देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे राजकीय नेते आहेत. मागील ३३ वर्षापासून ते राजकारणात आहेत. तर महाराष्ट्राच्या विधिमंडळातील त्यांच्या कारकीर्दीला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. २०२४ मध्ये ते सहाव्यांदा आमदार म्हणून नागपूरचे प्रतिनिधित्व करत आहेत. २०१४ ते २०१९ या दरम्यान त्यांनी महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. २०२२ ते २०२४ या कालावधीत उपमुख्यमंत्री म्हणून तर डिसेंबर २०२४ पासून पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून ते राज्याची सेवा करत आहेत. महाराष्ट्र त्यांना राजकीय नेते आणि महाराष्ट्र सेवक म्हणून ओळखतोच. पण त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे एक चांगले वक्ते आहेत. त्यांचे वाचन दांडगे आहे. ते लेखक आहेत; गीतकार आहेत. आज आपण त्यांनी २००५ मध्ये लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प म्हणजे नेमके काय?’ या पुस्तकाविषयी अधिक जाणून घेणार आहोत.
देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी महाराष्ट्रातील नागपूर येथे झाला. ते महाविद्यालयामध्ये असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीव्हीपी) काम करत करत होते. त्यानंतर ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नगरसेवक, आमदार आणि मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली आहे. कायद्यातील शिक्षणामुळे प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करून त्याची आपल्या पद्धतीने मांडणी करणे, हे देवेंद्रजींचे वेगळेपण आहे. विधिमंडळात त्यांनी अशाच पद्धतीने वेगवेगळ्या धोरणांवर, राज्याच्या अर्थसंकल्पावर अभ्यासू भाषणे केली आहेत. अर्थसंकल्प हा तसा इतरांसाठी खूपच कंटाळवाणा आणि डोक्याला त्रास देणारा विषय. पण अशा विषयांच्या मुळाशी जाऊन त्या पूर्णपणे समजून घेणे, ही देवेंद्रजींची काम करण्याची पद्धत. या कामाच्या पद्धतीतूनच त्यांनी अर्थसंकल्पाचा (Budget) सर्वांगिण अभ्यास करून तो इतरांनाही समजावा यासाठी त्यांनी ‘अर्थसंकल्प म्हणजे नेमके काय?’ यावर पुस्तक लिहिण्याचा संकल्प सोडला होता. या संकल्पाची पूर्तता दि. ९ एप्रिल २००५ (चैत्र शुक्ल प्रथमा) या दिवशी झाली होती. अर्थसंकल्प म्हणजे नेमके काय? या पुस्तकाची पहिली मुद्रित प्रत या दिवशी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर पुन्हा बरोबर ५ वर्षांनी २४ मार्च २०१० (श्री रामनवमी) रोजी याची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली होती. पुणे विद्यार्थी गृह प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले होते.
आणि पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली…
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदारकीच्या दुसऱ्या टर्ममध्ये अर्थसंकल्पावरील हे पुस्तक लिहिले. त्यांनी या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल सांगताना मनोगतात नमूद केले आहे की, साधारणत: अर्थसंकल्प म्हणजे किचकट आकडेमोड असा बऱ्याच जणांचा समज आहे. पण त्याविषयीची योग्य माहिती आणि ज्ञान मिळवल्याशिवाय त्याला पर्याय नाही. अन्यथा त्याबाबत आपण अनभिज्ञ राहू, अशी त्यांची भावना होती. दरम्यान, महाराष्ट्रातील युवा आमदारांनी विधान भवन मध्ये स्थापन केलेल्या ‘यूथ फोरम’च्या बैठकीत नवीन आमदारांची विधिमंडळातील तसेच सरकारी कामकाज शिकण्याची जिज्ञासा पाहून फक्त त्यांनाच नाही तर सर्वसामान्यांना अर्थसंकल्प कळेल, असे पुस्तक लिहिण्याची कल्पना त्यांना सुचली आणि त्यांनी ती २००५ मध्ये प्रत्यक्षात देखील आणली. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी विधिमंडळातील सहकारी आणि सर्वसामान्यांना सोप्या भाषेत अर्थसंकल्प कसा तयार होतो, त्याची विधिमंडळातील प्रक्रिया काय?, अर्थसंकल्प वाचायचा म्हणजे नेमके काय वाचायचे, अर्थसंकल्पात सतत वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे अर्थ काय? अशा गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
या पुस्तकाच्या निर्मितीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळातील लायब्ररीमध्ये बजेट या विषयावर उपलब्ध असलेल्या विविध पुस्तकांचा संदर्भ घेतला. त्याचबरोबर प्रत्यक्षात विधिमंडळात अर्थसंकल्पाविषयी चालणाऱ्या कामाबाबत विधिमंडळाच्या ग्रंथपालांकडून संदर्भसूची मिळवून त्याचा यात समावेश केला. या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीला विधिमंडळातील सहकारी आमदार, पॉलिटिकल सायन्स, अर्थशास्त्राचे अभ्यासक विद्यार्थी, प्रशासनात नव्याने रूजू होणारे कर्मचारी आणि विशेष करून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी या पुस्तकाला मोठा प्रतिसाद दिला. हे पुस्तक अर्थसंकल्पाचा अभ्यास करणाऱ्या किंवा तो समजून घेणाऱ्याला नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असे आहे.
अर्थसंकल्प म्हणजे नेमके काय? या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प (Budget) म्हणजे काय? त्याची नियोजन प्रक्रिया कशी चालते. विधिमंडळात अर्थसंकल्पावरील पुस्तके मिळतात म्हणजे नेमकी कोणती पुस्तके मिळतात? त्या पुस्तकातील संज्ञाचे अर्थ काय? उत्पन्न म्हणजे काय? खर्च म्हणजे काय? अंदाजपत्रक म्हणजे काय? उत्पन्नाचे आणि खर्चाचे अंदाजपत्रक कसे तयार केले जाते? त्याची प्रक्रिया काय? अशा मूलभूत प्रश्नांची माहिती या पुस्तकातून देण्यात आली. त्यामुळे अर्थसंकल्पाविषयी असलेली भीती आपोआप दूर होण्यास मदत होते.
अर्थसंकल्प म्हणजे काय? याबद्दल अजून सोप्प्या शब्दात सांगायचे म्हणजे आपल्या घरातील जमा-खर्चाचा हिशोब म्हणजे अर्थसंकल्प. त्यालाच इंग्रजीमध्ये बजेट (Budget) म्हणतात. हे बजेट जसे घराचे, एखाद्या कंपनीचे असते. तसेच ते राज्याचे आणि देशाचे असते. त्यावर राज्याची-देशाची प्रगती आणि पुढील दिशा ठरत असल्यामुळे ते जाहीररीत्या मांडले जाते. बजेट किंवा अर्थसंकल्प याविषयी देवेंद्रजींनी रंजक अशी माहिती दिली आहे. ती म्हणजे, राज्यघटनेत बजेट / अर्थसंकल्प असा शब्द कुठेही दिसून येत नाही.पण घटनेत वार्षिक वित्त विषयक विवरण पत्र (Annual Financial Statement) असा शब्द वापरला आहे आणि हे विवरण पत्र सरकारने प्रत्येक वर्षी सादर करून ते मंजूर करून घेणे आवश्यक असते. सरकारला बजेटच्या माध्यमातून विधिमंडळाची संमती घेऊनच राज्याचा जमा-खर्च मांडावा लागतो. याला सरकारी भाषेत महसूल जमा-खर्च, ताळेबंद, अंदाजित खर्च असे शब्द वापरले जातात.
अर्थसंकल्प हा प्रत्येक आर्थिक वर्षाचा मांडला जातो. पण बऱ्याच जणांना आर्थिक वर्ष (Financial Year) म्हणजे काय हे देखील माहित नसते. ते कधी सुरू होते, कधी संपते. जानेवारी ते डिसेंबर या इंग्रजी कॅलेंडर आणि चैत्र ते फाल्गुन या मराठी कॅलेंडर व्यतिरिक्त आर्थिक वर्षाचे अजून दुसरे कोणते कॅलेंडर असते का? याविषयी तसेच त्याच्या पुस्तकांविषयीची माहिती यात दिली आहे. राज्याच्या तिजोरीत पैसा येतो कुठून तसेच तो कोणकोणत्या गोष्टींवर खर्च होतो. तो कशाप्रकारे खर्च केला जातो. याविषयीची माहिती देण्यात आली.
बजेटची बॅगभरून पुस्तके!
अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर सर्व सदस्यांना त्याची माहिती असलेली पुस्तके दिली जातात. विधिमंडळात ही पु्स्तके एकत्रितरीत्या देता यावी. यासाठी ती बॅगेत भरून दिली जातात. पण बऱ्याच सदस्यांना त्या पुस्तकांचे करायचे काय, हे कळत नसायचे. त्यामुळे ते बॅगेतील पुस्तके काढून फक्त बॅग घेत असत. पण देवेंद्र फडणवीस यांचे उलटे होते. ते अशा सदस्यांकडून ती पुस्तके घेऊन अभ्यासकांना उपलब्ध करून देत होते. यातील गंमतीचा भाग सोडला तर, अर्थसंकल्प हा राज्याच्या दृष्टिने खूपच महत्त्वाचा भाग आहे. तो लोकप्रतिनिधी म्हणून सदस्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. कारण लोकप्रतिनिधी विधिमंडळात लोकांचे प्रश्न मांडत असतात. त्या प्रश्नांची उत्तरे, त्यासाठी करण्यात आलेली तरतूद किंवा सरकार जनतेसाठी किती आणि कसे पैसे खर्च करते, याची सर्व माहिती या अर्थसंकल्पाच्या पुस्तकांमध्ये दिलेली असते. ती लोकप्रतिनिधींनी समजून घेणे गरजेचे आहे. ती कशी समजून घ्यायची याचे मार्गदर्शन देवेंद्र फडणवीस यांनी ‘अर्थसंकल्प म्हणजे नेमके काय?’ या पुस्तकातून केले आहे.
या पुस्तकात अर्थसंकल्पाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. जसे की प्रत्यक्ष कर (Direct Tax), अप्रत्यक्ष कर (Indirect Tax), अनुदान आणि सार्वजनिक खर्च (Grant & Public Expenditure) याशिवाय, अर्थसंकल्पातील तूट आणि उधारीचे महत्त्वही स्पष्ट केले आहे. अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेतील गुंतागुंत कमी करून वाचकांना सरकारच्या आर्थिक धोरणांचे अधिक चांगले आकलन कसे होईल, यावर भर देण्यात आला आहे. हे पुस्तक फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर सर्वसामान्यांसाठीही उपयुक्त आहे.