देवेंद्र फडणवीस राजकीय प्रवास | Devendra Fadnavis Political Career and Work in Marathi
देवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास आहे की, राजकारण हे असे माध्यम आहे; ज्यात सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणण्याची ताकद आहे. त्याच माध्यमातून ते गेली २५ वर्षे महाराष्ट्रात काम करत आहेत. संघाचा शिस्तप्रिय कार्यकर्तापासून, भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्यकर्ता, नगरसेवक, महापौर, आमदार, पक्षाचे प्रदेश अध्यक्ष ते महाराष्ट्र राज्याचे एक सक्षम मुख्यमंत्री म्हणून प्रामाणिकपणे काम केले. त्यांच्या या कार्यबाहुल्यामुळे आज ते राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र सेवक म्हणून ओळखले जात आहेत.
देवेंद्र फडणवीस हे अपघाताने राजकारणात आलेले नाही. त्यांनी या क्षेत्रात खूप विचार करून प्रवेश केला आहे. तसा त्यांना घरातून संघाच्या शिस्तीचा आणि राजकारणाचा वारसा लाभला आहे. संघ परिवारातील संस्कार आणि राष्ट्रप्रेमाची भावना त्यांच्या नसानसांत भिनली. त्यादृष्टीने त्यांनी वयाच्या २१व्या वर्षात राजकारणात पदार्पण करत नागपूर महानगरपालिकेची प्रथमच निवडणूक लढवली. त्यावेळीही देवेंद्रजींनी फक्त राजकारणावर फोकस न करता एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या मतदारसंघातील लोकांच्या समस्या तत्परतेने मांडल्या. त्या पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेतील कामाची पद्धत समजून घेतली. मुख्य म्हणजे देवेंद्रजी प्रत्येक गोष्टीचा खोलात जाऊन विचार करतात.
१९९२ मध्ये म्हणजे वयाच्या २१व्या वर्षी देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतर ते १९९७ मध्ये पुन्हा एकदा नगरसेवक झाले. दुसऱ्या टर्ममध्ये नगरसेवक झाल्यानंतर ५ मार्च १९९७ ते ६ फेब्रुवारी १९९८ या कालावधीत पहिल्यांदा महापौर झाले. यावेळी त्यांचे वय २६ वर्षे होते. त्यानंतर ७ फेब्रुवारी १९९८ ते ४ फेब्रुवारी १९९९ या कालावधीत महापौरपदाचा दुसरा टप्पा पूर्ण केला. इतक्या कमी वयात महापौरपदावर विराजमान होणारे ते नागपुरातील सर्वांत तरुण महापौर ठरले. तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत तरुण महापौर होण्याचा मान ही त्यांच्या नावावर आहे. नगरसेवक आणि महापौर असताना देवेंद्रजींनी फक्त पदावर राहून राजकारण केले नाही. तर प्रत्यक्षात राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण केले. महापालिकेचे नियम समजून घेणे, त्याचा अभ्यास करणे, बारकावे समजून घेणे आणि त्यानुसार विषयाचा पाठपुरावा करणे, ही देवेंद्रजींची खासियत आहे.
सध्या नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार पाहिले तर ते निवडून येण्यासाठी अगोदर भरमसाठ पैसे गुंतवतात; आणि निवडून आल्यानंतर गुंतवलेले पैसे दामदुपटीने वसूल करण्याला प्राधान्य देतात. त्याला काही अधिकारी आणि ठेकेदार मदत करतात. परिणामी लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार काम करावे लागते. पण देवेंद्र फडणवीस यांनी या सिस्टिमला फाटा दिला. लोकांनी विश्वासाने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचा नेता म्हणून सर्व सूत्रे त्यांनी आपल्याच हाती ठेवली आणि लोकांची सोय होईल अशी विकासकामे करून घेतली.
ठेकेदारांची मोनोपोली संपवली!
नगरसेवक म्हणून लोकांची सेवा करत असताना एखाद्या विकासकामासाठी महापालिकेकडून निधी कसा मिळवायचा. याचा अनुभव फडणवीसांनी स्वत: प्रत्येक टेबलावर फाईल घेऊन जाऊन घेतला आहे. त्यामुळे त्यांचा बजेटचा अभ्यास एकदम पक्का झाला. महापालिकेतील त्यांच्या चिकित्सक अभ्यासाचे एक उदाहरण इथे नक्कीच नमूद करता येईल. त्यांना त्यांच्या वॉर्डमधील एका मैदानाला कुंपण घालायचे होते. त्यासाठी ठेकेदार नेमून सविस्तर फाईल तयार करायची होती. पण महापालिकेतील नेहमीच्या पद्धतीनुसार, तिथे ठेकेदारच फाईल तयार करायचा आणि तोच मंजूर करून आणायचा. पण देवेंद्रजींनी हा शिरस्ता मोडला आणि त्या कामाची फाईल त्यांनी स्वत:च तयार केली. ती मान्य करून घेण्यासाठी पालिकेतील व्यवस्था समजून घेण्यासाठी प्रत्येक टेबलावर ते स्वत: फाईल घेऊन गेले. यामुळे त्यांना प्रशासनाकडून विकासकामांसाठी निधी कसा मिळतो. त्यासाठी कोणती प्रक्रिया पार पाडावी लागते. तसेच अशा विकासकामांमध्ये सर्व गोष्टी ठेकेदारावर सोडून दिल्या तर कशा चुकीच्या गोष्टी होतात. याची माहिती त्यांना मिळाली. त्यांच्या या वृत्तीमुळे त्या विभागातील ठेकेदारांची मोनोपॉली संपली आणि चुकीच्या गोष्टींना आळा बसला.
लोकसेवा करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी सर्व घटकांच्या समस्या समजून घेऊन त्यानुसार त्यांच्याकडून कामे करून घेतली. त्यांनी फक्त अधिकाऱ्यांची झाडाझाडती घेतली नाही. जे अधिकारी प्रामाणिक होते. त्यांच्याशी मैत्री केली. त्यांच्या कामाचे कौतुकही केली. आपल्या परिचयातील लोकांची कामे करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांवर कधीच दबाव देखील टाकला नाही. याचेही एक चांगले उदाहरण आहे. महापौर पदावर असताना देवेंद्रजींकडे नागपूरमधील एक मोठे पत्रकार नेते आले होते. त्या पत्रकाराने बरीच वर्षे घराचा मालमत्ता कर भरला नव्हता. त्यामुळे पालिकेने ते घर लिलावात काढण्याची नोटीस काढली होती. तेव्हा त्या पत्रकाराने देवेंद्रजींची मदत मागितली होती. तेव्हा त्यांनी पालिकेतील एका अधिकाऱ्याला बोलावून त्यातून कसा मार्ग काढता येईल, असे विचारले. पण त्याचवेळी त्यांनी त्या अधिकाऱ्याला, त्या पत्रकारासमोरच असेही सांगितले की, त्यांना काही तरी कर हा भरावा लागलाच पाहिजे. त्यादृष्टिने अधिकाऱ्याने उपाय सुचवून देवेंद्रजींनी पालिकेचे नुकसान न करता त्या पत्रकाराला टप्प्या टप्प्याने पैसे भरण्याची मुदत देऊन मदत केली. अशाप्रकारे देवेंद्रजींनी लोकांना मदत करताना प्रशासनाचे नुकसान होईल, अशी भूमिका घेतली नाही.
राजकारण असो किंवा समाजकारण, ती जबाबदारी सांभाळताना आपण त्या पदाचे मालक नाही, तर विश्वस्त आहोत. काही दिवसांसाठी आपण ती जबाबदारी स्वत:हून स्वीकारली आहे. याचे भान ठेवूनच त्यांनी काम केले. त्यामुळे नगरसेवक असताना लोकांमध्ये जाऊन काम करताना आणि अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करताना त्यांना कोणतीच अडचण आली नाही.
विधिमंडळातील चिकित्सक आणि अभ्यासू आमदार – Devendra Fadnavis Political career
नागपूर महापालिकेतील यशस्वी कारकीर्दीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळातील एक चिकित्सक आणि अभ्यासू आमदार म्हणून आपली ओळख निर्माण केली. नगरसेवक पदावर असताना देवेंद्रजींचा एका वॉर्डमधील लोकांशी संबंध येत होता. तो महापौर झाल्यानंतर नागपूर शहरापर्यंत वाढला. पण आमदार झाल्यानंतर मतदारसंघाचा आवाका वाढला. विधिमंडळातील कामांची जबाबदारी वाढली. मतदारसंघातील लोकांच्या समस्यांबरोबरच महत्त्वाच्या विषयांवर धोरण तयार करणे, कायदे तयार करणे, राज्याच्या तिजोरीतून खर्च होणारा पै-पै चा हिशोब सरकारकडून मागणे आदी कामे वाढली. यामध्ये तर देवेंद्रजींचा हातखंडा होता. २०१४ पूर्वी विरोधी पक्षात असताना देवेंद्रजींनी विविध प्रकारच्या विषयांवर अभ्यासपूर्ण भाषणे केली. अर्थसंकल्पावरील त्यांचे भाषण ऐकण्यासाठी अनेक सदस्य आवर्जून उपस्थित राहतात. त्यांच्या भाषणात आकड्यांचा ऊहापोह असतो. सरकारने खर्च केलेले पैसे आणि त्यातून लाभार्थ्याला किती लाभ झाला, याचे स्पष्टीकरण असते. अनेक सदस्यांना अर्थसंकल्पाची पुस्तके कशी वाचायची, त्यातून माहिती कशी मिळवायची हे सुद्धा कळत नव्हते. त्यासाठी त्यांनी २००५ मध्ये ‘अर्थसंकल्प म्हणजे काय?’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात विधिमंडळात वापरल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाविषयीच्या संज्ञा, अर्थसंकल्पाच्या पुस्तके कशी वाचायची, त्यातून माहिती कशी पाहायची हे दिले. यातून देवेंद्र फडणवीस यांची एक लोकप्रतिनिधी म्हणून तळमळ दिसून येते. त्या तळमळीतूनच त्यांनी हे पुस्तक लिहिले.
आमदार असताना देवेंद्रजींनी विधिमंडळातील विविध प्रकारच्या विषय समिती, स्थायी समिती आणि संयुक्त निवड समितीच्या माध्यमातूनही काम केले. त्यांच्या प्रामाणिक आणि अभ्यासपूर्ण कामाच्या सवयीमुळे त्यांना कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचा ‘बेस्ट पार्लिमेंटरीअन अॅवॉर्ड’ मिळाला. देवेंद्र फडणवीस यांचा अधिवेशनातील स्वॅग काही निराळाच होता. देवेंद्रजींनी विरोधी पक्षात असताना विधिमंडळातील वेगवेगळ्या आयुधांचा खुबीने वापर केला. यात लक्षवेधी, अर्धातास चर्चा, अल्पकालीन चर्चा आणि अशासकीय कामकाज यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अशासकीय कामकाजामध्ये सरकार सोडून इतर सदस्यांना विधेयके, ठराव मांडता येतात. त्यांना अशासकीय विधेयके, अशासकीय ठराव म्हटले जाते. देवेंद्रजींनी २०१४ च्या अगोदर सरोगसी, लोकसेवा हक्क कायदा, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त सधारणा कायदा आदी विषयांवर विधेयके मांडली. यातील लोकसेवा हक्क विधेयकाचे २०१४ नंतर कायद्यात रुपांतर झाले. त्याचबरोबर सरोगसी या विषयावर विधिमंडळात चर्चा घडवून आणून सरकारला त्यावर समिती नेमण्यास भाग पाडले. अशाप्रकारे देवेंद्रजींनी आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळे विधिमंडळावर वेगळीच छाप पाडली होती.
प्रामाणिक काम आणि विकासावर ठाम
२०१४ च्या निवडणुकीनंतर राज्यात सत्ताबदल झाला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. फडणवीस यांचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदावरील कालावधी हा राज्याच्या राजकारणातील मैलाचा दगड ठरला. लोककेंद्री सरकार हा भाव लक्षात ठेवून त्यांनी धोरणात्मक पद्धतीने संपूर्ण ५ वर्षे सरकारचा कारभार चालवला. अत्याधुनिक तंत्राज्ञानाचा वापर, विकासाच्या दृष्टिने घेतलेले निर्णय, समस्यांचे निराकरण करणारे आणि परिणामकारक निर्णय घेऊन महाराष्ट्रात विकासाची लाट आणणारा हा काळ होता.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या राजकीय इतिहासातील दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. तर मागील ४७ वर्षांत मुख्यमंत्रीपदाचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री पदाबरोबरच फडणवीसांनी सरकारमधील विविध खात्यांचा कारभारही तितक्याच सक्षमपणे सांभाळला. यामध्ये गृह विभाग, सामान्य प्रशासन, आयटी, नगरविकास, न्याय व कायदा, बंदरे, माहिती आणि जनसंपर्क या खात्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सेवा हक्क कायदा लागू करण्याची घोषणा करून आपल्या पारदर्शक आणि सुशासन कारभाराची चुणूक दाखवली. त्यानंतर समृद्ध महामार्ग, मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो प्रकल्प, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड आणि मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (एमटीएचएल) सारखे महत्त्वाकांक्षी आणि शहराचा चेहरा बदलवणारे प्रकल्प राबवले. शहरांबरोबरच ग्रामीण भागासाठीही विविध प्रकारच्या योजना राबवल्या. देवेंद्रजींनी २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. नगरसेवक ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास (Devendra Fadnavis Political Career in Marathi) नक्कीच हेवा वाटणारा आहे.
संबंधित लेख