देवेंद्रजींची आश्वासन पूर्ती; डबेवाल्यांना मुंबईत मिळणार हक्काची घरे

मुंबईत १३० वर्षापासून नॉन-स्टॉप मुंबईकरांना डब्ब्याची सेवा पुरवणाऱ्या डबेवाल्यांना मुंबईत माफक दरात राज्य सरकार घरे बांधून देणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत डबेवाले आणि चर्मकार समुदायातील लोकांसाठी मुंबईत १२ हजार घरे निर्माण करण्याची घोषणा केली. याबाबत डबेवाले आणि चर्मकार संघटनेचे पदाधिकारी आणि प्रियंका होम्स रिअलटी यांच्यादरम्यान एक करार झाला. या करारानुसार या दोन्ही समुदायातील लोकांसाठी १२ हजार घरे उभारली जाणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबईत डबेवाला भवनच्या एक्सप्रिअन्स सेंटरचे भूमिपूजन केले होते. भूमिपूजनाच्या त्या कार्यक्रमात देवेंद्रजींनी डबेवाल्यांच्या घरांसाठी नेटाने पाठपुरावा करत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार देवेंद्रजींकडून विविध पातळीवर डबेवाल्यांच्या घरांसाठी सुरू होते. त्या पाठपुराव्याला अवघ्या वर्षभरात यश मिळाले असून, मुंबईत डबेवाल्यांसाठी १२ हजार घरे बांधली जाणार आहेत. यामध्ये मुंबईतील चर्मकार समुदायातील लोकांसाठीही घरे असणार आहेत. याबाबतचा एक करार नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डबेवाला संघटेनेचे पदाधिकारी, चर्मकार संघटनेचे पदाधिकारी आणि प्रियंका होम्स रिअलटी यांच्यात झाला.

डबेवाल्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या कामाच्या नियोजनाचे अनेक पातळीवर कौतुक होत आहे. हे डबेवाले सलग १३० वर्षे अविरत मुंबईकरांना सेवा देत आहेत. यामध्ये कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही. तरीही मुंबईच्या कानाकोपऱ्यातून, मुंबईबाहेरील ठाणे, कल्याण, बदलापूर, नवी मुंबई आदी परिसरातून गोळा केलेले डबे दुपारी मुंबईकरांना न चुकता मिळतात. त्यांच्या कामाच्या पद्धतीने अनेक मॅनेजमेंट कंपन्यांना भुरळ घातली आहे. त्यांच्या या कामाची कीर्ती इंग्लंडच्या राणीबरोबरच अमेरिका आणि इतर देशातही पोहोचली. एक्सपिरिएन्स सेंटरच्या माध्यमातून त्यांचे हे असामान्य कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला गेला. डबेवाले जरी तंत्रज्ञानाचा वापर करत नसले तरी अद्ययावत आणि प्रगत तंत्रज्ञान वापरून त्यांच्या कामाची महती जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी तेवढ्याच ताकदीचे सेंटर उभारण्यासाठी देवेंद्रजींनी मदतीचा हात दिला.

घराचं स्वप्नं ३ वर्षात साकारणार!

मुंबईतील डबेवाल्यांसाठी आणि चर्मकार समुदायातील बांधवांसाठी राज्य सरकार पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधणार आहे. यासाठी म्हाडा ही संस्था नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार आहे. प्रियंका होम्स रिअलिटीने या प्रकल्पासाठी ३० एकर जागा देऊ केली आहे. तर नमन बिल्डरकडून या जागेवर ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर घरे बांधून दिली जाणार आहेत. यातून ५०० चौरस फुटाची जवळपास १२ हजार घरे निर्माण होणार आहेत आणि ही घरे डबेवाले आणि चर्मकार समुदायातील समाजबांधवांना दिली जाणार आहेत. ही घरे अवघ्या २५ लाखात डबेवाल्यांना दिली जाणार आहेत. तसेच ही घरे अवघ्या ३ वर्षांत बांधून दिली जाणार आहेत.

देवेंद्रजींनी दिलेले आश्वासन पूर्ण केले!

विधानसभेत डबेवाल्यांच्या विविध प्रश्नावरील चर्चेत त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा आणि त्यांना माफक दरात घरे उपलब्ध करून देण्याची मागणी काही सदस्यांनी केली होती. त्यावेळी देवेंद्रजींनी विधानसभेत या चर्चेला उत्तर देताना डबेवाल्यांना मुंबईत माफक दरात घरे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

मुंबईचे  ग्लोबल डबेवाले

मुंबईचे डबेवाले हे जागतिक पातळीवर पोहोचले आहेत. त्यांच्यावर विविध देशात संशोधन सुरू आहे. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा अभ्यास केला जात आहे. तरीही मुंबईचे डबेवाले आपल्या सिद्धांतानुसार निष्ठेने काम करत आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळत आहे. यासाठी राज्य सरकार त्यांच्यापरीने सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *