टेकसॅव्ही | गुंतवणूक गाथा

वेव्हज २०२५: मुंबईत मनोरंजन, तंत्रज्ञानाचा महोत्सव; महाराष्ट्राच्या नवीन युगाची सुरुवात!

वेव्हज २०२५ – वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अ‍ॅण्ड एंटरटेंन्मेंट समिट हा ४ दिवसांचा दिमाखदार सोहळा मुंबईत नुकताच पार पडला. या समिटमधून महाराष्ट्रात ८ हजार कोटी रुपयांचे करार झाले. ज्यातून येणाऱ्या काळात राज्यात रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारताना मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर आहेच; पण त्याचबरोबर ती देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याही पलिकडे जाऊन मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे. ती एंटरटेन्मेंटची कॅपिटल आहे; आशियातील पहिली चित्रनगरी असलेले शहर आहे. मुंबई हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. मुंबई हे सतत अपग्रेड राहणारं आणि २४ तास सुरू असणारं एक लाईव्ह शहर आहे, याची संपूर्ण जगाला जाणीव करून देत वेव्हज २०२५ मधून राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल यावर विशेष भर दिला.

देवेंद्र फडणवीस हे भारतातील एका प्रगत राज्याचे प्रगत मुख्यमंत्री आहेत. टेक्नॉलॉजी, सोशल मिडिया, ट्रेण्ड, एआयमधील रोजगाराच्या नवनवीन संधी यातील बारकावे त्यांना माहित आहेत. ते स्वत: टेकसॅव्ही आहेत. त्यामुळे वेव्हज २०२५ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी राज्याचे दार जगासाठी खुल केले आहे. ज्या महाराष्ट्राने, मराठी माणसाने भारतात पहिला चित्रपट सुरू करून देशाला चित्रपटसृष्टीची ओळख करून दिली. त्याच महाराष्ट्रातील पुण्यात देशातील पहिली चित्रपट प्रशिक्षण संस्था एफटीआयआय निर्माण केली. तोच महाराष्ट्र आता पुन्हा एकदा मिडिया आणि एंटरटेंन्मेंटच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर स्वार होऊन नवीन युगाची सुरूवात करत आहे. गोरेगावमधील फिल्मसिटीप्रमाणेच पण प्रत्यक्ष लोकेशनवर भर न देता अत्याधुनिक टेक्नोलॉजीचा वापर करून आधुनिक फिल्मसिटी पनवेलमध्ये उभारली जाणार आहे. त्याचबरोबर नागपूरमध्ये जगातील सर्वांत मोठी स्क्रिन असलेले सिनेमा थिएटर उभारले जाणार आहे. मिडिया आणि एंटरटेंन्मेंटचे प्रगत आणि तांत्रिक शिक्षण देणारी विद्यापीठे महाराष्ट्रात येत आहेत. याचे नेतृत्व महाराष्ट्राचे अभ्यासू, टेकसॅव्ही आणि प्रगतीशील नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगदी सक्षमपणे करत आहेत.

सांस्कृतिक अखंडता जपण्यासाठी वेव्हज महत्त्वाचे व्यासपीठ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ते ४ मे या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल अ‍ॅण्ड एंटरटेंन्मेंट समिट – वेव्हज २०२५ (World Audio – Visual and Entertainment Summit – Waves 2025)चे १ मे या दिवशी उदघाटन केले. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला १०० हून अधिक देशातील कलाकार, विविध प्रयोग करणारे कला रसिक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते उपस्थित होते. तंत्रज्ञानाने भरलेल्या २१ व्या शतकात सर्जनशील जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावरील परिणाम वाढत असल्याचे सांगत, यासाठी कला, संगीत, नृत्य आणि गोष्टींचे महत्त्व अधोरेखित करताना आपल्या सर्जनशील परंपरा मजबूत करण्याचे आणि अधिक संवेदनशील भविष्य घडवण्याचे आवाहन केले. आपली सांस्कृतिक अखंडता जपण्यासाठी आणि सकारात्मक मूल्ये रुजविण्यासाठी वेव्हज (Waves 2025) एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरू शकते, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

ही चार दिवसांची शिखर परिषद ‘कनेक्टिंग क्रिएटर्स , कनेक्टिंग कंट्रीज’ या तत्वांवर आधारित भरवण्यात आली होती. जगभरातील निर्माते , स्टार्टअप्स , उद्योजग, नेते आणि धोरणकर्ते एकत्र येऊन भारताला मिडिया, मनोरंजन आणि डिजिटल नवोपक्रमाचे जागतिक केंद्र म्हणून नावारुपास आणण्यास सज्ज आहे. २०२९ पर्यंत भारतात ५० अब्ज डॉलर्सची बाजारपेठ निर्माण करण्याचे वेव्हजचे मुख्य उद्दिष्ट आहे. वेव्हज २०२५ मध्ये ९० हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ज्यात १० हजारांहून अधिक प्रतिनिधी, १ हजार निर्माते, ३०० हून अधिक कंपन्या आणि ३५० स्टार्टअप्सचा समावेश होता. या समिटमध्ये ब्रॉडकास्टिंग, इन्फोटेनमेंट, AVGC-XR, चित्रपट आणि डिजिटल मिडियासह विविध क्षेत्रांतील लोकांची माहितीपर चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिक वर्कशॉप्स झाली.

महाराष्ट्रात ८ हजार कोटींची गुंतवणूक!

जागतिक ऑडिओ – व्हिज्युअल अ‍ॅण्ड एंटरटेंन्मेंट समिट – वेव्हजमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ हजार कोटींचे ४ महत्त्वाचे करार केले. यावेळी नवी मुंबईतील सिडकोमार्फत युकेमधील युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या विद्यापीठांसोबत प्रत्येकी १५०० कोटी रुपयांचे करार करण्यात आला. तसेच राज्याच्या उद्योग विभागामार्फत प्राईम फोकस कंपनीसोबत ३ हजार कोटी रुपयांचा आणि गोदरेज कंपनीसोबत २ हजार कोटी रुपयांचा करार करण्यात आला.

नवी मुंबईत सिडकोच्या माध्यमातून एक एज्युसिटी (Educity) स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकाच ठिकाणी असणार आहेत. या कॅम्पसमध्ये ही दोन विद्यापीठे असणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे आता जगासाठी खुले झाले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांमधून शिकण्याचे येथील युवकांचे स्वप्नं लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाच्यावतीने ‘प्राईम फोकस’ सोबत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टिम तयार करण्यासाठी करार करण्यात आला. या स्टुडिओच्या माध्यमातून सुमारे २५०० लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प २०२५-२६ मध्ये सुरू होईल. तर ‘गोदरेज’ कंपनीसोबत करण्यात आलेल्या करारानुसार पनवेल येथे ए ए स्टुडिओ स्थापन करण्यात येणार आहे. हा प्रकल्प २०२७ मध्ये सुरू होणार असून यातूनही २५०० रोजगार निर्मिती होणार आहे. हा प्रोजेक्ट दोन टप्प्यात राबविला जाणार आहे.

वेव्हज २०२५, हे फक्त एक समिट नव्हते, तर महाराष्ट्राच्या भविष्याला नवी दिशा देणारा उपक्रम ठरला. यातून राज्यात ८ हजार कोटींची गुंतवणूक आली. त्याचबरोबर रोजगार निर्मिती, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, अत्याधुनिक फिल्मसिटी आणि ग्लोबल स्टुडिओसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्पदेखील येणार आहेत. यातून मुंबईला पुन्हा एकदा ग्लोबल एंटरटेंन्मेंट हब म्हणून ओळख मिळवून देण्यास मदत झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टेकसॅव्ही, दूरदर्शी नेतृत्वामुळे महाराष्ट्राने चित्रसृष्टी, AVGC-XR, डिजिटल मिडिया आणि जागतिक पातळीवरील शैक्षणिक क्षेत्रातही ठोस पावले उचलली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *