शांत, विचारी आणि ध्येयवादी व्यक्तींमध्ये अनेक प्रकारचे गुणविशेष असतात. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याच प्रकारच्या गुणविशेषामध्ये मोडणारे व्यक्तिमत्त्व. तसे देवेंद्रजींचे अनेक गुणविशेष आहेत; पण आज आपण त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्व या विशेष गुणाचा परिचय करून घेणार आहोत. देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आहेत. कायद्याचे, घटनेचे त्यांना विशेष ज्ञान आहे. देवेंद्रजींनी मराठा समाजाला २०१८ मध्ये दिलेले आरक्षण किंवा महाराष्ट्राला दुष्काळाच्या सावटातून बाहेर काढण्यासाठी आणलेली जलयुक्त शिवार योजना असो, किंवा यासारख्या इतर योजना असो, या उदाहरणाच्या माध्यमातून आपण देवेंद्रजींचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व जाणून घेणार आहोत.
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रथमच मराठा समाजाला १ डिसेंबर २०१८ रोजी सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातून (SEBC) आरक्षण मिळवून दिले होते. मराठा समाज जवळपास १९८० पासून आरक्षणासाठी संघर्ष करत होता. पण सत्तेत असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मराठा समाजाच्या या मागणीकडे सोयीस्करपणे कानाडोळा केला होता. मात्र समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी कटीबद्ध असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या होणाऱ्या उपेक्षेची दखल घेत या विषयाचा सविस्तर, सखोल, राजकीय, सामाजिक आणि घटनेतील तरतुदींचा अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले होते. पण समाजाच्या दुर्दैवाने आणि महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले. पण असे असले तरी ज्या कारणांमुळे न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले. त्याचा देवेंद्रजींनी कायदेविषयक मुद्देसूद अभ्यास केला आणि पुन्हा एकदा हे आरक्षण शाश्वत करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले. यासाठी देवेंद्रजींनी कायद्यातील तज्ज्ञांना हाताशी घेऊन, दिवस-रात्र एक करून कोर्टात टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला दिले.
नागरिकांच्या हिताचे निर्णय घेताना देवेंद्रजींनी नेहमीच सखोल अभ्यास केला. त्यामुळे त्यांनी घेतलेले सर्व निर्णय शाश्वत राहिले. मुंबईतील दळणवळणाच्या सुविधेसाठी अटल सेतू असो किंवा कोस्टल रोड असो… हे प्रकल्प अनेक दशकांपूर्वी भविष्याचा वेध घेत मांडण्यात आले होते. पण त्याची अंमलबजावणी करण्याचे धैर्य कोणालाच दाखविता आले नाही. वर्षानुवर्षे या प्रकल्पाच्या फायली मंत्रालयात धुळ खात पडल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळताच या प्रकल्पांवर काम करण्यास सुरूवात केली. त्यात त्यांनाही अनेक प्रकारच्या अडचणी आल्या. पण देवेंद्रजींनी हार मानली नाही. प्रत्येक अडचणींवर अभ्यास करत कायदेशीर तोडगा काढत आत्मविश्वासाने पाठपुरावा केला. त्यामुळे अशक्यप्राय वाटणारे हे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण होऊन मुंबईकरांच्या सेवेत दाखल देखील झाले आहेत. केंद्र सरकारने अलिकडेच मंजुरी दिलेल्या वाढवण बंदराचाही यात समावेश होतो. आपल्याकडे रिसोर्सेस काय उपलब्ध आहेत. त्याचा आपण वापर कसा करू शकतो. याचा सर्वांगिण अभ्यास करून देवेंद्रजी दिल्लीतून सहजपणे प्रकल्पांना मान्यता मिळवून आणतात. वरवर हे सहज, सोपे वाटत असले तरी ते वाटते तितके सोपे नाही. यामागे देवेंद्रजींचे अभ्यासू व्यक्तीमत्त्व काम करत असते.
महाराष्ट्रातील दुष्काळ आणि जलसंकटाच्या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी ‘जलयुक्त शिवार’ योजना आणली. मात्र त्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांतील पाणी नियोजन, उपलब्धता आणि निसर्गाचा लहरीपणा यांचा सखोल अभ्यास केला. त्यांनी विविध तंत्रज्ञानांचा आणि पारंपरिक जलसंधारण पद्धतींचा उपयोग करून ही योजना कार्यान्वित केली. यामुळे दुष्काळी भागातील गावांतील जलसाठ्यात वाढ झाली होती. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी त्यांनी कर्जमाफी आणि विमा योजना लागू केल्या. या उपाययोजनांसाठी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचा सखोल अभ्यास केला आणि त्यांना कर्जमाफीसाठी तसेच पीक विम्यासाठी विविध योजनांचा लाभ दिला. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आणि आत्महत्यांमध्ये ही घट झाली. इतकेच नाही तर त्यांनी शेतकऱ्यांची दिवसा बारा तास वीज उपलब्ध करून देण्याच्या मागणीवरही सखोल संशोधन केले आणि शेतकऱ्यासाठी सौर कृषी योजनेंतर्गत सौर पंप उपलब्ध करून दिले आणि शेतकऱ्यांना लागणारी वीज सोलर फिडरवर आणण्याचा निर्णय घेतला. यामुळे नजीकच्या काळात राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळणार आहे. शिवाय ती पूर्णतः मोफत असणार आहे.
जेव्हा कायदेशीर प्रक्रियेत अडकलेल्या विषयांचा प्रश्न समोर येतो, तेव्हा हे प्रश्न सोडविण्यात देवेंद्रजींचा हात धरू शकेल, असा राज्यात कुठलाच नेता डोळ्यासमोर येत नाही. मग तो न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेला भिडे वाडा असो किंवा मेट्रो ३ कारशेडचा विषय असो. मुंबईतील आरे कॉलनीतून मेट्रो ३ कारशेड हलवण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला होता. त्यांचा निर्णय प्रशासकीय संशोधनावर आधारित होता. ज्यामुळे शहरी विकासासाठी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित झाले. मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी त्यांनी ‘मुंबई नेक्स्ट’ प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पासाठी त्यांनी विविध देशांच्या आर्थिक विकासाच्या मॉडेल्सचा सखोल अभ्यास केला. त्यांनी आर्थिक सुधारणा, पायाभूत सुविधा विकास आणि वित्तीय सेवा केंद्रांचा विकास यावर विशेष लक्ष केंद्रित केले. यामुळे मुंबईच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आणि जागतिक पातळीवर तिचा दबदबा वाढला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना अधिक चांगल्या सेवा देण्याच्या उद्देशाने नागरी सनद असलेल्या लोक सेवा हमीचा अधिकार दिला. यामागे देवेंद्रजींची दूरदृष्टि आणि अभ्यासूपणा दिसून येतो. ज्या सेवा नागरिकांच्या हक्काच्या आहेत. त्यासाठी त्यांना अधिकाऱ्यांसोबत झगडावे लागत होते. टेबलाखालून पैसे द्यावे लागत होते. देवेंद्रजींनी या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करून नागरिकांना त्या सेवा ठराविक मुदतीत मिळवून देण्याचा अधिकार दिला आणि जे अधिकारी यात टाळाटाळ करतील त्यांना शिक्षा ठोठावण्याची तरतूद सुद्धा केली.
अगदी अलिकडच्या त्यांच्या अभ्यासकात्मक निर्णयात पिढ्यानपिढ्या एकाच जागेवर राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांना त्यांच्या जागेचे मालकी हक्क देण्याच्या निर्णयाचाही समावेश होतो. त्यांनी याविषयाचा पूर्ण कायदेशीर अभ्यास करून केवळ सरकारी जागेवरील झोपडपट्टीधारकांचा प्रश्न सोडवला नाही तर खासगी जागा सरकारच्या ताब्यात घेऊन त्यावरील झोपडपट्टीधारकांनाही मालकी हक्क मिळवून दिले. यापुढे जात त्यांनी झुडपी जंगलांच्या नोंदी कशा चुकीच्या आहेत हे सर्वोच्च न्यायलयाला उदाहरणांसहित पटवून दिले. त्यामुळे झुडपी जंगल नोंद असलेल्या झोपडपट्टीधारकांनाही आता लवकरच मालकी हक्क मिळणार आहे.
एकंदरित देवेंद्रजींसारखे एक अभ्यासू व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभले हे राज्यासाठी आणि राज्यातील तमाम जनतेचे भाग्यच म्हणावे लागेल. गेल्या दहा वर्षांत देवेंद्रजींमुळे महाराष्ट्राने जी प्रगती केली. त्यामुळे आपले राज्य देशाचे ग्रोथ इंजिन बनले. देवेंद्रजींच्या अभ्यासू नेतृत्वाखाली लवकरच आपल्या राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलरचा टप्पा लवकरच गाठेल.