कृषिगाथा

नमो शेतकरी सन्मान निधी योजना | Namo Shetkari Samman Nidhi Yojana Maharashtra

महायुती सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत ५ हप्त्यांची रक्कम जमा झाली होती. देवेंद्र फडणवीस सरकारने डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या सहाव्या हप्त्याची रक्कम नुकतीच जमा करण्यास सुरूवात केली.

राज्यातील शेतकऱ्यांना धान्य पिकवताना अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते. काहीवेळेस पाण्याची टंचाई निर्माण होते. तर काही वेळेस अतिवृ्ष्टीमुळे पिकांची नासाडी होते. या अशा संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना पुन्हा एकदा शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना मांडली होती. या योजनेंतर्गत केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकार प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये जमा करत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात वितरित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एकूण ९२.८९ लाख शेतकरी कुटुंबांना १९६७.१२ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. दरम्यान, उर्वरित ६५ हजार ४७ लाभार्थ्यांना हा निधी देण्यात आला. त्यानुसार राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता दिला जात आहे. यासाठी राज्य सरकारने २१६९ कोटी रुपये मंजूर करून ते शेतकऱ्यांच्या आधार आणि डीबीटी संलग्न बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान योजनचे ६ हजार आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे ६ हजार रुपये अशा दोन्ही योजनांचे मिळून राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १२ हजार रुपये जमा होत आहेत. या योजनेचा जवळपास १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ होत आहे. यासाठी राज्य सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद केली होती.

नमो शेतकरी सन्मान निधी योजना – Namo Shetkari Samman Nidhi

२०२३

तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ रोजी सादर केलेल्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ची घोषणा केली होती.

२०२३-२४ च्या अथकसंकल्पीय भाषणामध्ये तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारने भर घालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ३० मे २०२३ च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये अनुदानपर मिळतात. त्या योजनेत राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा समावेश करून लाभार्थी शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले जात आहेत. प्रत्येक ४ महिन्यांनी २ हजार रुपये लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होत आहेत. या योजनेचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै २ हजार रुपये, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर २ हजार रुपये आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च २ हजार रुपये असा ठरवण्यात आला. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पी.एम. किसान पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राज्यात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ केंद्राच्या ₹६००० सोबत राज्याचे ₹६००० अतिरिक्त

२०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेप्रमाणे वर्षाला ६ हजार रुपयांचे अनुदान देणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना २०२३-२४ पासून सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली. त्यानुसार सरकारने १५ जून २०२३ त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे निकष

या योजनेकरीता केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेसाठी तयार केलेल्या सूचना प्रमाण म्हणून गृहित धरण्यात आल्या आहेत. 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पी.एम. किसान पोर्टलवर नोंदणी केलेले आणि केंद्राच्या निकषानुसार पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र 

पी.एम. किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी करून पात्र ठरलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र 

लाभार्थी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून थेट बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार

नमो शेतकरी योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य

शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्य करणारी ‘नमो शेतकरी’ योजना

नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत एप्रिल ते जुलै या पहिल्या हप्त्याचे  १७२० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी १० ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यता देण्यात आली. 

नमो शेतकरी महासन्मान योजनेला मंजुरी – ट्विट १२ ऑक्टोबर २०२३

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शुभारंभ २७ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी एका क्लिकद्वारे राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १७१२.०२ कोटी रुपये पाठवून या योजनेचा शुभारंभ केला.

केंद्र सरकारच्या प्रेरणेतून राज्य नमो शेतकरी महासन्मान निधी योजना – ट्विट २७ ऑक्टोबर २०२३

२०२४

नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत ऑगस्ट ते नोव्हेंबर या दुसऱ्या हप्त्याचे  १७९२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी मान्यता देण्यात आली.

दुसऱ्या हप्त्याचे वितरण शासन निर्णय – २१ फेब्रुवारी २०२४

नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत डिसेंबर ते मार्च या तिसऱ्या हप्त्याच्या २ हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी २३ फेब्रुवारी २०२४ रोजी मान्यता देण्यात आली.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत एप्रिल ते जुलै या चौथ्या हप्त्याचे २ हजार ६१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी २० ऑगस्ट २०२४ रोजी मान्यता देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *