उद्धव ठाकरेच कोस्टल रोडवरील सर्वात मोठा गतिरोधक !

११ मार्च, २०२४ रोजी मुंबई कोस्टल रोडच्या कांदिवली ते मरीन लाईन्स या २२.९ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात कोस्टल रोडचे फुकटचे श्रेय लाटू पाहणाऱ्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाबद्दल अनेक गौप्यस्फोट केले. परंतु, ते गौप्यस्फोट समजून घेण्यापूर्वी कोस्टल रोडच्या निर्मितीचा इतिहाससुद्धा समजावून घ्यावा लागेल. मुंबईतील ट्रॅफिक आणि प्रदूषण कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी कोस्टल रोडचा पर्याय १९६३ साली सुचवला होता. परंतु, कुठल्याही सरकारला तो प्रत्यक्षात उतरविणे शक्य झाले नाही. अगदी केंद्रात आणि राज्यात बहुतांश काळ काँग्रेस प्रणित आघाड्यांचेच सरकार असतानासुद्धा अनेक प्रकारच्या क्लियरन्ससाठी २०१४ पर्यंत हा प्रकल्प पडून राहिला. अगदी उद्धव ठाकरेंनीसुद्धा दोन मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये कोस्टल रोड निर्माण करण्याचे दावे करून मते मिळविली, परंतु, त्यांनाही प्रकल्प करणे शक्य झाले नाही. २०१४ मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्तांतर होऊन जेव्हा केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात फडणवीस सरकार सत्तेत आले, तेव्हा या प्रकल्पामागचे शुक्लकाष्ठ दूर झाले. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री बनताच २०१६ पासूनच या प्रकल्पाला हात घातला आणि केंद्र सरकारच्या ज्या मंजुऱ्यांसाठी हा प्रकल्प ४० वर्षं अडकून पडला होता, त्या सर्व मंजुऱ्या अवघ्या एका वर्षात म्हणजे २०१७ पर्यंत मिळविल्या आणि २०१८ मध्ये कोस्टल रोडचे काम सुरु झाले. 

कोस्टल रोडचे काम राज्य सरकारच्या अधिपत्याखाली करायचे की एमआरडीए की मुंबई महापालिकेच्या नेतृत्वात करायचे याची चाचपणी सुरु असताना, उद्धव ठाकरेंनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे हा प्रकल्प मुंबई महापालिकेच्या मार्फत करावा, यासाठी गळ घातली. अर्थात, त्यामागे उद्धव ठाकरेंना आपला राजकीय स्वार्थ साधायचा होता. इथवर सारं ठीक होतं. परंतु, मोठ्या मनाच्या देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या विनंतीला मान देत हा प्रकल्प मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला. परंतु, जेव्हा या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याची पाळी आली, तेव्हा उद्धव ठाकरेंनी ज्यांनी कोस्टल रोडसाठी केंद्र सरकारकडून सर्व मंजुऱ्या मिळवून आणल्या आणि जे राज्याचे मुख्यमंत्री होते, अशा देवेंद्र फडणवीसांनाच डावलत गुपचूप कोस्टल रोडचे भूमिपूजन केले. स्वतः मुंबईसाठी काहीच न करता महापालिकेवर दोन्ही हातांनी डल्ला मारून फक्त आपले घर भरायचे आणि दुसऱ्यांच्या कामाचे श्रेयही आपण घ्यायचे, ही उद्धव ठाकरेंची जुनीच सवय आहे. अगदी समृद्धी महामार्गाचे उदाहरण घेतले, तरी संपूर्ण महाराष्ट्र जाणतो की, हा प्रकल्प देवेंद्र फडणवीसांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होता आणि तरीही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना त्याला आपल्या वडिलांचे नाव देऊन श्रेय लाटण्याची केविलवाणी धडपड केली. 

परंतु, केवळ मुंबई कोस्टल रोडचे श्रेय लाटायचा प्रयत्न करणे इथवरच उद्धव ठाकरे थांबले नाही. निर्माण कार्यात वारंवार विघ्न आणणे, विकासक कंपन्यांवर दमदाटी करून वसुली करणे, असले उद्योगही उबाठा गटाने २०१९-२०२२ या काळात केले, ज्याचा गौप्यस्फोट खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच आपल्या भाषणात केला. कारण विकासकांना पुढेही काम करायचे असल्याने ते त्यांच्या पिळवणुकीबद्दल जाहीरपणे कधीच बोलणार नाही, परंतु उद्धव ठाकरेंच्या काळ्या कामांवर पांघरून घालायला देवेंद्र फडणवीसांकडे मात्र कुठलेही कारण शिल्लक नाही. कारण उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर चिखलफेक करताना सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यामुळे वसुलीबाज उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांनी अगदी मोकळ्या हाताने पोलखोल केली. कोस्टल रोडच्या प्रत्येक कामात वसुलीसाठी उबाठा गटाने व्यत्यय आणले. एका एका ट्र्कसाठी वसुली, एक एक काम कुणाला द्यायचे आणि कुठल्या दराने द्यायचे यासाठी कंपन्यांवर दबाव याचा सर्व लेखाजोखा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी तत्कालीन विरोधी पक्ष नेते असलेल्या देवेंद्रजींकडे अनेकदा मांडला आहे. शिवाय कोस्टल रोड ज्या भागातून जातो आणि ज्यांची माणसे कंपन्यांकडून वसुली करायचे त्या भागाचे आमदार खुद्द उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरेच आहेत. अर्थात देवेंद्र फडणवीसांनी प्रत्यक्ष नाव घेतले नसले तरी या भागातील आमदार कोण हे साऱ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या कामात वसुलीसाठी विघ्न आणूनही वर तोंड करून त्यांचे श्रेय लाटण्यासाठी जो निगरगट्टपणा लागतो तो साळसूद चेहऱ्याच्या उद्धव ठाकरेंमध्ये ठासून भरला आहे. 

फक्त कोस्टल रोडच नव्हे, तर आपल्या बिल्डर मित्रांना फायदा मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना आरे कॉलनीतील कारशेड कांजूरला नेण्याचा जो अट्टाहास केला, त्यासाठी मेट्रो प्रकल्पाची किंमत तब्बल १० हजार कोटींनी वाढली. हीच परिस्थिती कोकणातील रिफायनरी प्रकल्पाची आणि वाढवण बंदर विकासाची आहे. स्वतः काहीच करायचे नाही, दुसऱ्याने केले तर वसुलीसाठी त्याला ते करू द्यायचे नाही आणि वर फुकटचे श्रेय लाटायची धडपड करायची, हा नवा ‘ठाकरे पॅटर्न’ उद्धव ठाकरेंनी अलीकडच्या काळात आणला आहे. जम्बो कोविड सेंटरच्या नावाखाली उद्धव आणि आदित्य या पितापुत्राच्या चेल्याचपाट्यांनी मुंबई महापालिकेची १२,००० कोटींची जी लूट केली आहे, त्याची आता ‘कॅग’ चौकशी करते आहे. त्यामुळे फक्त कोस्टल रोडच नव्हे, तर २०१९ ते २०२२ या काळात मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासामधील सर्वात मोठा गतिरोधक जर कुणी असेल तर ते उद्धव ठाकरेच आहेत, यात शंका नाही!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *