हिंदुत्ववादी

शिवशौर्याचा ठसा जागतिक पटलावर; शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत

केंद्र सरकारने युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी ‘भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये’ या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे नामांकन पाठवले होते. युनेस्कोने या नामांकनाला मान्यता देत या १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा (युनेस्को मराठा किल्ले) यादीत समावेश केला आहे. या यादीत महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी या शिवकालीन किल्ल्यांचा समावेश आहे.

तमाम शिवप्रेमी, संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आपले शिवकालीन किल्ले हे फक्त प्राचीन बांधकामं नाहीत, तर ते मराठा साम्राज्याच्या शौर्याचे, दूरदृष्टीचे आणि स्वराज्य स्थापनेच्या अद्वितीय इतिहासाचे साक्षीदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी १७व्या शतकात हिंदवी स्वराज्य स्थापन करत, या किल्ल्यांचा प्रशासन, राजकारण, संरक्षण (मराठा लष्करी इतिहास) आणि सामाजिक न्याय अशा सगळ्या बाबी केंद्रस्थानी ठेवून उपयोग केला होता. याच किल्ल्यांमधून शिवरायांनी गनिमी कावा, युद्धनीती, अष्टप्रधान मंडळ, जलसंवर्धन, शेतकऱ्यांना आधार देणारे निर्णय आणि रयतेशी सुसंवाद यासारखी धोरणे राबवली. त्यांनी बांधलेल्या आणि स्वराज्याच्या संरक्षणासाठी निवडलेल्या या किल्ल्यांची रचना, स्थान यामध्ये भौगोलिक आणि टेक्निकल गोष्टींचा उत्तम मेळ साधलेला दिसतो. डोंगरमाथ्यावरील रायगड, शिवनेरीसारखे किल्ले, समुद्रातील खांदेरी, सुवर्णदुर्गसारखे जलदुर्ग, कोकण किनाऱ्यावरील विजयदुर्ग, सिंधुदुर्गसारखे किनारी किल्ले, तर पठारी आणि वनप्रदेशातील प्रतापगड आणि पन्हाळा हे सर्व किल्ले म्हणजे मराठा साम्राज्य आणि लष्करी स्थापत्याचा अद्वितीय नमुना आहे. या १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा श्रेणीत करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचा कणखरपणा जगभरात पोहोचणार…

युनेस्कोच्या निकषानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांचे हे किल्ले हे त्या काळातील सांस्कृतिक परंपरेची, लुप्त झालेल्या सभ्यतेबद्दल अद्वितीय अशी आठवण करून देतात. तसेच हे किल्ले स्थापत्य शास्त्राचे उत्कृष्ट नमुने आहेत. उपलब्ध भौगोलिक परिस्थिती आणि त्यानुसार तांत्रिक गोष्टींचा वापर करून याची रचना करण्यात आली. ज्यामुळे त्या काळातील, इतिहासातील महत्त्वाचे टप्पे अधोरेखित होतात. तसेच त्या काळाचा आपल्याला आता अनुभव घेता येत आहे. त्याचबरोबर हे किल्ले ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. स्वत:च्या हिमतीवर स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे, व्यवस्थापन शास्त्राचे जिवंत नमुने आहेत. त्यामुळे त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच निकषांमुळे हे १२ किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत आले आहेत. आपले हे किल्ले साधारण नाहीत. हे आपल्याला माहिती आहे. पण आता युनेस्कोच्या मान्यतेनंतर या किल्ल्यांचे महत्त्व केवळ देशापुरते मर्यादित राहणार नाही. त्यांचा आता जागतिक पातळीवर गौरव होणार आहे. जगभरातील पर्यटकांना हे किल्ले पाहण्यासाठी आकर्षित ठरणार आहेत. त्यातून स्थानिक पर्यटन, रोजगार आणि सांस्कृतिक संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे. याशिवाय युनेस्कोकडून शास्त्रशुद्ध संवर्धनासाठी तांत्रिक मदतही मिळणार आहे, जी आपल्या इतिहासाच्या अभ्यासाला आणि किल्ल्यांच्या देखभाल प्रक्रियेला अधिक बळकटी देईल.

राज्य सरकारने आणि पुरातत्व विभागाने गेल्या काही वर्षांत या किल्ल्यांच्या डागडुजीसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. २०२३ च्या अर्थसंकल्पामधून तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गड-किल्ल्याच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. त्यामुळे आज आपल्याला हे ऐतिहासिक क्षण अनुभवता, पाहता येत आहेत. आपले हे किल्ले फक्त ऐतिहासिक वास्तू नाहीत; ते शिवरायांच्या विचारांचा, व्यवस्थापन कौशल्याचा आणि स्वराज्याच्या मूलभूत तत्त्वांचा जिवंत दस्तऐवज आहे. युनेस्कोच्या या मान्यतेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांची नीती, युद्धकौशल्ये आणि समाजभान हे सर्व जगासमोर प्रभावीपणे उभं राहणार आहे. त्यमुळेच हा क्षण महाराष्ट्र आणि भारताच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक जीवनातील एक सुवर्णक्षण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *