वेदांत ठाकरे, रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील एका सामान्य कुटुंबातील गोड मुलगा. इतर मुलांप्रमाणेच खेळण्या-बागडण्याचे, दंगा करण्याचे त्याचे वय. परंतु चिमुकल्या वेदांतला कोवळ्या वयातच साक्षात काळाशी दोन हात करावे लागले. कारण वेदांत थॅलेसेमियाग्रस्त आहे. अवघा ६ महिन्याचा असतानापासून तो या बिकट आजाराशी झुंज देतो आहे. थॅलेसेमियामुळे रक्तातील हिमोग्लोबिन असंतुलित होऊन रुग्ण अत्यंत अशक्त बनतो. त्याहून दुर्दैवी बाब म्हणजे हा रोग अनुवांशिक असल्याने चिमुकल्या वेदांतची त्यात काहीच चूक नाही. त्यामुळे आपल्या जिज्ञासू वृत्तीने जगाशी परिचय करण्याच्या आणि चिक्कार दंगामस्ती करून शरीराचा विकास करण्याच्या वयात वेदांतवर अंथरुणाला खिळून राहण्याची पाळी आली. शिवाय थॅलेसेमियावरील उपचार महागडे असल्याने वेदांतच्या आई-वडिलांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेऊन वेदांतला उपचार देणेही शक्य नव्हते. त्यामुळे सर्व अशा गमावलेल्या वेदांत आणि त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यापुढे फक्त असहायता आणि अंधःकार दिसत होता. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते.
मुलाच्या ट्रीटमेंटच्या विवंचनेत असतानाच वेदांतचे पालक काही स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले आणि भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही बाब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोचली आणि वेदांतचे भाग्यच बदलले. देवेंद्रजींनी वेदांतच्या उपचारांसाठी तात्काळ ४० लाख रुपयांची मदत केली आणि नवी मुंबईतील एमजीएम या नामांकित रुग्णालयात वेदांतवर उपचार सुरु झाले. कधीकाळी अंथरुणाला खिळलेला वेदांत आज चालू फिरू शकतो आहे. आपल्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर वेदांतने जेव्हा देवेंद्रजींची भेट घेतली, तेव्हा तो प्रफुल्लित चेहऱ्यासह चक्क स्वतःच्या पायांवर चालत आला. देवेंद्रजींच्या मदतीमुळे वेदांत आज अन्य मुलांप्रमाणेच आपले बालपण मुक्तपणे उपभोगू शकतो. आपला अनुभव कथन करताना वेदांतची आई आणि वडील दोहोंचेही डोळे पाणावले. देवेंद्रजींनी देवदूताप्रमाणे आमच्या मुलाला जीवनदान दिले अशी भावना त्यांनी व्यक्त केली. खुद्द वेदांतने व्यक्त केलेले मनोगत अफलातून होते. वेदांत म्हणाला “देवेंद्र सरांमुळे मला उपचार मिळाले, आता मला एकदम भारी वाटतं. धन्यवाद देवेंद्र सर!”
अशा अनेक वेदांतच्या आयुष्यात देवेंद्रजी देवदूताप्रमाणे धावून आलेले आहेत. कारण देवेंद्रजी मुळातच संवेदनशील असले तरी रुग्णांच्या बाबतीत ते अतिसंवेदनशील आहेत. कारण त्यांनी कोवळ्या वयातच दुर्धर आजारामुळे आपले पितृछत्र गमावले. त्यामुळे एक फोन, एक एसएमएस किंवा अगदी तोंडी निरोप मिळण्याची देर, देवेंद्रजी व्यक्तिशः लक्ष घालतात आणि उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना मदत मिळवून देतात. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष नावाची स्वतंत्र यंत्रणाच या कामासाठी उभी केली ज्याचा फायदा लाखो गोर-गरीब रुग्णांना झाला. २०१४-२०१९ या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना ६०० कोटीहून अधिक रुपयांची वैद्यकीय मदत मिळाली. याच काळात देवेंद्रजींनी नागपुरात गरीब रुग्णांसाठी ५०० खाटांचे एक अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटलही उभारले आणि आज तिथे गरीब रुग्णांना अत्यल्प दरात देशातील टॉपच्या महागड्या हॉस्पिटल्सप्रमाणे अद्यायावत सुविधांसह अत्याधुनिक उपचार मिळत आहेत.
कोरोना महामारीच्या काळात जेव्हा संपूर्ण सरकार घरात बसून होतं, तेव्हा विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्रजी एकटे नेते होते ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत रुग्णसेवा केली. ती करताना स्वतः देवेंद्रजी कोरोनाचे बळी बनले, परंतु देवेंद्रजींनी शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन जनतेमधील भय नाहीसे करत एक नवा आदर्श स्थापन केला. आपल्या दुसऱ्या इनिंगमध्ये म्हणजे उपमुख्यमंत्री बनल्यानंतर देवेंद्रजींनी वल्ड बँकेच्या मदतीने राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला ५,००० कोटी रुपयांचा बूस्टर डोज दिला. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा १ लाखाहून ५ लाखांवर नेली. लवकरच शासकीय रुग्णालयात शुगर, ब्लड प्रेशर आणि कॅन्सरच्या टेस्ट्स व औषधी निशुल्क उपलब्ध केली जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र रोगराई मुक्त करण्यासाठी मिशनरी आणि व्हिजनरी देवेंद्रजी सातत्याने काम करत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या दुर्दैवाने विरोधकांच्या प्रत्येक शहाला काटशह देणाऱ्या देवेंद्रजींची ही बाजू माध्यमे जनतेपुढे आणण्यास कमी पडतात आणि त्यामागील कारणही महाराष्ट्राच्या जनतेला बऱ्यापैकी माहिती आहे.
केवळ रुग्णसेवक एवढीच देवेंद्रजींची ओळख नसून, अपघात असो, अपयश असो, नैराश्य असो किंवा राज्याबाहेर अडकलेले मराठी नागरिक असो, महाराष्ट्रातील कुठलीही व्यक्ती कुठल्याही संकटात असली आणि त्याची माहिती देवेंद्रजींपर्यंत पोचली तर देवेंद्रजी स्वतः जातीने लक्ष घालतात आणि संपूर्ण देशाची यंत्रणा कामी लावून मराठी माणसाला मदत करतात याची प्रचिती नुकतीच नेपाळमधील काठमांडू येथे अडकलेल्या मराठी पर्यटकांना आलेली आहे. याशिवाय ठाकरे सरकारच्या कार्यकाळात जेव्हा सरकारविरुद्ध उठणारा प्रत्येक आवाज चिरडल्या जात होता आणि सामान्य नागरिकांना, शिकणाऱ्या युवकांना तुरुंगात डांबले जात होते, तेव्हा त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहून त्यांना संपूर्ण कायदेशीर मदत करणारे देवेंद्र फडणवीसच होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचे संकटमोचक म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कर्तृत्वातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे ज्याचे आकलन करण्यात देवेंद्रजींचे विरोधक नेहमीच कमी पडतात आणि तोंडघशी पडतात!