काल दिनांक ८ मार्च २०२२ रोजी विधासभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांनी जो पेनड्राइव्ह बॉंम्ब फोडला. तब्बल १२५ तासांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे संपूर्ण महाविकास आघाडीचउघडी झाली. गेल्या अडीच वर्षांपासून देवेंद्र फडणवीसांनी सर्वोत्तम विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेतून ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभारावर करडी नजर ठेवत मविआच्या अक्षरशः नाकी नऊ आणले, ते पाहता ५ वर्षे मुख्यमंत्री पद सांभाळलेल्या देवेंद्रांची प्रशासनावर अजूनही किती पकड आहे हे दिसून येते. महाविकास आघाडीचे नेते हायड्रोजन बॉंम्ब फोडण्याच्या वल्गना करता करता तुरुंगात गेले आणि देवेंद्रांनी गपचूप अणुबॉंम्ब फोडूनही टाकला. हे पेनड्राइव्ह प्रकरण मविआतील तीनही पक्षांना इतके जड जाणार आहे कि यातून तीनही पक्षांचे नामोनिशाणंच महाराष्ट्राच्या राजकारणातून गायब होऊ शकते.
देवेंद्र फडणवीसांनी एकाच दगडात तीन पक्षी कसे मारले ते जाणून घेऊया.
पहिला पक्षी:- शरद पवार
शरद पवारांवर आजवर अनेकदा गंभीर आरोप झाले, परंतु पुढे ते टिकू शकले नाही किंवा प्रकरण दाबले गेले किंवा आरोप करणारेच उध्वस्त झाले. मात्र फडणवीसांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये “मोठे साहेब” म्हणून वारंवार जो उल्लेख केल्या जातोय ते “मोठे साहेब” दुसरे तिसरे कुणीही नसून शरद पवारच आहेत हे स्पष्टपणे कळून येतंय. त्यामुळे शरद पवार हे राज्य सरकारच्या कुठल्याही घटनात्मक पदावर नसताना बेकायदेशीरपणे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कट-कारस्थाने रचण्यासाठी राज्य सरकारच्या यंत्रणेला हवे तसे राबवून घेतात, प्रभावित करतात, घरात बसून समांतर सरकार चालविण्याचा उद्योग करतात आणि राज्यकारभारात ढवळाढवळ करतात हे सिद्ध होतंय आणि हा फार गंभीर गुन्हा आहे. फडणवीसांनी काढलेले दुसरे म्हणजे नवाब मालिकांचे प्रकरण ज्याला स्वतः न्यायपालिकेने सुद्धा दुजोरा दिला आहे, हे प्रकरण थेट देशद्रोहाशी निगडित आहे आणि या हि प्रकरणाचे तार शेवटी पवारांपर्यंत पोचणारच आहेत. त्यामुळे पवारांनी आजवर कितीही पैलवानांना चितपट केले असले तरी यावेळी मात्र त्यांच्यापुढे देवेंद्रांच्या रूपाने साक्षात कर्दनकाळ उभा आहे!
दुसरा पक्षी :- उद्धव ठाकरे
सदर प्रकरणात काही शिवसेना मंत्र्यांचाही उल्लेख झालेला आहे. त्यामुळे दोन प्रकारचे पर्सेप्शन निर्माण होते. एकतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे केवळ नामधारी आहेत, सरकारमध्ये काय याची त्यांना काहीही माहिती नाही किंवा सदर षड्यंत्रात त्यांचाही मुकसहभाग आहे, अशी प्रतिमा निर्माण होते. ज्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची प्रतिमा पूर्णपणे रसातळाला जाणार!
तिसरा पक्षी :- महाविकास आघाडी
आपल्या भ्रष्ट आणि निरंकुश राज्यकारभारामुळे अगोदरच जनतेच्या रोषाला सामोरे जाणाऱ्या महाविकास आघाडीची प्रतिमा या स्टिंग ऑपरेशनमुळे आणखीनच काळवंडणार आहे. त्यामुळे ज्यांचा या स्टिंग ऑपरेशनमध्ये सहभाग नाही अशा मविआ नेत्यांची सुद्धा निष्कारण प्रतिमा मलीन होणार आहे आणि तिथूनच मविआतील निर्णायक सुंदोपसुंदी अर्थात एंड गेमची सुरुवात होणार आहे. शरद पवारांच्या नादी लादून आपण फार मोठी घोडचूक केली याचा पश्चाताप अनेक मविआ नेत्यांना होतो आहे परंतु ते गप्प आहेत. परंतु या प्रकरणामुळे त्यांची तोंडेही उघडली जाणार.
देवेंद्रजींच्या वज्रामुळे एकनाथ खडसे, अनिल गोटेंसारखी छोटी-मोठी पाखरेही घायाळ होतील परंतु या मंडळींचे राजकारण अगोदरच संपलेले आहे. परंतु या पेनड्राइव्ह बॉंम्बमुळे पुढील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात महाविकास आघाडीचे अस्तित्व संपलेले असेल आणि देवेंद्रांच्या या थप्पडची गुंज मविआतील अनेक दिग्गजांच्या कानात येणारी अनेक वर्षे घोंगावत राहील हे मात्र नक्की!
अलीकडच्या काळात काही जाणती मंडळी देवेंद्र फडणवीसांची तुलना शरद पवारांशी करू पाहतात. परंतु अशी तुलना करणे खरंच हास्यास्पद आहे. परंतु हि तुलना पवार हे देवेंद्रांपेक्षा वय आणि अनुभवाने मोठे असल्याने हास्यास्पद ठरत नाही. तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांची ५ वर्षांची कारकीर्द हि अत्यंत पारदर्शी आणि महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारी ठरली. परंतु विरोधी पक्षनेतेपदामुळे देवेंद्रजींच्या लोकप्रियेला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे जी आजवर कुठल्याही विरोधी पक्षनेत्याला गाठता आलेली नाही, पवारांनाही नाही. मुख्यमंत्री म्हणून ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचे जोखड मानेवर नसतानाही देवेंद्रजींनी आपले तारतम्य, संयम आणि संतुलन जराही ढळू न देता ज्या शिताफीने महाविकास आघाडीला कोंडीत पकडले ते पाहता देवेंद्र हे पवारांपेक्षा इतके मोठे झालेत कि त्यांच्यापुढे पवार फारच खुजे वाटू लागले आहेत. त्यामुळे पवार आणि फडणवीसांची तुलनाच होऊ शकत नाही!