पंढरपूर, अवघ्या महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या आणि कोट्यवधी वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाचे ठिकाण. पंढरपूरला अनेक वर्षांचा इतिहास आणि अध्यात्मिक परंपरेचा वारसा आहे. हा वारसा असाच वर्षानुवर्षे जपला जावा, या उद्देशाने महाराष्ट्र सेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पंढरपूर कॉरिडोर’ या विकास प्रकल्पाचा संकल्प सोडला आहे. या कॉरिडोरच्या माध्यमातून पुढील ५० वर्षांच्या संभाव्य गर्दीचा विचार करून पंढरपूरच्या पायाभूत सोयीसुविधांचा विकास आराखडा राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे कोट्यवधी वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. कार्तिकी एकादशी, चैत्र एकादशी, आषाढी व माघी एकादशीसह दर महिन्याच्या एकादशीला येथे होणारी भाविकांची लाखोंची गर्दी हा पंढरपूरच्या सामाजिक व सांस्कृतिक ओळखीचा भाग बनली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने वारकरी भक्तिभावाने विठ्ठलाची भेट घेण्यासाठी येतात. देशासह विदेशातून येणाऱ्या भक्तांची संख्याही मोठी आहे. पण सदर मंदिराच्या आजुबाजूचा परिसर हा खूपच दाटीवाटीचा असल्याने येथे इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांसाठी पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करता येत नाहीत. गर्दीचे नियंत्रण हे वारकरी आपापल्या पद्धतीने इतक्या वर्षांपासून करत आले आहेत. त्यामुळे इथे इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होऊनही कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. पण वाढत्या गर्दीमुळे स्थानिक प्रशासनाला मूलभूत पायाभूत सोयीसुविधा पुरवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे लोकांची गैरसोय सुद्धा होत आहे. या सर्व अडचणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा (पंढरपूर कॉरिडोर) तयार केला आहे. वाराणसी येथील काशी विश्वेश्वर मंदिराच्या धर्तीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासह संपूर्ण परिसराचा सर्वंकष विकास केला जाणार आहे.
विकासाच्या केंद्रस्थानी ‘विठ्ठल’ अन् ‘पंढरपूर’
पंढरपूर कॉरिडोर हा फक्त पायाभूत सोयीसुविधा उभारण्याचा प्रकल्प नाही. तर कॉरिडोरच्या माध्यमातून श्रद्धा, सुविधा आणि सौंदर्य यांचा संगम साधला जाणार आहे. विकास आराखड्याचा केंद्रबिंदू विठ्ठल-रुक्मिणी मंदिरच असणार आहे. या प्रकल्पाद्वारे मंदिर परिसराचा जीर्णोद्धार, दर्शन व्यवस्थेत सुधारणा, दर्शन मंडप, गर्दी टाळण्यासाठी स्कायवॉक आणि घाटांचा देखील विकास केला जाणार आहे. मंदिर परिसराची आधुनिक पद्धतीने पण आपल्या परंपरेशी सुसंगत अशी पुनर्रचना केली जाणार आहे. यामुळे वारकऱ्यांची श्रद्धा आणि भक्तीच्या वातावरणात कोणताही खंड न पडता उलट अधिकाधिक सुविधा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
पंढरपूर कॉरिडोर हा मंदिरापुरता मर्यादित राहणार नाही. मंदिरात येणाऱ्या भाविकांचे सर्वप्रथम आदरातिथ्य हे पंढरपूर शहर करणार आहे. त्यामुळे या विकासात पंढरपूर शहराचाही समावेश करण्यात आला आहे. शहरात मॉडर्न पार्किंगची व्यवस्था, भूमिगत गटार योजना, पुरेसा पाणीपुरवठा, मुबलक शौचालयांची व्यवस्था, मन प्रसन्न करणारी उद्याने, परदेश किंवा देशाच्या इतर भागातून येणाऱ्या भाविकांसाठी हॅलिपॅडची व्यवस्था, गर्दी आणि आपत्तीजनक परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन केंद्र, ट्रामा केअर सेंटर, रेडिओ केंद्र, वारकरी निवारा केंद्र, संतपीठ आणि पालखी तळ यासारख्या सुविधा शहराच्या विकासाला नवे परिमाण देणाऱ्या ठरतील. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर इथल्या धार्मिक पर्यटनाबरोबरच आर्थिक आणि सामाजिक पर्यटनालाही चालना मिळणार आहे. त्यातून पंढरपूर हे जागतिक धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर येण्यास मदत होणार आहे. यातून स्थानिक पातळीवर हजारोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध होऊन, लहान-मोठे व्यवसाय वाढीस लागतील.
८० टक्के मालमत्ताधारकांचा सक्रिय प्रतिसाद
पंढरपूर कॉरिडोरची अंमलबजावणी करताना मंदिर परिसरातील साधारण एकूण ६४२ घरे आणि दुकानांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. या मालमत्तांचे सोलापूर प्रशासनाने सर्वेक्षण केले असून, आतापर्यंत ६४२ पैकी ५१० बाधित मालमत्ताधारकांची माहिती गोळा केली आहे. एकूण ८० टक्के नागरिकांनी सर्व्हेक्षणात सहभागी होऊन या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांना चांगला मोबदला दिला जाणार आहे. या सर्व्हेक्षणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला पंढरपूर कॉरिडोरचे काम करण्यास ‘गो अहेड’ दिला आहे. या कामास पुढील ३ महिन्यात सुरूवात केली जाणार असल्याची, माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम व्यवस्थित सुरू असून ते आषाढी एकादशीपूर्वी पूर्ण होईल, असा मुख्यमंत्र्यांना विश्वास असून त्यांनी जीर्णोद्धाराच्या कामाबाबत समाधानही व्यक्त केले आहे.
पंढरपूर कॉरिडोर हा फक्त एक पायाभूत सोयीसुविधांचा प्रकल्प न राहता तो भक्ती, परंपरा आणि सुविधा यांचा अध्यात्मिक वारसा सांगणारा प्रकल्प ठरेल. याच्या अंमलबजावणीमुळे पंढरपूरचे रूप अधिक आकर्षक होऊन, आगामी वर्षांत ते ‘भक्तीची राजधानी’ म्हणून नावारूपास येईल.