एमएमआरडीएला अर्थलाभ – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बीकेसीतील ३ महत्त्वाच्या व्यावसायिक भूखंडाच्या लिलावातून ३,८४० कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. तर यामाध्यमातून सुमारे १५ हजार हाय-टेक नोकऱ्या निर्माण होणार आहेत. या भूखंडाचे सोमवारी (दि. २ जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Investment Pooler CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटप करण्यात आले.

बीकेसीतील भूखंडांमुळे MMRDA मालामाल
दोन महिन्यांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या लिलावात सुमिटोमो रिअॅलिटी अॅण्ड डेव्हलपमेंट लिमिटेड या जपानी कंपनीने बीकेसीतील सी-१३ आणि सी-१९ या दोन भूखंडांसाठी, तर बीकेसीतीलच सी-८० या भूखंडासाठी ब्रूकफिल्ड स्ट्रॅटेजिक रिअल इस्टेट या आंतरराष्ट्रीय कंपनीने सर्वाधिक बोली लावली होती. या तीन भूखंडांच्या लिलावातून एमएमआरडीएला ३,८४० कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. जपानमधील सुमिटोमो रिअॅलिटी अॅण्ड डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीची भारतीय उपकंपनी गोईसू रिअॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सी-१३ आणि सी-१९ हे दोन भूखंड मिळवले आहेत. तर ब्रूकफिल्ड स्ट्रॅटेजिक रिअल इस्टेट या आंतरराष्ट्रीय कंपनीची भारतीय उपकंपनी स्क्लोस बंगलोस लिमिटेड या कंपनीने सी-८० हा भूखंड मिळवला आहे. या भूखंडांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी वाटप करून पुन्हा एकदा मुंबईत ग्लोबल गुंतवणुकीचा मुहूर्त साधला आहे.
बीकेसीमधील सी-१३ या भूखंडाचे क्षेत्रफळ ७,०७१.९० स्क्वेअर मीटर असून त्याची मूळ किंमत ९७४.५१ कोटी रुपये होती. लिलावामध्ये बोलीच्या माध्यमातून या प्लॉटला फायनल १,३६०.४८ कोटी रुपयांची किंमत मिळाली. तर सी-१९ या हा प्लॉट ६,०९६.६७ स्क्वेअर मीटरचा असून त्याची मूळ किंमत ८४०.१२ कोटी रुपये होती. त्याला लिलावामध्ये १,१७७.८६ कोटी रुपयांचा भाव अंतिम बोलीत मिळाला. तसेच सी-८० हा प्लॉट ८,४११.८८ स्क्वेअर मीटरचा असून त्याची मूळ किंमत १,१५९.१६ कोटी रुपये होती. त्याला १,३०२.१६ कोटी रुपयांचा भाव मिळाला. या लिलावातून एमएमआरडीएला अर्थलाभ झाला आहे.
१५ हजार हाय-टेक नोकऱ्यांची निर्मिती
सुमिटोमो रिअॅलिटी अँड डेव्हलपमेंट आणि ब्रूकफिल्ड स्ट्रॅटेजिक रिअल इस्टेट या कंपन्यांच्या माध्यमातून एमएमआरडीएला ३,८४० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. यातून सुमारे १५ हजार हाय-टेक नोकऱ्या निर्माण होणार आहेत. या अशा आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमुळे बीकेसी देशातील क्रमांक १ चे व्यावसायिक हब होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ५५ व्या वार्षिक बैठकीत एमएमआरडीएने सुमिटोमो आणि ब्रूकफिल्ड या कंपन्यांबरोबर अनुक्रमे ५ अब्ज आणि १२ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीए रिजनमध्ये २०३० पर्यंत ३०० अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि ३० लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. त्याचबरोबर या परिसरात अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करून, भूमिगत मेट्रो, एलिवेटेड मेट्रो व बुलेट ट्रेनच्या माध्यमातून बीकेसीला आंतरराष्ट्रीय बिझनेस हब निर्माण करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस (Investment Pooler Devendra Fadnavis) यांनी सोडला आहे.
संबंधित लेख: