भारतासाठी, महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः शिवप्रेमींसाठी एक अत्यंत अभिनास्पद आनंदवार्ता आहे. युनेस्को संघटनेने छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या तब्बल १२ किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज साईट अर्थात जागतिक वारसा लाभलेले स्थळ म्हणून घोषित केले आहे. राम मंदिर निर्माणाचा आनंदाचा गोडवा अद्याप ह्रदयात तसाच तरंगत असताना ही आणखी एक शुभवार्ता म्हणजे दुग्धशर्करा योग्यच म्हणावा लागेल. राज्यातील रायगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, खंडेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग अशा १२ किल्ल्यांचा युनोस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या यादीत समावेश केला आहे. त्यामुळे आता जगभरातून पर्यटक, इतिहासाचे आणि पुरातत्व खात्याचे अभ्यासक शिवचरित्र समजावून घ्यायला महाराष्ट्रात येतील. यामुळे महाराष्ट्राचा विकास तर होणार आहेच पण त्याचसोबत शिवछत्रपतींचे महात्म्य संपूर्ण जगात पसरणार आहे.
परंतु इतक्या वर्षांनी हे अचानक कसे घडते आहे, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला देशाच्या राजकीय इतिहासात डोकावावे लागेल. देशात आणि महाराष्ट्रात तब्बल ७० वर्षे काँग्रेस आणि तत्सम पक्षांची सरकारे राहिली. यातील बहुतांश पक्ष हे हिंदुत्व विरोधी होते. त्यामुळे या काळात शिवकालीन इतिहासाचे विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणात झाले. डाव्यांनी तर अत्यंत उन्मत्तपणे ‘शिवाजी कोण होता’ असे एकेरी शीर्षक देऊन शिवकालीन इतिहास त्यांना हवा तसा मांडला. राजकीय पक्षांच्या वृक्षांवर वाढलेल्या ब्रिगेड सारख्या विषारी वेलींनी शिवचरित्राचा दुरुपयोग करत महाराष्ट्रात ब्राम्हण विरुद्ध इतर अशी दुही निर्माण केली. याच काळात स्वराज्यातील गड-किल्ल्यांची अत्यंत दुरावस्था झाली आणि त्यावर जिहादी अतिक्रमणे झाली. याच काळात शिवाजी महाराज कसे हिंदुत्ववादी नव्हते, असा प्रपोगंडा चालवत औरंगजेब आणि अफजल खानाचे निर्लज्जपणे उदात्तीकरण केले गेले. पुढे इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली की, ‘शिवजयंती’ हा सण महाराष्ट्रासाठी उत्साहाचा न बनता तणावाचा बनला. जेम्स लेनसारख्या परकीय एजंटाच्या लिखाणाचे दाखले देत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंसारख्या महान शिवभक्ताची यथेच्छ निंदा-नालस्ती केली गेली. महाराष्ट्र शिवविचारांना पारखा होतो की काय, अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली.
परंतु भगवत गीतेत भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा परमेश्वर कुणाला तरी पाठवून पुन्हा धर्माची स्थापना करतो. २०१४ मध्ये हिंदुद्रोही शक्तींचा देशात आणि महाराष्ट्रात दारुण पराभव झाला आणि केंद्रात नरेंद्र मोदी तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आले. नरेंद्र मोदींनी तर आपल्या प्रचाराची सुरुवातच रायगडाला जाऊन ‘छत्रपतींचा आशिर्वाद, चला देऊया मोदींना साथ’ या घोषणेने केली. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना हिंदवी स्वराज्याचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांचे मोठ्या प्रमाणात नूतनीकरण सुरु केले. त्यासाठी छत्रपती शिवरायांचे वंशज संभाजी राजे यांच्या नेतृत्वात एक समितीही निर्माण केली. प्रतापगड, विशाळगड सारख्या किल्ल्यांवरील जिहादी अतिक्रमणे ध्वस्त केली. अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक निर्माण करण्याची मोहीम हाती घेतली. अर्थात पुढे भाजपच्याच जुन्या मित्रपक्षातील काही मंडळींनी न्यायालयात जाऊन स्मारकाचे काम थांबविले.
गेल्याच अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीसांनी शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त गड-किल्ल्यांसाठी 350 कोटी रुपये मंजूर केले. याच वर्षी देवेंद्रजींच्या हस्ते मॉरिशसमध्ये शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले. महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच यंदाचा भारतीय नौसेना दिवस हा मोदीजींच्या प्रमुख उपस्थितीत कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर अत्यंत दिमाखात साजरा झाला. यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण झाले. नरेंद्र-देवेंद्र जोडीच्या शिवभक्तीची अशी अनेक उदाहरणे देता येईल. शेकडो वर्षांपासून लंडन येथे असलेली शिवाजी महाराजांची वाघनखे आणि भवानी तलवार महाराष्ट्रात आणायचे प्रयत्न सुरु आहेत, ते याच शिवभक्तांमुळे!
कालचक्र फिरते आहे, जग बदलते आहे. राम मंदिराच्या सोहळ्याला जगभरातून पाहुणे भारतात आले, तब्बल 30 देशांमध्ये रामोत्सव साजरा झाला. दुबई सारख्या मुस्लिम देशामध्ये भव्य मंदिर उभे झाले आणि शिवकालीन वैभवाचे साक्षीदार असलेल्या गड-किल्ल्यांच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये समावेश झाला. ही रामराज्याचीच चाहूल आहे. भारत आपल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक सर्व गुलामगिरीच्या शृंखला तोडून आज अभिमानाने जगाला आपल्या सनातन संस्कृतीच्या वैभवाचा परिचय देतो आहे. आज संपूर्ण जग वैश्विक महायुद्धाच्या आणि आर्थिक व राजकीय दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे असताना भारताचे प्रबळ होणे, काही वेगळाच दैवी संकेत देत आहेत!