नागपूरकरांचा विश्वास: १९९९ ते २०२४ पर्यंतचा देवेंद्र फडणवीसांचा विजयी प्रवास

देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द वयाच्या २१ व्या वर्षापासून सुरू झाली असली तरी, त्यांचा विधिमंडळातील प्रवास मात्र १९९९ पासून सुरू झाला. १९९९ मध्ये ते सर्वप्रथम नागपूर शहरातील नागपूर पश्चिम या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. २००४ मध्ये पुन्हा एकदा ते नागपूर पश्चिम या मतदारसंघातून निवडून आले. दरम्यान, लोकसभा व विधानसभा मतदारसंघ परीसिमन आदेश, २००८ नुसार मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार २००९ च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या वाट्याला नागपूर दक्षिण-पश्चिम हा मतदारसंघ आला. २००९ पासून २०१४, २०१९ आणि २०२४ अशी सलग चार टर्म त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यापूर्वीचे दोन टर्म असे एकूण ५ टर्म देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे विधिमंडळात प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या विधिमंडळातील कारकीर्दीला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १९९९ ते २०२४ पर्यंतची देवेंद्रजींची विधानसभेतील कामगिरी पाहता ती वर्षानुवर्षे चढत्या क्रमाने वाढलेली दिसून येते. त्यांच्या या कारकीर्दीचा आढावा आपण घेणार आहोत.

सुरूवातीची राजकीय कारकीर्द (१९९२ ते १९९९)

देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द भारतीय जनता पक्षाशी संलग्नित असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सुरू झाली. वयाच्या २२ व्या वर्षी म्हणजे १९९२ मध्ये त्यांनी नागपूरमधील रामनगर वॉर्डमधून नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली. ५ वर्षे नगरसेवक म्हणून काम केल्यानंतर १९९७ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी ते नागपूर महानगरपालिकेचे सर्वांत तरुण महापौर बनले. तर भारतातील ते सर्वांत दुसरे तरुण महापौर ठरले आहेत.  

राज्यस्तरीय राजकारणात प्रवेश (१९९९-२००९)

मार्च १९९७ ते फेब्रुवारी १९९९ पर्यंत नागपूरचे महापौर म्हणून काम केल्यानंतर देवेंद्रजींनी राज्यस्तरावरील राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी १९९९ मध्ये नागपूर पश्चिम या मतदारसंघाची निवड केली. हा मतदारसंघ १९६७ पासून अस्तित्वात असून १९९० पासून तिथे भाजपचा आमदार निवडून येत होता. १९९९ मध्ये देवेंद्रजींनी भारतीय जनता पक्षाकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवली. या पहिल्याच निवडणुकीत त्यांना तब्बल ९४,८५३ मते मिळाली. काँग्रेसच्या उमेदवाराचा जवळपास ९ हजार मतांनी पराभव करून त्यांनी प्रथमच महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश केला. १९९९ मध्ये अस्तित्वात आलेली विधानसभा दहावी विधानसभा होती. या विधानसभेत देवेंद्र फडणवीस हे सर्वांत तरुण आमदारांपैकी एक होते.

याच आमदारकीच्या कालावधीत देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर पश्चिम या मतदारसंघातील कामगार कॉलनी, तुकडोजीनगर येथील रहिवाशांना त्यांच्या जमिनींचे पट्टे मिळवून देण्याकरीता रस्त्यावरील संघर्षाबरोबरच विधानसभेत आवाज उठवला होता. त्यावेळच्या सरकारने १९९५ पर्यंतच्या मुंबईतील झोपड्या कायम करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयावर देवेंद्रजींनी आक्षेप घेत राज्यातील इतर शहरांतील झोपडपट्ट्यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची मागणी केली होती. यासाठी त्यांनी पुढील काळात न्यायालयीन लढाही दिला होता.

२००४ मध्ये पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर पश्चिममधून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा जवळपास १७,६१० मतांनी पराभव केला. देवेंद्रजींनी या निवडणुकीत १ लाख १३ हजार १४३ मते मिळाली होती. दुसऱ्या टर्ममध्येच त्यांनी नागपूर पश्चिम या मतदारसंघावर आपली चांगलीच पकड मजबूत केली होती. मतदारसंघाबरोबरच देवेंद्रजींनी विधिमंडळातील वेगवेगळ्या आयुधांचा अभ्यास करून त्याचा प्रभावीपणे वापर करण्यास सुरूवात केली. यामुळे ते विधिमंडळात भाजपचे प्रभावी युवा नेतृत्व म्हणून पुढे येऊ लागले.

मतदारसंघाची पुनर्रचना आणि राज्य नेतृत्वाची संधी (२००९ ते २०१४)

२००८ मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ बदलला. २००९ च्या निवडणुकीत त्यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा २७,७७५ मतांनी पराभव करत विजयाची हॅटट्रिक साधली. त्यांना या निवडणुकीत ८९,२५८ मते मिळाली. मागील तीन निवडणुकांमधील आकडेवारी पाहता देवेंद्रजींनी प्रत्येक निवडणुकीत दुपटीने विजय मिळवला आहे. जसे की, १९९९ मध्ये लढवलेल्या पहिल्या निवडणुकीत ९ हजार मतांचे लीड मिळवले होते. त्याची टक्केवारी साधारण ४.६६ टक्के इतकी होती. त्यानंतर २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत १७,६१० मते अधिक मिळवून ७.५६ टक्क्यांचे लीड मिळवले होते. त्यानंतर २००९ च्या निवडणुकीत २७,७७५ मते अधिक मिळवत १५.८८ टक्क्यांचे लीड मिळवले होते. 

२००९ च्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेली विधानसभा बारावी विधानसभा होती. या बाराव्या विधानसभेत देवेंद्रजींनी आपल्या मुद्देसूद भाषणांनी आणि अर्थसंकल्पावरील चर्चांनी विधिमंडळात विशेष छाप पाडली होती. याच कालावधीत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सभागृहाबाहेर मोठमोठी आंदोलने केली. तर सभागृहात सत्ताधारी पक्षाला वेगवेगळ्या आयुधांचा वापर करत सळो की पळो करून सोडले. त्याचीच परिणिती म्हणून २०१३ मध्ये देवेंद्रजींकडे राज्याचे प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले. त्यामुळे २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुका देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्या. २०१४ च्या निवडणुकांमध्ये देवेंद्रजींनी १ लाख १३ हजार ९१८ मते मिळाली. त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा ५८,९४२ मतांच्या फरकाने पराभव केला. हे लीड जवळपास ३०.८० टक्के इतके होते. या निवडणुकीनंतर देवेंद्रजींची विधिमंडळ नेते म्हणून निवड झाली आणि ते भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यावेळी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असा नाराच घुमला होता. 

मुख्यमंत्री व्हाया उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री (२०१९-२०२४)

२०१४ च्या विधानसभेतील प्रचंड विजयानंतर पक्षाने देवेंद्रजींना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले. त्यावेळी पक्षाचे १२२ आमदार निवडून आले होते. प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने भाजपाचे आमदार निवडून आले होते. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी राज्यात विकासकामांचा धडाका लावला. मुंबईत मेट्रोचे जाळे निर्माण केले. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सुरू केले. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना यशस्वीरीत्या राबवली. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी योजना राबवली. या विकासाच्या आधारावर देवेंद्रजींच्याच नेतृत्वाखाली २०१९ च्या निवडणुका लढवण्यात आल्या. या निवडणुकांमध्येही देवेंद्रजींनी घवघवीत यश मिळवत विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा ५० हजार मतांनी पराभव केला. त्यांना या निवडणुकीत १ लाख ९ हजार २३७ मते मिळाली. पक्षाचेही १०५ आमदार निवडून आले. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर देवेंद्रजी विराजमान होणार होते. पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर बस्तान बांधून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे चालल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलली आणि जुलै २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये देवेंद्रजींकडे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थ, गृह, ऊर्जा, जलसंपदा आदी खात्यांचा कारभार आला. देवेंद्रजींनी या संधीचा फायदा घेत पुन्हा एकदा राज्यात विकासकामांचा धडाका सुरू केला आणि २०२४ च्या निवडणुकांना सामोरे गेले.

२०२४ च्या विधानसभेच्या निवडणुका देवेंद्रजींच्यादृष्टीने खूपच महत्त्वाच्या होत्या. कारण सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपाला ९ आणि महायुतीला अवघ्या १७ जागांवर विजय मिळाला होता. त्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या तिसऱ्या टर्ममध्ये भाजपाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदही पक्षाला मिळवून द्यायचे होते. त्यानुसार देवेंद्रजींनी निवडणुकीचे व्यवस्थापन करून पक्षाचे १३२ आमदार निवडून आणले आणि देवेंद्रजी स्वत: नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून १ लाख २९ हजार ४०१ मते मिळवून जिंकून आले. या विजयाने त्यांनी विधिमंडळात निवडून येण्याचा षटकार मारला आहे. 

देवेंद्रजींच्या नेतृत्वात २०१४, २०१९ आणि २०२४ अशा तीन निवडणुका झाल्या. या तीनही निवडणुकांमध्ये भाजपाचे शंभरच्या वर आमदार निवडून आले. २०२४ च्या निवडणुकीत तर भाजपाला न भूतो न भविष्यती असे यश मिळाले आहे. त्यामुळे या तिन्ही टर्ममधील मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांचाच अधिकार होता. पण २०१९ मधील एका वेगळ्या राजकीय परिस्थितीमुळे देवेंद्रजींना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले होते. अन्यथा त्यांनी यावेळी संपूर्ण ५ वर्षे मुख्यमंत्रीपदाची हॅटट्रिक नक्कीच साधली असती.

देवेंद्र फडणवीस यांची १९९९ पासून सुरू झालेली राजकीय आणि विधिमंडळातील कारकीर्द आज एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचली आहे. या २५ वर्षांच्या राजकीय प्रवासात त्यांनी कुशल राजकारणी, प्रशासक आणि सक्षम नेतृत्व म्हणून देशपातळीवर आपली एक वेगळी ओळख प्रस्थापित केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राच्या विकासात अनेक महत्त्वाचे बदल घडून आले. त्यांची ही कारकीर्द विकास आणि प्रगतीने भरलेली आहे. त्यांच्या आगामी वाटचालीतही ते महाराष्ट्राची अविरत सेवा करत राहतील.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *