महाराष्ट्र सेवक | सोलापूर

सोलापूर पाणीपुरवठा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तात्काळ १०० कोटी रुपये मंजूर

सोलापूर शहराला पुरेसा पाणीपुरवठा मिळावा या हेतुने तयार करण्यात आलेली नवीन पाणी पुरवठ्याची प्रणाली आणि वाढीव जलसाठवण क्षमता निर्मितीसाठीचा प्रकल्प टप्पा २ तातडीने पूर्ण करावा. तसेच सोलापूरकांसाठी समसमान पाणी वितरणाचा आराखडा तयार करून त्यानुसार कामे मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान या कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटी रुपये तातडीने देण्याचे आदेशही दिले आहेत.

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार देवेंद्र कोठे यांनी २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्र्यांनी सोलापूर शहर पाणीपुरवठ्याविषयी मुंबईत विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनेविषयी चर्चा करण्यात आली. २०२१ मध्ये शहरातील पाणीपुरवठा सुरळित करण्यासाठी अमृत योजने अंतर्गत विकास आराखडा तयार करण्यात आला होता. या विकास आराखड्यामार्फत सोलापूर शहरासाठी ८८२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना सुचविण्यात आली होती. पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात यावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही. दरम्यान, २०२२ मध्ये राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर या योजनेचा दुरुस्ती प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे यांच्याकडे पाठवण्यात आला होता. पण त्यावर प्राधिकरणाकडून मुदतीत कार्यवाही होत नसल्याने आमदार देवेंद्र कोठे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच बैठक आयोजित केली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून त्या लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.

सोलापूर शहरातील पाणीपुरवठा सुरळित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ८८२ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मुख्यंत्र्यांनी मान्यता देऊन यासाठी १०० कोटी रुपये तात्काळ देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, सोलापूर शहरासाठी टाकण्यात येणाऱ्या समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण होत आहे. यासाठी उर्वरित निधी देण्याचे आश्नासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच पाकणी येथील जलशुद्धीकरण प्रकल्प वन खात्याकडून ताब्यात घेऊन त्याचे काम त्वरित मार्गी लावण्याचे आणि होटगी येथील एनटीपीसी प्रकल्पाला शहरातील एसटीपीचे पाणी देऊन पाणीपुरवठा कायमस्वरूपी सुधारण्याचे आदेश दिले आहेत.

सोलापूर शहर पाणीपुरवठा योजने अंतर्गत शहरातील सर्व भागात साधारण ७५३ किमी अंतरावर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. तसेच १५० किमी ट्रंकलाईन, पाण्याचे वितरण करण्यासाठी २० ठिकाणी उंच टाक्यांची उभारणी, एमबीआर, सबपंप आणि सोरेगाव व पाकणी येथे पाणी शुद्ध करण्याचा प्लान्ट उभारण्यात येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *