महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्यात तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेला दिशा देत एक नवा आर्थिक अध्याय सुरू केला आहे. महाराष्ट्राला ‘डेटा सेंटर कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून ओळख मिळवून देणाऱ्या या प्रवासात, तंत्रज्ञान, आरोग्य, वाहतूक, आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये त्यांनी अभूतपूर्व गुंतवणूक आकर्षित केली. विशेषतः सिंगापूरसोबतचा वाढता सहकार्याचा प्रवाह, महाराष्ट्रासाठी नवीन उद्योग, संधी, आणि रोजगार घेऊन आला आहे.
नुकताच नवी मुंबईतील ऐरोली येथे कॅपिटालॅण्ड या जागतिक कंपनीच्या ‘कॅपिटालॅण्ड डेटा सेंटर, मुंबई ०१’ या डेटा सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग यांच्या हस्ते झाले. या अत्याधुनिक सुविधेसाठी ४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. ही गुंतवणूक महाराष्ट्राला डिजिटल भारताच्या केंद्रस्थानी घेऊन जाण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. या डेटा सेंटरमुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साठवणुकीची सुविधा उपलब्ध झाली आहे.नवी मुंबई हे भारतातील एक महत्त्वाचे डिजिटल केंद्र बनत आहे. मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरू या शहरांप्रमाणेच नवी मुंबई हे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत करणार आहे. 20भारतात सध्या ८०० दशलक्षाहून अधिक इंटरनेटचा वापर करणारे आहेत. त्यांना आवश्यक असलेली मजबूत अशी इकोसिस्टमसुद्धा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात डेटा सेंटरची मागणी झपाट्याने वाढेल. भारतातील डेटा सेंटरची क्षमता सध्या १.२ गिगा वॅट आहे; ती २०३० पर्यंत ४.५ गिगा वॅटपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई, ऐरोली येथील कॅपिटालॅण्ड डेटा सेंटरच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आणि कॅपिटालॅण्ड यांच्यात १९,२०० कोटी रुपयांचा गुंतवणूक करार झाला आहे. ज्याद्वारे येणाऱ्या काही वर्षांत राज्यात नवीन लॉजिस्टिक हब्स, इंडस्ट्रियल पार्क्स आणि अजून काही डेटा सेंटर्स उभारली जाणार आहेत. यातून नव्याने हजारो नोकऱ्या निर्माण होणार असून, महाराष्ट्रातील तरुणांना नव्या कौशल्यासह रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.
मणिपाल हॉस्पिटलचा सिंगापूरच्या कंपनीसोबत ७०० कोटींचा करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण धोरणांमुळे फक्त माहिती तंत्रज्ञानच नाही, तर आरोग्य सेवा क्षेत्रातही पायाभूत सोयीसुविधा तयार केल्या जात आहेत. यावेळी महाराष्ट्र शासन, मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस प्रा. लि. आणि सिंगापूरची टेमासेक कंपनी यांच्यात ७०० कोटी रुपयांचा गुंतवणूक करार (मेडिसिटी आरोग्य प्रकल्प) झाला आहे. या दोन कंपन्यांच्या माध्यमातून नागपूरमध्ये ३५० खाटांचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाणार आहे. हे हॉस्पिटल विदर्भ आणि मध्य भारतातील ‘मेडिकल हब’ म्हणून उदयास येईल. त्यातून मेडिकल टुरिझमला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांना आहे. यावेळी त्यांनी परदेशातील कंपन्यांच्या मदतीने फक्त हॉस्पिटलच नाही, तर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून नर्सिंग कॉलेजेस् आणि मेडिकल एज्युकेशन देणारी ‘मेडिसिटी’ विकसित करण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली आहे. यामुळे या भागात रोजगाराच्या साधारण ३ हजार नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत.
जेएनपीटी पोर्ट विकास अधिक सक्षम होणार
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने देशातीलच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणूकदारांचा ही विश्वास संपादन केला आहे. सिंगापूर पोर्ट ऑथॉरिटीच्या सहकार्याने जेएनपीटी पोर्टवर कार्यक्षम सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने मैपलट्रीसोबत ३००० कोटींचा सामंजस्य करार केला आहे. हे महाराष्ट्र औद्योगिक प्रगतीचे द्योतक आहे. या सर्व गुंतवणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योग, डेटा सेंटर्स, लॉजिस्टिक्स हब्स, आरोग्य केंद्र उभारली जाणार आहेत. आपल्या अर्थव्यवस्थेला इंडिया-सिंगापूर डिजिटल अर्थव्यवस्था करारातून चालना तर मिळणारच आहे. पण त्याचबरोबर लाखो तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यांच्या या रोजगार गाथेमध्ये ‘डिजिटल इंडिया’च्या संकल्पनेसोबत सुसंगत अशी धोरणे आहेत. जी महाराष्ट्राला भविष्यातील आर्थिक शक्ती बनवण्याच्या दिशेने पुढे नेत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आर्थिक आणि औद्योगिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत. ते फक्त कागदावरील आकड्यांपुरते मर्यादित नाहीत, तर त्यात महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याची ताकद आहे. आज महाराष्ट्र जगभरातील गुंतवणूकदारांसाठी आदर्श असे गुंतवणूक केंद्र बनू लागले आहे. याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच द्यावे लागेल. ते न्यू टेक्नॉलॉजी, इनोव्हेटीव्ह आयडियाज् आणि सर्वसमावेशक विकास यांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राला पुढे घेऊन जात आहेत.