पुणे हे महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगरपालिकेच्या सुमारे ३ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन व उद्घाटन नुकतेच (दि. १५ डिसेंबर) पार पडले. या विकासकामाच्या माध्यमातून सर्वसामान्य पुणेकरांच्या दैनंदिन जीवनात थेट बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. यात प्रामुख्याने पाणीपुरवठा, जलशुद्धीकरण, मलशुद्धीकरण, रस्ते, वाहतूक, आरोग्य, शिक्षण आणि प्रशासनाशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. शहरात उभारण्यात येत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, जलशुद्धीकरण केंद्रे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यांसारख्या मूलभूत सुविधा पुणेकरांसाठी ‘इज ऑफ लिव्हिंग’ वाढवणाऱ्या आहेत. पुणे महानगराच्या सर्वांगीण विकासासाठी त्या गरजेच्या आहेत. या विकासकामांच्या माध्यमातून शहरातील ३२ प्रमुख रस्त्यांची विकासकामे आणि त्यातील मिसिंग लिंक्स दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.
पुणे महानगरपालिकेने पुणे शहर आणि आजुबाजूच्या परिसरातील वाढत्या लोकसंख्येचा आणि औद्योगिक विकासाचा विचार करून दळणवळणाचा सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे. हजारो कोटी रुपयांच्या गुंतवणूक करून पुणे मेट्रो उभारण्यात आली, तिचा विस्तारही वेगाने सुरू आहे. मेट्रोसोबतच पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेस शहरात आणल्या जात आहेत. पुण्याला इतर शहरांशी जोडणाऱ्या रस्त्यांमध्ये आवश्यक सुधारणा करून दोन शहरांमध्ये सुलभ वाहतूक व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. औद्योगिक केंद्र म्हणून पुण्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सच्या माध्यमातून भविष्यात पुणे आणि नवी मुंबई या महाराष्ट्राच्या कॅपिटल्स ठरणार आहेत. नवी मुंबई ते पुणे हा पट्टा देशाचा डेटा सेंटर कॅपिटल म्हणून विकसित केला जात आहे. इथली डेटा सेंट्रिक अर्थव्यवस्था एआयच्या माध्यमातून आगामी काळात दोन ते तीन पटीने वाढणार आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजन केले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुमारे ३ हजार ६३ कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये पुण्यातील शहर विकास, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा योजना, नागरी विकास योजना, सांडपाणी प्रक्रिया, रस्ते विकास, आरोग्य सुविधा, शालेय शिक्षण आणि सुशासन या घटकांचा समावेश आहे. २४ बाय ७ समान दाबाने पाणीपुरवठा योजने अंतर्गत शहराच्या विविध भागांत साठवण टाक्या उभारल्या जात असून, त्यातील १७ टाक्यांचे लोकार्पण यावेळी झाले. कात्रज आणि पाषाण येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची नवी इमारत, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाची लोहगाव येथील इमारत, चांदणी चौक ते बाणेर-खराडी परिसरातील नवीन अग्निशमन केंद्र, सिंहगड रस्त्यावरील आपत्ती व्यवस्थापनासाठीचे इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, तसेच महानगरपालिकेचे दवाखाने, आरोग्य केंद्रे, दिव्यांग उपचार केंद्र आणि डिजिटल सुशासन उपक्रमांचेही लोकार्पण करण्यात आले.
शहराच्या पश्चिम भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी अमृत २.० योजनेअंतर्गत वडगाव बुद्रुक येथे १२५ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे. याच योजनेतून शहरातील सहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा क्षमताविस्तार होणार आहे. गावांसाठी पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेंतर्गत शेवाळेवाडी, केशवनगर आदी भागांत कामे हाती घेण्यात आली असून, हडपसर येथील यांत्रिक हस्तांतरण केंद्राचे भूमिपूजनही करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बहुस्तरीय उड्डाणपुलाला सेनापती बापट रस्त्याकडून जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन झाले असून, विद्यापीठ चौक आणि येरवडा येथील बिंदुमाधव ठाकरे चौकात उड्डाणपूल व सेपरेटर उभारण्यात येणार आहेत. आचार्य आनंदऋषीजी महाराज चौकातील सेपरेटर, पुणे ग्रॅण्ड टूर २०२६ या जागतिक सायकल स्पर्धेसाठी रस्ते विकास, कमला नेहरू रुग्णालयाचे आधुनिकीकरण, पुणे महानगरपालिकेचा मॉडेल स्कूल उपक्रम, महापालिकेच्या इमारतींवरील सौर प्रकल्प, राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील नवे सर्पोद्यान तसेच शहराच्या विविध भागांतील रस्ते व पदपथांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
याशिवाय, २०२५-२६ या वर्षासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांसाठी देवेंद्र फडणवीस सरकारने ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातील १२.५० कोटी रुपयांचा निधी सरकारने वितरितदेखील केला आहे. या निधीतून पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कसबा, शनिवार, शुक्रवार, सदाशिव, नारायण पेठेसह शहरातील जुन्या भागांतील ड्रेनेज, रस्ते आणि पदपथांची कामे केली जाणार आहेत. तसेच वाघोली, कात्रज, आंबेगाव, कोंढवा आणि येवलेवाडी परिसरात ड्रेनेज लाईन, पाणीपुरवठा आणि रस्ते विकासाची महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या सर्व विकासकामांमुळे पुणे शहर अधिक आधुनिक, सुलभ आणि नागरिकाभिमुख होणार आहे.

शहरातील ३० वर्षे जुन्या ड्रेनेज लाईन बदलणार
कसबा पेठ येथील ३० वर्षे जीर्ण झालेल्या ड्रेनेज लाईन व ट्रंक लाईन बदलणे, सावित्रीबाई फुले स्मारक जवळील परिसरात लादीकरण करणे, शनिवार पेठ, अमृतेश्वर घाटाजवळ नवीन सॉर्टिंग शेड ३ उभारणे व आरसीसी भिंत बांधणे, त्याचबरोबर सुभाषनगर परिसरातील रस्ता मिलिंग करून डांबरीकरण करणे, गणेश मित्र मंडळ चिंचेची तालीम, शुक्रवार पेठ ते महाराणा प्रताप उद्यानापर्यंतचा रस्ता मिलिंग करून डांबरीकरण करणे, गुरूवार पेठ पंचहौद मित्र मंडळ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नारायण पेठ, व शनिवार पेठ परिसरातील रस्त्याची व पदपथाची कामे, नागनात पार सदाशिव पेठ ते पश्या मारुती नारायण पेठ रस्ता मिलिंग करून डांबरीकरण करणे.
अंतर्गत रस्त्याची कामे पूर्ण करणार
वाघोली येथील रोहन अभिलाषा, विजय विहार, सुयोग निसर्ग, प्रायमेरा होम्स, ग्रीन रिपब्लिक, सातव वस्ती येथे ड्रेनेज लाईन टाकणे, वाघोली मसाली कंपनी मागील मुख्य रस्ता व अंतर्गत रस्त्याची कामे, दुबे नगर ते वाघोली रस्ता तयार करणे, तिथे नवीन ड्रेनेज लाईन टाकणे, कटकेवाडी ते वाघोली रस्ता तयार करणे आदी कामे केली जाणार आहेत.
पाण्याची लाईन विकसित करणार
कात्रज परिसरातील भिलारेवाडी, मांगरेवाडी, गुजर-निंबाळकर वाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, आंबेगाव ब्रुद्रुक, आंबेगाव खुर्द येथे पाणी लाईन विकसित करणे. कात्रज चौक ते मस्तान हॉटेल मांगडेवाडी रोडपर्यंत रस्ता तयार करणे, रंगा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वाघजाई माता मंदिरापर्यंत रस्ता तयार करणे, कात्रज एकता चौक ते गोकुळनगर चौक पर्यंतचा रस्ता तयार करणे, कोंढवा – येवलेवाडी येथे रस्ता तयार करणे, अप्पर – इंदिरा नगर येथे रस्ता तयार करणे, कात्रज तलाव प्रवेशद्वार ते एम. के. बेकारी वरखडे नगर रोड पर्यंतचा रस्ता करणे, मांगडेवाडी, गुजरवाडी, शनिनगर, भोलेनगर तसेच गुजरवाडी फाटा ते सुगंधातारा चौक येथे रस्ता तयार करणे, कात्रज चौक ते मस्तान हॉटेल मांगडेवाडी रस्त्यावरील विद्युत पोल उभारणे, आदी कामे केली जाणार आहेत. या सर्व विकासकामांमुळे पुणे शहर अधिक आधुनिक, सुलभ आणि नागरिकाभिमुख होणार आहे.
संबंधित लेख:
