काल राज्यभरात लागलेल्या ग्राम पंचायतींच्या निकालाने गेल्या दोन महिन्यांपासून Devendra Fadnavis यांची प्रतिमा कलुषित करण्यासाठी विरोधकांनी जो आटापिटा चालविला होता, त्यावर संपूर्णपणे पाणी फेरले गेले. भाजप ७५०+ ग्रामपंचायती जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आणि भाजप प्रणित महायुतीने १५०० विरुद्ध ६९० असा महावसुली आघाडीचा धुव्वा उडवला. Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनाच्या आडून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा जो उद्योग काही फडणवीस फोबियाग्रस्तांनी चालवला होता त्याला संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राच्या जनतेनेच उध्वस्त केले. ग्राम पंचायतीची निवडणूक म्हणजे ग्रामीण भागातील गावगाड्याची निवडणूक.
हे पण वाचा> मराठा आरक्षणाची महत्त्वाची क्षणचित्रे
महाराष्ट्राच्या बहुतांश ग्रामीण भागात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे या निवडणुकीचे निकाल पाहता मराठा, ओबीसी, धनगर , दलित, आदिवासी अशा अठरापगड जातींनी मतपेटीतून देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर ठळकपणे शिक्कामोर्तब करत जातीयवादी राजकारणाचा पुन्हा एकदा पराभव केला आहे. जरांगेंच्या आंदोलनाचा प्रभाव असलेल्या मराठवाड्यातील निकाल पाहता सकल Maratha समाजाने जरांगेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांबद्दल केलेल्या वक्तव्यांबद्दल तीव्र नापसंती मतपेटीतून व्यक्त केली आहे.
इरेला पेटलेल्या मनोज जरांगेंचे उपोषण संपविण्यासाठी न्यायमूर्तींना मध्यस्थी करायला पाठवायचा देवेंद्र फडणवीसांचा निर्णय मास्टरस्ट्रोक ठरला आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचे दहशतीत झालेल्या रूपांतरामुळे धास्तावलेल्या जनसामान्यांची या तणावापासून मुक्तता झाली. आजवर महाराष्ट्राला इतके मराठा मुख्यमंत्री मिळाले तरी एकही मराठा मुख्यमंत्र्याने मराठा आरक्षणाच्या विषयाला हात घातला नाही हे सत्य आता जगजाहीर आहे. परंतु मराठा आरक्षणासारख्या किचकट विषयाला हात घालून मराठा समाजाला १२% आरक्षण मिळवून देणारे, ते सत्तेत असेपर्यंत न्यायालयात टिकविणारे, आरक्षणासोबतच मराठा तरुण व विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना सुरु करणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील पहिलेच मुख्यमंत्री होय. काँग्रेस-राष्ट्रवादीने १५ वर्ष अडगळीत टाकलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ देवेंद्रजींनी पुनरुज्जीवित करत ७०,००० मराठा युवा उद्योजक घडविले. ‘सारथी’ संस्था निर्माण करून मराठा तरुणांच्या उच्य शिक्षणाची सोय केली. आजवरच्या कुठच्याही मुख्यमंत्र्याला हे करता आलेलं नाही. आजही मनोज जरांगेंनी थोडा संयम आणि परिपक्वता दाखवली तर मराठ्यांना कुणबी होण्याची गरजच पडणार नाही. कारण देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना गायकवाड समितीकडून १,६०० पानांचा सविस्तर इम्पेरिकल डेटा निर्माण केला होता. हा इम्पेरिकल डेटाच मराठा समाजाला न्यायालयापुढे मागास सिद्ध करायला पुरेसा आहे. ठाकरे सरकारने हाच अहवाल दडवून इम्पेरिकल डेटाच्या नावाखाली केवळ ६० पानांचा अहवाल आणि तो सुद्धा इंग्रजीत भाषांतर न करता सादर केला, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण मागास असल्याचे सिद्ध होत नसल्याचा हवाला देत आरक्षण रद्दबातल केले.
आता राज्य सरकारने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने तिचा स्वीकार करून लवकरच सुनावणी घेण्याचे कबूलही केले आहे. क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये नवे न्यायाधीश आणि नव्या पुराव्यांची गरज नसते. त्यामुळे ज्या न्यायमूर्तींसमोर पूर्वी खटला चालला, तेच न्यायाधीश क्युरेटिव्ह पिटिशनची सुनावणी घेतील. यामध्ये पब्लिक हियरिंग सुद्धा होणार नाही. न्यायालय फक्त संवैधानिक दर्जा असलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाने तयार केलेल्या इम्पेरिकल डेटामध्ये नव्याने सादर केलेले पुरावे तपासतील व त्यावरून मराठा समाज मागास आहे अथवा नाही याचा फैसला करत आरक्षणाचा विषय निकालात काढतील. या प्रक्रियेला फार वेळही लागणार नाही. शिवाय देवेंद्रजींच्या देखरेखी खाली तयार झालेला गायकवाड समितीचा अहवाल मराठ्यांना मागास सिद्ध करायला पुरेसा आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाची लढाई अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले तर मराठा समाजाला कुठल्याही प्रवर्गात न जाता स्वतःच्या हक्काचे स्वतंत्रपणे १३% आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना स्वतःला कुणबी जातीत समाविष्ट करून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी न्या. शिंदेंची समिती कुणबी दाखल्यांची राज्यभर छाननी करते आहे आणि ज्यांना स्वतःला कुणबी करून न घेता मराठा म्हणूनच आरक्षण हवंय त्यांच्यासाठी सरकार क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून लढत आहे. त्यामुळे समाजाकडून जी मागणी येईल ती पूर्ण करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना संपूर्ण महाराष्ट्रात तोड नाही!
Devendra Fadnavis आणि Maratha Samaj यांचे नाते केवळ आरक्षणापुरते मर्यादित नसून ते फार आतवर रुजलेले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारानेच छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती अभयसिंह राजे या दोन्ही वंशजांमधील वितुष्ट संपुष्टात आले. जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीसांना विरोधक जातीवरून टार्गेट करतात तेव्हा तेव्हा सातारची राजगादी त्यांच्या समर्थनार्थ भक्कपणे उभी राहते. शरद पवारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मोठमोठी मानवाईक मराठा घराणी संपविण्याचा प्रयत्न केला. आज ती सारी मातब्बर मराठा घराणी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एकवटली आहे, मग ते मोहिते असो, निंबाळकर असो, घाटगे असो किंवा महाडिक असो. त्यामुळे आज तळागातील विस्थापित मराठा असो किंवा समाजात मान-मरातब प्राप्त असलेला प्रस्थापित मराठा असो, दोघांचाही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे आणि नेमकी हीच बाब आजवर मराठ्यांच्या जीवावर सत्तापदे भोगणाऱ्या काही नेत्यांना अस्वस्थ करते. म्हणूनच हे नेते सातत्याने देवेंद्र फडणवीसांनाच टार्गेट करत असतात आणि दरवेळी तोंडघशी पडत असतात.
मराठवाड्यातील जरांगे पाटलांच्या चिघळेल्या आंदोलनाच्या धर्तीवर काल आलेले ग्राम पंचायत निवडणुकीचे निकाल पाहता, देवेंद्र फडणवीसांना कितीही टार्गेट केले गेले तर जनता अशा विखारी राजकारणाला मुळीच भीक घालत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले! त्यामुळे “कुणी कितीही बी करा कल्ला, मजबूत हाय जनतेच्या मनातला देवाभाऊंचा किल्ला” असे म्हणायला हरकत नाही!