मेट्रो – शहराच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवणारा प्रकल्प!

ठाणे शहराच्या गतिमान विकासाच्या पार्श्वभूमीवर, या शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ठाणे मेट्रो हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे. ठाणे महापालिका, महामेट्रो आणि राज्य सरकारच्या मदतीने आकारास येणाऱ्या या १२,२०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने मागच्या वर्षी मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळानेही या प्रकल्पासाठी कर्ज घेण्यास मंजुरी दिल्याने, येणाऱ्या दिवसात ठाणे मेट्रो प्रकल्पाला गती मिळणार आहे.

ठाण्याचा हा मेट्रो प्रकल्प ठाणे वर्तुळाकार मेट्रो, जो अधिकृतरित्या ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प म्हणून ओळखला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. ठाणे रिंग मेट्रो हा प्रकल्प ठाणे शहराच्या पश्चिम भागातून जाणारा सुमारे २९ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग असणार आहे. जो शहरातील विविध भागांना वर्तुळाकार स्वरूपात जोडणारा असणार आहे. ठाणे मेट्रो मार्गावर एकूण २२ मेट्रो स्टेशन्स प्रस्तावित असून त्यातील दोन स्टेशन्स ही भूमिगत आणि उर्वरित २० स्टेशन्स ही उन्नत पातळीवर उभारली जाणार आहेत. ‘न्यू ठाणे’ येथून सुरु होणारा मेट्रोचा प्रवास पुन्हा ‘न्यू ठाणे’ येथेच संपणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प शहराच्या विविध भागांना एकसंधपणे जोडणारा आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत सुलभ ठरणार आहे. या मार्गाचे एक टोक उल्हास नदीच्या काठी असून दुसरे टोक संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत आहे. यामुळे प्रवाशांना पर्यावरणाचाही आनंद घेता येणार आहे.

ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, म्हणजेच महामेट्रोमार्फत केली जाणार आहे. नागपूर आणि पुणे मेट्रोच्या यशानंतर महामेट्रो कंपनीला ठाणे महामेट्रोची जबाबदारी देण्यात आली आहे. ठाण्यातील प्रमुख विविध व्यावसायिक केंद्रांना जोडणाऱ्या या मेट्रो प्रकल्पातून नागरिकांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवास करता येणार आहे. यामुळे फक्त रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार नाही, तर वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषणही आटोक्यात येण्यास मदत होणार आहे.

या प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत १२,२००.१० कोटी रुपये आहे. यात केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांची समान भागीदारी आहे. राज्य सरकारने इतक्या मोठ्या प्रकल्पासाठी निधी उभारण्याची जबाबदारी ही पारंपरिक मार्गांपुरती मर्यादित ठेवली नाही. या प्रकल्पासाठी निधी उभारण्याकरता नाविन्यपूर्ण आर्थिक पर्यायांचा अवलंब केला जाणार आहे. जसे की, मेट्रो स्थानकांची नावे खाजगी कंपन्यांच्या संगनमतीने देणे, स्टेशन्सवरील काही भागाचे व्यापारीकरण करणे, तसेच ‘व्हॅल्यू कॅप्चर फायनान्सिंग’ यासारख्या आधुनिक पर्यायांचा वापर केला जाणार आहे. यामुळे प्रकल्पाचा आर्थिक भार थोड्या फार प्रमाणात कमी होण्यास मदत होईल आणि प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल. त्याचबरोबर काही निधी हा वेगवेगळ्या वित्तीय संस्थांकडून सुलभ व्याजदराने कर्ज रूपात घेतला जाणार आहे. या कर्जासाठी राज्य सरकारने आवश्यकतेनुसार हमी देण्यास परवानगी दिली आहे. तसेच प्रकल्पासाठी लागणारे विविध प्रकारचे करार करण्यास देखील मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी लागलेल्या कर्जाची परतफेड मात्र प्राधिकरणाकडून केली जाणार आहे.

ठाणे रिंग मेट्रो ही शहरातील सध्याच्या वाहतुकीला पर्यायी व्यवस्था तर असणारच आहे. पण त्याचबरोबर ती संपूर्ण ठाणे शहराच्या जीवनशैलीत बदल घडवणारी व्यवस्था असणार आहे. दररोज कामावर जाणारा नोकरदार वर्ग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक यांना या मेट्रोमुळे कमी वेळेत सुरक्षित प्रवास करता येणार आहे. २०२९ पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार दररोज सुमारे ६.४७ लाख प्रवासी या मेट्रोसेवेचा लाभ घेतील, असा अंदाज डीपीआरमध्ये नोंदवण्यात आला आहे. पुढील दोन-तीन वर्षांत ही संख्या झपाट्याने वाढून २०३५ मध्ये ७.६१ लाख आणि २०४५ मध्ये ८.७२ लाख इतकी होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे या मेट्रोची गरज आणि उपयुक्तता भविष्यात अधिकच ठळकपणे जाणवणार आहे.

सध्या महामेट्रोने निविदा प्रक्रिया सुरू केली असून, टेंडर दस्तावेज तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या प्रकल्पासाठी विविध कंत्राटे निविदा प्रक्रियेद्वारे वितरित करण्यात येणार आहेत. हे काम वेळेत पार पाडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून संपूर्ण पाठबळ दिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे हा प्रकल्प वेगाने मार्गस्थ होणार आहे. यामुळे ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थेवरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प वाढत्या शहरीकरणाच्या गरजा, पर्यावरणाचे प्रश्न आणि कार्यक्षमतेची गरज या सर्वांचा समन्वय साधत शहराच्या प्रगतीचा खरा केंद्रबिंदू बनेल.

ठाणे रिंग मेट्रो मार्गावरील २२ स्टेशन्स

  • नवीन ठाणे (भूमिगत)
  • रैला देवी
  • वागळे सर्कल
  • लोकमान्य नगर बस डेपो
  • शिवाई नगर
  • निळकंठ टर्मिनल
  • गांधी नगर
  • डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह
  • मानपाडा
  • डोंगरीपाडा
  • विजयनगरी
  • वाघबीळ
  • वॉटरफ्रंट
  • पाटीलपाडा
  • आझादनगर बस थांबा
  • मनोरमा नगर
  • कोलशेत एमआयडीसी
  • बाळकुम नाका
  • बाळकुम पाडा
  • राबोडी
  • शिवाजी चौक
  • ठाणे जंक्शन (भूमिगत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *