प्रत्येकाला आपला उदरनिर्वाह करण्याकरीता, घर चालविण्याकरीता ‘अर्था’ची म्हणजेच पैशांची गरज पडते. पैसा जपून वापरावा लागतो. त्याच्या खर्चावर नियंत्रण असावे लागते. एकूणच पैशांचा वापर करताना जमा-खर्चाचा योग्य ताळमेळ ठेवावा लागतो. तो ठेवला नाही तर गणित बिघडते आणि आपल्याला विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. अगदी या सर्वसामान्य उदाहरणाप्रमाणे राज्याच्या अर्थव्यवस्थेविषयी प्रत्येकाने जागरूक असणे आवश्यक आहे. कारण लोकशाहीमध्ये मतदार जसा महत्त्वाचा आहे. अगदी त्याचप्रमाणे राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैशांचा ताळेबंद खूप महत्त्वाचा आहे. तो समजून घेणे ही एक प्रक्रिया आहे. बऱ्याच जणांना ही प्रक्रिया किचकट वाटते. पण ही किचकट वाटणारी प्रक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत…! या पुस्तकातून खूप छान पद्धतीने मांडली आहे.
आपण ज्या देशात किंवा राज्यात राहतो. तिथला कारभार व्यवस्थितपणे चालावा यासाठी त्याचे एक बजेट (अर्थसंकल्प) असते. या बजेटच्या प्रक्रियेतून सरकारकडे पैसा जमा होत असतो आणि त्या जमा झालेल्या पैशांतून सरकार नागरिकांना विविध प्रकारच्या सोयीसुविधा पुरवत असते. आता बजेट हा शब्द आपल्या इतक्या अंगवळणी पडला आहे की, तो सर्रास आपल्याला ऐकायला मिळतो. अगदी कॉलेजला जाणाऱ्या मुलांकडून ते घराचा संसार चालवणारी गृहिणी किंवा एखादे आजी-आजोबा असो, या सर्वांनाच आपल्या बजेटची चिंता असते. पण तुम्हाला यातली गंमत माहिती आहे का? बजेट या मूळ शब्दाचा आर्थिक जमा खर्चाशी तसा काहीएक संबंध नाही. बजेट या शब्दाची उत्पत्ती फ्रेंच भाषेतील ‘bougette’ म्हणजेच चामड्याचे पाकीट या शब्दापासून झालेली आहे. आपल्याकडे अर्थसंकल्प वाचण्यापूर्वी त्याची पुस्तके ठेवण्यासाठी लाल चमड्याच्या बॅगेचा वापर केला जात होता. त्यातूनच हा शब्द बजेटसाठी वापरण्याची परंपरा सुरू झाली असेल, असे अंदाज लावला जातो.
अर्थसंकल्प म्हणजे नेमके काय?
अर्थसंकल्प वाचणे किंवा तो समजून घेणे, ही वाटते तितकी सोपी प्रक्रिया नाही. अर्थात देशाचा व राज्याचा आवाका मोठा असल्याने त्यातील बारकावे आणि तपशील समजून घेण्यात बऱ्याचवेळा अडचणी येऊ शकतात. त्यासाठी काही शब्दांचे अर्थ व शब्दप्रयोग समजून घेणे आवश्यक आहे. जसे की बजेट हा शब्द आता मराठीतही रूढ होऊ लागला आहे. पण इंग्रजी Budget याचा मराठीत अर्थसंकल्प असा शब्दप्रयोग वापरला जातो. बऱ्याचवेळा अर्थसंकल्पातील मराठी शब्दांचे अर्थ ही कळण्यास अडचण येते. त्याचे स्पष्टीकरण माहित नसेल तर बजेट समजण्यास अडचण येऊ शकते. यासाठी देवेंद्रजींनी जिथे-जिथे शक्य आहे. तिथे साध्या-सोप्या भाषेत त्या शब्दांचे स्पष्टीकरण दिले आहे. उदाहरणार्थ – आर्थिक वर्ष म्हणजे नेमके काय असते? ते कधी सुरू होते? वित्त विधेयक (Finance Bill) मंजूर होते म्हणजे नेमके काय मंजूर होते. राज्याच्या तिजोरीत जमा होणाऱ्या पैशाला एकत्रित निधी म्हटले जाते. या एकत्रित निधीमध्ये टॅक्स, महसुली अनुदाने (Revenue Grant), सरकारने कर्जाच्या माध्यमातून मिळवलेला निधी, तसेच जमा पैशांवरील व्याज असे विविध माध्यमातून सरकारच्या तिजोरीत जमा होणाऱ्या निधीला एकत्रित निधी म्हटले जाते. हा निधी खर्च करण्याच्या पद्धती. जसे की, भारित खर्च Charged) किंवा दत्तमत खर्च (Voted) म्हणजे काय? त्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते. याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे अर्थसंकल्प वाचताना त्याचे संदर्भ स्पष्ट होतात.
अर्थसंकल्प म्हणजे फक्त अर्थमंत्री वाचतात ते भाषण नसते. अर्थसंकल्पाचे भाषण हा त्यातला एक भाग असतो. ज्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींची घोषणा असते. पण बऱ्याचवेळा या अर्थसंकल्पाच्या भाषणावर आधारित संपूर्ण अर्थसंकल्पाचा अंदाज लावला जातो. तो बहुतांश चुकीचा ठरू शकतो. अर्थसंकल्पाच्या भाषणाबरोबरच अर्थमंत्री राज्यासमोर राज्याची आर्थिक पाहणी अहवाल ठेवतात. या अहवालातून राज्याची चालू आर्थिक वर्षाची स्थिती कळण्यास मदत होते. त्यातून मागील तीन वर्षापूर्वीचे प्रत्यक्ष आकडे, मागील अर्थसंकल्पात सुधारणा केलेले आकडे आणि आगामी वर्षासाठी तरतूद केलेले आकडे असतात. ते समजून घेतल्याशिवाय अर्थसंकल्पाचा अर्थ लावता येत नाही. यासाठी देवेंद्रजींनी अर्थसंकल्पाच्या संज्ञांबरोबरच त्याच्या वेगवेगळ्या पुस्तकातून कोणती माहिती दिलेली असते, याविषयी मार्गदर्शन केले.
अर्थसंकल्पाची रचना हा एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि महत्त्वाचा भाग देवेंद्र फडणवीस यांनी या पुस्तकातून सोपा करण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की, अर्थसंकल्पाचे प्रमुख भाग कोणते. त्याचे विभागानुसार, विषयानुसार वर्गीकरण कसे केले जाते. त्याला शीर्ष आणि शिर्षक कसे देतात. महसुली जमा, महसुली खर्च, भांडवली जमा, भांडवली खर्च म्हणजे काय? अर्थसंकल्पातील लोकलेखा म्हणजे काय? त्यात कोणत्या शीर्षाखालील निधी जमा होतो. याविषयी वाचकांना मार्गदर्शन करण्यात आले. एकूण ९ प्रकरणांमधून अभ्यासकांना अर्थसंकल्प कसा समजून घ्यायचा, याबद्दल सांगितले आहे. एकंदरीत हे पुस्तक कोणालाही सहज वाचता येईल, समजून घेता येईल, अशा सोप्या भाषेत लिहिलेले आहे. सर्वसामान्य मतदार, पत्रकारितेचे विद्यार्थी, वाचक, राजकीय नेते अशा सर्वांना उपयोगी पडेल असे पुस्तक आहे.