हॅपी बड्डे देवेन्द्रजी ! Happy Birthday Devendra Fadnavis

देवेन्द्र फडणवीस हे नाव म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात ठळकपणे उठून दिसणारं नाव! एकीकडे संघाच्या मुशीत तयार झाल्याने देव, देश आणि धर्मासाठी झटताना त्यात कोणत्याही तडजोडी न करण्याचे संस्कार.. तर दुसरीकडे कपट आणि कटकारस्थाने करणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांकडून आलेल्या अनुभवांतून त्यांच्याकडूनच शिकलेल्या क्लुप्त्या – याचं डेडली कॉम्बिनेशन म्हणजे देवेन्द्र फडणवीस!! गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याचे खरे ‘सूत्रधार’ देवेन्द्र फडणवीस हेच आहेत. त्यांच्या राजकीय करियरचा चढता आलेख पाहता, कदाचित ‘सर्वोच्च’ असं एकच पद भूषवायचं राहिलं आहे असं वाटत असतानाच, नियतीला अचानक आठवलं की ‘उपमुख्यमंत्रीपद’ मध्ये राहिलं आहे.. आणि देवेन्द्रजी यांनी नियतीचा हा कौलही स्वीकारला!

देवेन्द्रजी यांचे वडील गंगाधर फडणवीस हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवरच नितीन गडकरी निवडून गेले होते. थेट पॅराशूट घेऊन विधान परिषदेत नव्हते लँड झाले देवेन्द्रजी. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात ग्रास-रूट लेव्हल वरूनच त्यांनी केलेली आहे.

स्वातंत्रपूर्व काळापासूनच काँग्रेस पक्ष एक तर सेटिंग करून आपले प्रतिस्पर्धी तयार करत आला आहे, किंवा काँग्रेस मधून फोडून प्रतिस्पर्धी तयार करत आला आहे.. जेणेकरून ‘खरे’ प्रतिस्पर्धीच तयार होऊ नयेत! शिवसेना आणि राष्ट्रवादी ही त्याची आपल्या जवळची उदाहरणे. हे खेळ आज अनेकांना समजले असले तरी काही लोकांमध्ये अगदी लहानपणापासूनच याबाबत वेगळीच विचारांतील सुस्पष्टता असते. देवेन्द्रजी यातील एक.

शाळेच्या नावात ‘इंदिरा’ होतं म्हणून त्यांनी घरी हट्ट धरून ती शाळाच बदलली! पुढे ‘सरस्वती’ विद्यालयात त्यांचं शिक्षण झालं. त्यानंतर धरमपेठ विद्यालयातून त्यांनी कॉमर्सची पदवी घेतली आणि फक्त ‘विचार, संस्कार व ग्रॅज्युएट डिग्री’ याने काम होणार नाही म्हणून कायद्याचीही पदवी घेतली ज्यात त्यांनी सुवर्णपदक पटकावलं. कायदेशीर मार्गाने पाचर कशी मारायची, हे शिकूनच देवेन्द्रजी राजकारणात उतरले! याला म्हणतात पूर्वतयारी!! म्हणूनच, आजचे देवेन्द्र फडणवीस ज्यांना समजून घ्यायचे असतील त्यांना त्याआधी ‘आधीचे देवेन्द्र फडणवीस’ समजून घ्यावे लागतील.

ते ज्यांना समजले नाहीत, त्यांना एखादा माणूस कोणताही त्रागा न करता त्याच्या विरोधात होत असलेले खेळ शांतपणे बघत असेल, सगळं काही नीट समजत असतानाही त्यावर लगेच प्रतिक्रिया देत नसेल, स्वतःवर व कुटुंबियांवर अतिशय खालच्या पातळीचे पर्सनल अटॅकही सहन करत असेल, करियर संपवण्यासाठी इन-सेक्युअर झालेले आतील व बाहेरील ‘सगळे’ विरोधक हातमिळवणी करत असतानाही हसत राहू शकत असेल आणि एक-दोन दिवस नाही तर अडीच वर्षे अशा स्थितीतही संयम आणि मानसिक संतुलन शाबूत ठेवत असेल, तर सत्तेच्या धुंदीत असलेल्या लोकांकडून त्याला त्यांची कमजोरी समजणे, ‘अकेला देवेन्द्र क्या करेगा?’ सारखे प्रश्न विचारणे आणि ‘कसं घरी बसवलं’ सारखे टोमणे मारणे हे होणारच. पुढे काय वाढून ठेवलं आहे याची त्यांना कशी कल्पना कशी असणार? जो माणूस राज्याच्या बजेट वर पुस्तक लिहितो त्याला वजाबाकीची गणिते आणि हिशोब कसे चुकते करायचे हे ठाऊक नसेल? देवेन्द्रजींना हलक्यात घेणारे सगळे त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ झाल्यावर रडत बसलेत आता..

22व्या वर्षी पहिल्यांदा नगरसेवक होऊन सुरू झालेल्या राजकारणातील प्रवासातील देवेन्द्रजी यांची वाटचाल ही कष्टसाध्य आहे. नागपुरात आपल्या कामाचा ठसा उमटवल्यानंतर 1999 मध्ये त्यांनी विधानसभेत पहिल्यांदा आमदार म्हणून प्रवेश केला. घराणेशाही मुळे राजकारणात असते तर एवढा खटाटोप करावा लागला नसता, राज्यपाल कोट्यातूनही मागच्या दाराने विधान परिषदेत त्याआधीच आणि सहज गेले असते. स्वर्गीय, श्रद्धेय गोपीनाथराव मुंडे यांच्या तालमीत त्यांनी राजकारणाची ‘इंटर्नशिप’ केली. ‘मुंडेंच्या जवळ म्हणजे गडकरींपासून लांब’, असल्या मीडियाने मॅन्युफॅक्चर केलेल्या फालतू भानगडीत ते कधी पडले नाहीत. आमदारकीचा फॉर्म भरताना, आमदार म्हणून निवडून आल्यावर नितीन गडकरींच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेणे हे आजवर कधी चुकलेले नाही.

नागपूरच्या पश्चिम नागपूर मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले. त्याचवर्षी भाजप-शिवसेना सरकार जाऊन काँग्रेस राष्ट्रवादी सरकार अस्तित्वात आलं होतं. आमदार झाल्यावर मुंबईत येताच सर्वप्रथम त्यांनी महाराष्ट्र विधानसभा कामकाजाची नियम पुस्तिका वाचून, समजून पाठ केली! एक युवा आमदार असूनही विरोधात असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण, तेलगी घोटाळा, सिंचन घोटाळा, क्रिमी लेअर उत्पन्न वाढवण्याची मर्यादा यासारख्या महत्वाच्या विषयांना आपल्या आक्रमक शैलीत वाचा फोडली आणि ‘अभ्यासू’ हा त्यांना टॅग लागला!! विरोधी पक्षनेते म्हणून त्याकाळातील अनुभव त्यांना 2019 ते 2022 मध्ये प्रचंड उपयोगी पडला. पुन्हा एकदा विरोधी बाकांवर असताना उद्धव ठाकरे सरकारच्या काळात देवेन्द्र फडणवीस यांनी कोव्हिडने झालेले मृत्यू, अनिल देशमुख भ्रष्टाचार प्रकरण, सचिन वाझे, मनसुख हिरेन, नवाब मलिक-दाऊद या प्रकरणांवर सातत्याने सरकारला धारेवर धरलं. सरकार पण तुमचं आणि मंत्री पण तुमचेच आत जाणार, ही किमया करून दाखवली. तीन पक्षांना एक माणूस पुरून उरला!

2013 मध्ये त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढवून गोपीनाथराव दिल्लीला गेले तरी सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर तेच मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात परतणार हे जवळजवळ निश्चित होतं. मात्र त्यांचं दुर्दैवी निधन झाल्याने केंद्रीय भाजपला दुसऱ्या फळीतील नेत्यांचा विचार करावा लागला. ‘Best amongst equals’ नियमानुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या आयुष्यात व महाराष्ट्र भाजप मध्ये एक नवीन पर्व सुरू झालं. 2014ला मुख्यमंत्रीपद मिळवण्यात फडणवीसांसाठी त्याआधी त्यांनी यशस्वीपणे हाताळलेलं प्रदेशाध्यक्षपद चांगलंच कामी आलं. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता, हे त्यांच्या पथ्यावर पडलं. अर्थात मुख्यमंत्रीपद मिळण्यासाठी आणखीही काही मुद्दे महत्त्वाचे होते. देवेन्द्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले आणि संघाच्या विश्वासातले तर होतेच, आणखी दोन मुद्दे महत्वाचे ठरले – गडकरींना मोदींनी केंद्रात नेलं आणि भाजपने बहुसंख्य समुदायाचा मुख्यमंत्री न देता तुलनेनं अल्पसंख्याक असलेल्या समुदायातील नेत्याला मुख्यमंत्रीपद देण्याची ‘इन्क्लूझिव’ रणनीती अवलंबली. हरियाणात बिगर-जाट असलेले खट्टर, झारखंडमध्ये बिगर-आदिवासी असलेले दास यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तसे महाराष्ट्रात बिगर-मराठा असलेल्या फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळालं.

साधारण याच वेळी अजून एक बदल महाराष्ट्रातील राजकारणात दिसून येऊ लागला होता. स्वतःला ‘मोठा भाऊ’ समजणाऱ्या ठाकरेंना भाजपचे यश खुपू लागले होते. हा ‘मोठा भाऊ सिंड्रोम’ उद्धव ठाकरे यांच्यात एवढा भिनला होता की त्यांना भाजपचा मुख्यमंत्री होणार ही कल्पनाच असह्य झाली होती. त्यात देवेन्द्र फडणवीस मुख्यमंत्री होणार याच्या वेदना अजून जास्त होत्या. भाजपमध्ये क्लेश निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कधी पंकजाताई यांना भाऊबीजेच्या ओवाळणीत मुख्यमंत्री पद देण्याची जाहीर घोषणा केली तर कधी एकनाथ खडसे यांचे कान भरायची कामे केली! फडणवीसांच्या अडचणी वाढवण्यासाठी (अनेक पत्रकार मंडळींना माहीत आहे) ठाकरेंनीच विनोद तावडे यांचे बोगस डिग्री प्रकरण आडमार्गाने विरोधकांकडे पोचवले आणि शालेय उपकरण खरेदीत अनियमिततेचे आरोप विरोधकांकडून करवून घेतले. मग तावडेंकडे बघून फडणवीसांकडे बोट दाखवलं होतं त्यांनी! ‘भाऊबीजेची ओवाळणी’ द्यायची भाषा करणारे उद्धव ठाकरे, पंकजाताई चिक्की प्रकरणामुळे आरोपांच्या फेऱ्यात अडकल्या होत्या तेंव्हा त्यांच्या सोबत उभे राहिले नाहीत ना 2019 मध्ये स्वतः मुख्यमंत्री होताना त्यांना ती ओवाळणी आठवली. असो.

2014 साली मुख्यमंत्री झाल्यावर देवेन्द्र फडणवीसांसाठी सर्वांत मोठं आव्हान होतं मराठा समाजाचा पाठिंबा मिळवणं. आयुष्यात मराठा समाजाच्या हितासाठी काहीही केलं नाही असे शरद पवार कधी तरी ‘मराठा कार्ड’ खेळणार हे फडणवीसांना चांगलंच माहीत होतं. मराठा आरक्षणाच्या निमित्तानं एक मोठं आव्हान फडणवीसांच्या पुढे उभे करण्यात पवारांना यशही मिळालं. ‘अराजकीय आंदोलन’ उभं करत शरद पवारांनी फडणवीसांना बेजार केलं खरं, पण प्रामाणिक प्रयत्न करून फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन पवारांची खेळीच उधळून लावली. एवढंच नाही, तर निवडणुकीच्या तोंडावर फडनवीसांना अडचणीत टाकण्यासाठी ते आरक्षण कोर्टात खेचणाऱ्या साहेबांना व त्यांच्या हस्तकांना चपराक देत हायकोर्टात ते टिकवूनही दाखवलं! पण मुळात ते आरक्षण द्यायचेच नव्हते आणि ती फडणवीस यांना कोंडीत पकडण्यासाठी एक राजकीय खेळी असल्याने पुढे पवारांच्या महाविकास आघाडी सरकारने सुप्रीम कोर्टात ते आरक्षणच घालवलं! दुर्दैव!!

अनेक आघाड्यांवर लढत असताना, वर नमूद केलेल्या कारणांमुळे स्वपक्षीय फडणवीसांपासून जेवढे दूर होऊ लागले तितकंच त्यांनी राज्याचा गाडा प्रभावीपणे हाकण्यासाठी व जनतेला सुशासन मिळावं म्हणून सर्वपक्षीय ‘टॅलेंट हंट’ सुरू केलं. जातीवाद करून पवारांनी, तर कान भरायचे व आग लावायचे बायकी चाळे करून मित्रपक्षाकडून फडणवीस यांची ताकत कमी करण्याचे धंदे सुरू असताना राज्याचे विरोधी पक्ष नेतेच फडणवीसांनी गळाला लावून त्याच भाषेत विरोधकांना उत्तर दिले. महाराष्ट्र एकमेव राज्य असेल आणि फडणवीस एकमेव नेते असतील ज्यांनी एक नाही तर दोन विरोधी पक्ष नेते आपल्या सोबत आणून बसवले – राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित दादा! त्याव्यतिरिक्त दरेकर, लाड, राम कदम सारखे नेतेही त्यांनी भाजपात आणले. एकनाथ शिंदे आणि अजित दादा या विरोधी पक्षांना खिंडार पडून आणलेले गट सोबत घेऊन पवार आणि ठाकरे यांचे हिशोबही चुकते केले.

राजकारण आपल्या जागी आणि जनतेची कामं आपल्या जागी! एकीकडे लक्ष देताना दुसरीकडे दुर्लक्ष करणे हे फडणवीसांना मान्य नव्हतं. शेकडो कामांची जंत्री देता येईल पण जलयुक्त शिवार आणि मुंबई मेट्रो व राज्यातील अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सच्या कामांचे संपूर्ण श्रेय फक्त आणि फक्त देवेन्द्र फडणवीसांचेच आहे. या व अशा शेकडो कामांना स्थगिती देऊन ते श्रेय घेऊ न देण्याचा प्रयत्न अडीच वर्षे झाला, पण आज सगळी कामे पुन्हा ट्रॅक वर आहेत तेही फडणवीसांनी केलेल्या राजकीय उलथापालथीमुळेच!! आदर्शवादाचे डोज सोशल मीडियावरून त्यांना पाजणे हे आपल्या पक्षातील लोकांचा फेव्हरेट टाईमपास आहे, पण राज्याचं वाटोळं होताना आणि आपलं राज्य 25 वर्षे मागे जाताना उघड्या डोळ्यांनी बघायचं माझ्या ह्या नेत्याला मान्य नव्हतं.

विरोधकांचे कार्यक्रम शांतपणे करण्यासाठी माणसाचं डोकं आणि मन शांत असावं लागतं. डोक्याची राख करून असे कार्यक्रम होत नसतात. कदाचित हाच मेसेज देण्यासाठी, जेंव्हा 20-21 जून 2022 ची रात्र संपूर्ण जग योग दिवस साजरा करण्याच्या तयारीत होता.. तोच योगदिवस निवडून सकाळी एकनाथ शिंदे यांचा सूरत प्रवास व महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नवीन अध्याय सुरू करायचं त्यांनी ठरवलं असावं. अतिशय शांतपणे सगळं पाहत होते देवेन्द्रजी तेंव्हा. आठवून बघा, त्या काळात कोणतंही वक्तव्य त्यांनी केलं नव्हतं!

1997 मध्ये ते पहिल्यांदा महापौर झाले. महापौर ते मुख्यमंत्री व्हायला 22 वर्षं लागली. सध्या त्यांचं वय 53 आहे. त्यांच्यासमोर अजूनही मोठा राजकीय पट आहे आणि राजकारणाच्या दृष्टीने एवढ्या कमी वयातही त्यांच्याकडे दांडगा अनुभव गाठीशी आहे. पुन्हा एकदा तेच म्हणेन : विचार, संस्कार आणि शिक्षण एवढंच नाही तर विरोधकांकडूनच शिकलेल्या क्लुप्त्या याच्या या डेडली कॉम्बिनेशन ला सद्यस्थितीत आणि नजीकच्या भविष्यात तरी मला तोड दिसत नाहीये. आज देवेन्द्रजी यांचा वाढदिवस आहे. आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना मी करतो की त्यांना दीर्घायुष्य प्रदान करावे, वाटेत येणाऱ्या सर्व असुरी शक्तींचा व अडचणींचा नायनाट करण्यासाठी त्यांना 100 हत्तींचे बळ द्यावे व त्यांच्या हातून महाराष्ट्राची व राष्ट्राची उत्तमोत्तम सेवा घडत राहावी. खूप खूप शुभेच्छा, बॉस!

इतर लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *