2014 नंतर अपवाद वगळले तर विरोधकांना भाजपाला निवडणुकीत हरवता आलेलं नाहीये. आपलं काय चुकतंय, त्यात कोणती सुधारणा केली पाहिजे एवढा सारासार विचार करण्याचे कष्ट घेण्याऐवजी वेगवेगळी भाडोत्री हत्यारं उपसण्याचे उपद्व्याप विरोधक करत आहेत. राष्ट्रीय पातळीवर भाजपच्या विरोधात चालवले जाणारे ‘टूलकीट’ आता महाराष्ट्रात सर्रास वापरलं जात आहे. तिथं पंतप्रधान नरेंद्र, इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र विरोधकांचा एककलमी कार्यक्रम एकच की दोघांची बदनामी करणे. देवेंद्र फडणवीस हे विरोधकांसाठी राजकीय मैदानात अनबिटेबल आहेत. ही गोष्ट वेळोवेळी सिद्ध झालेली आहे. त्यांच्या मुख्यमंत्री पदाची कारकिर्दीत, पाच वर्षे पूर्ण न करू देण्यासाठी केलेले आटोकाट प्रयत्न सपशेल फेल ठरले. अर्थात ते प्रयत्न निष्प्रभ करण्याचं कसब आणि क्षमता या दोन्ही गोष्टी फडणवीस यांच्याकडे आहेत. जनतेच्या मनात आणि निवडणुकीच्या सर्वेत फडणवीसच आहेत हे त्रिवार सत्य आहे. म्हणूनच तीन पक्षांना एकत्र यावं लागलं. पण तिथंही फडणवीस पुरून उरले आणि राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत चितपट करून गृहमंत्री म्हणून पुन्हा आले. महाविकास आघाडीच्या काळात लागलेला वसुलीचा काळा डाग पुसण्यापासून सुरुवात करावी लागली. पण फडणवीसांवर कोणताही डाग नाही तर मग त्यांची प्रतिमा कशी डागाळता येईल यासाठी नवी पथकथा लिहिण्यास सुरुवात झाली.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना गृह मंत्रालय देखील सक्षमपणे सांभाळले होते. विरोधक आणि विरोधकांचे पत्रकार त्यांची ‘पार्टटाइम गृहमंत्री’ म्हणून हेटाळणी करायचे तेव्हा फडणवीसांनी सांगितलं की मी ‘ओव्हरटाइम गृहमंत्री’ आहे. शरद पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या अखेरच्या कारकिर्दीत त्यांनी गृहमंत्रीपद स्वतःकडेच ठेवलं होतं हा इतिहास कच्चा असल्याने तसे प्रश्न उपस्थित केले गेले. जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष असतं तसं देवेंद्र फडणवीस यांचंही असतं. मुख्यमंत्री झाल्यावर सर्वप्रथम त्यांनी पोलिसांना सन्मान देण्याचं काम केलं. मंत्र्यांचं प्रत्येक वेळी जिल्ह्यात आगमन झाल्यावर पोलीस दलाकडून त्यांना सलामी दिली जायची. ही सलामी देण्याची इंग्रजाळलेली प्रथा त्यांनी बंद केली. आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात असलेला अपराध सिद्धीचा दर (Rate of conviction) 8 टक्क्यांवरून 54 टक्क्यांवर नेला. नवीन सुमारे 53 पोलीस ठाण्यांची निर्मिती केली. आधीच्या सरकारपेक्षा हा आकडा पाचपट अधिक आहे. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर 2120 कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा खर्च पूर्वीच्या सरकारपेक्षा तिप्पट आहे. फडणवीसांच्या कारकिर्दीत कुठेही बॉम्बस्फोट झाला नाही. त्यामुळे कुठे झाला कुठे नाही यावर त्यांना थापा मारण्याची वेळ आली नाही. आता विविध जिल्ह्यात उसळणाऱ्या हिंसाचारासाठी भाजपला जबाबदार धरलं जात आहे. मुळात मोदी सरकारच्या 9 वर्षे पूर्तीचे कार्यक्रम, कल्याणकारी योजनांची माहिती आणि लाभार्थी संपर्क अशा सकारात्मक गोष्टी धुमधडाक्यात साजऱ्या करत असताना असल्या अनैतिक कृत्यांची भाजपला गरजच नाही. एखादा विरोधी पक्षाचा कार्यकर्ता पकडा आणि त्याला विचारा की सरकारच्या कल्याणकारी योजना किती. तो सांगेल किती ठिकाणी हिंसाचार झाला. ज्याच्या डोक्यात जी गोष्ट त्याच्या डोक्यात तीच आकडेवारी. ज्या महाविकास आघाडीने एसटीच्या कर्मचाऱ्यांना संप करायची वेळ आणली त्याच एसटीचं उत्पन्न फडणवीस आता खोऱ्याने वाढवत आहेत.
गृहमंत्री म्हणून आणि आता हाती असलेली इतर मंत्रालयं याबाबतीत फडणवीसांचा ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त असल्याने विरोधकांच्या पोटात दुखत आहे. पोलीस दलातील म्होरक्यांना हाताशी धरून फडणावीसांना जेलमध्ये टाकण्याचे सुद्धा प्रयत्न करण्यात आले. फडणवीस यांनी गृहमंत्री असताना पोलीस अधिकाऱ्यांना दिलेला सन्मान, काम करायला दिलेला फ्री हँड याची जाणीव ठेवून सद्सद्विवेक बुद्धी जागृत असलेल्या अधिकाऱ्यांनी वेळीच त्यांना सावध करण्याचं काम केलं.
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेदरम्यान आदित्य ठाकरे यांना श्वास घ्यायला त्रास झाला होता, संतांच्या पालख्या आणल्या त्या एसटीचं भाडं घेतलं. अशा लोकांनी वारकऱ्यांच्या नावाने राजकारण करू नये. ज्यांच्या काळात साधूंची क्रूरपणे हत्या झाली त्यांनी कायदा व सुव्यवस्थेबद्दल बोलू नये. विरोधकांनी अनेक आंदोलनांना फूस लावली, जातीयवाद केला, कौटुंबिक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. तरीही फडणवीस यांची विश्वासार्हता जनतेच्या मनात कायम आहे. केवळ सर्वसामान्य जनताच नव्हे तर उद्योगविश्व, गुंतवणूकदार, विविध समाजांचे नेते आणि विशेषतः विरोधी पक्षांचे आमदार अशा सगळ्यांना फडणवीसच जवळचे वाटतात. कारण फडणवीस यांना जेवढं प्रशासन कळतं तेवढं प्रशासन 15-15 वर्षे मंत्री म्हणून काम केलेल्यांना देखील कळत नाही. म्हणून तर गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी वीस पेक्षा अधिक आमदारांनी राजीनामा देऊन सत्ताधारी पक्षांत प्रवेश केला होता. ज्या लोकांचं राजकीय वय हे फडणवीसांच्या वयापेक्षाही जास्त आहे त्यांनाही फडणवीस पुरून उरले आहेत. या सगळ्यामुळे त्या लोकांना फडणवीस खुपतात. दुर्दैव हे आहे की एकानेही फडणावीसांपेक्षा गुणात्मकदृष्ट्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त काड्या घालणे आणि कांड होतंय का बघणे एवढाच उद्योग अनेकांनी केला. वारकऱ्यांवर लाठीमार झाल्याची खोटी बातमी असेल किंवा सातत्याने होणारे हिंसाचार असतील हे फडणवीस पर्यायाने भाजपची प्रतिमा मलिन करण्याचं षडयंत्र आहे.
आता निर्णय आपला आहे…या नतद्रष्ट लोकांच्या उठाठेवींना भीक घालायची की सुशासनाचा पाया भक्कम असणाऱ्या फडणावीसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहत भाजपला पुन्हा कौल द्यायचा.