महाराष्ट्रातील सामाजिक समरसतेचा इतिहास समृद्ध आहे; छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या थोर नेत्यांनी शिक्षण आणि सक्षमीकरणाचा मूलमंत्र दिला. त्याच विचारधारेवर पाऊल ठेवत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २०१८ मध्ये मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सारथी – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था स्थापन केली. मराठा समाजातील तरुणांना संशोधन, प्रशिक्षण, शिष्यवृत्ती आणि कौशल्य विकासाच्या संधी मिळाव्यात. यासाठी सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या प्रगतीसाठी, मराठा तरुणांसाठी शिष्यवृत्ती, कौशल्य विकास प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, युपीएससी / एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत, पोलीस भरतीचे ऑनलाईन प्रशिक्षण, संशोधन अधिछात्रवृत्ती योजना, एमफील / पीएचडी शिष्यवृत्ती, परदेश शिक्षण शिष्यवृत्ती, उद्योजकता विकास कार्यक्रम, असे ६० हून अधिक प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत.
सारथी संस्थेची संकल्पना आणि उद्दिष्टे
‘सारथी’ ही फक्त एक सरकारी संस्था राहिली नाही, तर ती मराठा समाज आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची चळवळ बनू लागली आहे. शिक्षण, कौशल्य, मार्गदर्शन, संशोधन, उद्योजकता आणि सांस्कृतिक जतन यांसारख्या विविध अंगांनी मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी चळवळ. “शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती”, हे बोधवाक्य घेऊन चालणारी ही संस्था आज महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम करत आहे. २०२१-२२ ते २०२४-२५ या मागील ४ वर्षात सारथीने राज्यातील ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन व मदत केली आहे. यासाठी राज्य सरकारने जवळपास साडेसहाशे कोटी रुपये खर्च केले आहेत.
सारथीच्या उपक्रमांमधून मिळालेले यश
- ४ वर्षांत ८.३८ लाख लाभार्थी
- ६४७ कोटींहून अधिक खर्च शिक्षण व प्रशिक्षणावर
- शेकडो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश
- हजारो युवकांचे कौशल्य प्रशिक्षण पूर्ण
- उद्योजकता, संशोधन, ऐतिहासिक संवर्धन या क्षेत्रात ठोस योगदान
शैक्षणिक प्रगतीसाठी योजनांचा भक्कम आधार
१. युपीएससी / एमपीएससी पूर्व प्रशिक्षण व शिष्यवृत्ती योजना
सारथी मार्फत विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी / एमपीएससी पूर्व प्रशिक्षण योजना) परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षण, मुलाखतीची तयारी, मार्गदर्शन यासाठी आर्थिक साहाय्य दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून २०२० ते २०२४ या दरम्यान युपीएससी मध्ये ११२ आणि एमपीएससी १०४८ विद्यार्थ्यांची निवड झाली. एमपीएससीमध्ये निवड झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी २२९ विद्यार्थी हे क्लास वन आणि ८१९ विद्यार्थी क्लास टू श्रेणीमध्ये निवड झाले आहेत.
२. डॉ. पंजाबराव देशमुख उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना (देशांतर्गत)
डॉ. पंजाबराव देशमुख उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेंतर्गत देशातील नामांकित २०० विद्यापीठांमधून शिक्षण घेणाऱ्या जवळपास ३०० विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची शिक्षण, वसतीगृह, भोजन व परीक्षेसाठी भरलेल्या शुल्काचा १०० टक्के परतावा दिला जातो. २०२२ ते २०२४ या कालावधीत ४४१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यांना ५ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला होता. तर २०२४-२५ या आर्थिक वर्षात २७० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना मार्च २०२५ पर्यंत ६ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
३. महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजना (परदेश शिक्षणासाठी)
गुणवंत पण आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय शिक्षणाची स्वप्ने साकार करण्यासाठी २०२३-२४ मध्ये ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांंना ६ कोटी रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तर २०२४-२५ मध्ये ७५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या योजनेंतर्गत परदेशात २ वर्षांचे पोस्ट ग्रॅज्युएशन (पीजी) करणाऱ्या विद्यार्थ्याला प्रत्येक वर्षासाठी ३० लाख रुपये तर ४ वर्षांसाठी पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याला प्रत्येक वर्षासाठी ४० लाख रुपये दिले जातात.
कौशल्य विकास, संशोधन आणि रोजगारसंधी निर्माण करणाऱ्या योजना
१. छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती
मराठी, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी संवर्गातील पीएचडी करणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याकरीता २०१९ पासून छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF) सुरू करण्यात आली. तेव्हापासून ते २०२३ पर्यंत ३०७८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती. त्यातील ३९३ विद्यार्थ्यांची पीएचडी पूर्ण झाली असून, ११० विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी लागली आहे.
२. छत्रपती संभाजी महाराज कौशल्य विकास व संगणक प्रशिक्षण योजना
छत्रपती संभाजी महाराज कौशल्य विकास व संगणक प्रशिक्षण कार्यक्रम हा महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात राबवला जातो. २०२२ ते २०२५ या कालावधीत आतापर्यंत ९७,२८६ लाभार्थी योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेचे लक्ष्य १ लाख २० हजार इतके होते. ९७ हजार पैकी ३४ हजार ३०४ लाभार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, त्यापैकी ७,३६५ लाभार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. तर हजारो विद्यार्थी मुलाखतीच्या प्रतीक्षेत आहेत.
३. श्रीमंत मालोजीराजे भोसले इंडो-जर्मन टूल रूम कौशल्य प्रशिक्षण
श्रीमंत मालोजीराजे भोसले इंडो-जर्मन टूल रूम कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे, कोल्हापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथील आयटीआय, पीजी आणि इंजिनिअरिंग पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या १०१२ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यापैकी ६५७ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यापैकी ३१४ जणांना नोकरी मिळाली आहे.
४. सरनोबत नरवीर तानाजी मालुसरे ऐतिहासिक दस्तऐवज जतन योजना
सरनोबत नरवीर तानाजी मालुसरे ऐतिहासिक दस्तऐवज जतन योजनेच्या मार्फत छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळातील जुने कागदपत्रे, आदेश, हुकूमनामा आदी दस्तऐवजांचे जतन करून त्याचे डिजिटल रुपांतर केले जात आहे. जुन्या ऐतिहासिक दस्तऐवजावर आधारित पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. पीएचडी करणाऱ्या १०८६ विद्यार्थ्यांनी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अनुक्रमे १,१८,८३४ व १३,६०० सीड बॉल तयार केले आहेत. हे सीड बॉल किल्ल्यांच्या परिसरात टाकले जात आहेत.
५. सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडी लिपी प्रशिक्षण
सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडी लिपी प्रशिक्षण योजने अंतर्गत २६० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पुण्यातील भोसरी येथे हलकी व जड वाहने चालवण्याचे ३० दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. २०२५ मध्ये या प्रशिक्षणास सुरुवात झाली असून, ४९ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
६. सेनापती धनाजी जाधव सारथी शेतकरी ड्रोन पायलट प्रशिक्षण
सेनापती धनाजी जाधव सारथी शेतकरी ड्रोन पायलट प्रशिक्षण योजने अंतर्गत राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, परभणीमधील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांना ड्रोन वापरण्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत ३३० शेतकऱ्यांनी ड्रोन पायलटचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
७. सरसेनापती संताजी घोरपडे उद्योजकता विकास कार्यक्रम
सरसेनापती संताजी घोरपडे उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत स्टार्टअपच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी लागणारे मार्गदर्शन, इनक्युबेशन आणि आर्थिक साहाय्य सारथीतर्फे पुरवले जात आहे. यासाठी राज्य सरकारने १३ इन्क्युबेशन सेंटरसोबत सामंजस्य करार केला आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत या कार्यक्रमाचा १२० उद्योजक तरुणांनी लाभ घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज संकुल – शैक्षणिक वसतिगृहे आणि सुविधा
मराठा, कुणबी किंवा कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या गटातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध निर्माण व्हाव्यात. यासाठी राज्यातील पुणे, कोल्हापूर, खारघर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, लातूर, नागपूर आणि अमरावती या ८ ठिकाणी अभ्यासिका, वसतिगृहे, कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. पुणे मुख्यालयाचे काम पूर्ण झाले असून इतर केंद्रांची कामे प्रगतीपथावर आहेत. या प्रशिक्षण केंद्रांच्या उभारणीसाठी राज्य सरकारने १०.६५ हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली असून त्याच्या बांधकामासाठी १३६०.३१ कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
‘सारथी’ ही संस्था आता फक्त योजना राबवणारी सरकारी यंत्रणा राहिलेली नाही. तर ती मराठा-कुणबी समाजगटातील तरुणांना योग्य दिशा दर्शवणारी संस्था बनली आहे. ज्याद्वारे या समाजातील तरुणांना शिक्षण, मार्गदर्शन, रोजगार आणि उद्योजक बनण्याची संधी मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे आणि सततच्या पाठबळामुळे ‘सारथी’ एक यशस्वी संस्था ठरली आहे. सारथीच्या विविध प्रकारच्या योजनांमुळे हजारो तरुण शिक्षित – प्रशिक्षित होत आहेत. नोकऱ्या मिळवत आहेत. स्वत:चे स्टार्टअप सुरू करत आहेत. ‘सारथी’ महाराष्ट्राच्या प्रगतीशील तरुणांचे चित्र साकारत आहे.
संबंधित लेख: