अकोला

अकोल्यात विकासाचा नवा अध्याय: २६०० कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी

अकोला जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रातील सर्वांगीण विकासाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अलीकडेच विविध विकासकामांचे भूमिपूजन, कोनशिला अनावरण आणि लोकार्पण सोहळे पार पडले. सुमारे २६०० कोटींच्या भरीव निधीतून राबवण्यात येणारे हे प्रकल्प जिल्ह्याच्या पायाभूत सुविधा, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, वाहतूक, जलव्यवस्थापन आणि ऊर्जा क्षेत्रात नवे पर्व सुरू करणार आहेत. ग्रामीण भागांपासून शहरी भागांपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये समावेश असलेल्या या योजनांमुळे अकोल्याच्या विकासाला नवी दिशा आणि गती मिळणार आहे.

अकोला विकास: काटीपाटी बॅरेजमधून १८०० हेक्टर जमिनीला सिंचन लाभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णा नदीवरील ४५४.६२ कोटी रुपयांच्या काटीपाटी बॅरेज प्रकल्पाचे भूमिपूजन केले. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत अकोला जिल्ह्यातील काटीपाटी बॅरेज या प्रकल्पास २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारित ४५४.६२ कोटी रुपयांच्या खर्चास प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. अकोला जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील काटी गावाजवळ पूर्णा नदीवर बॅरेज व मातीचे धरण बांधण्यात येणार आहे. हा प्रकल्प तापी खोऱ्याच्या पूर्णा उपखोऱ्यात जिगांव पाणलोट क्षेत्रातील आहे. हा प्रकल्प विदर्भातील खारपाणपट्ट्यातील असून बळीराजा जलसंजीवनी योजने (BJSY) अंतर्गत समाविष्ट आहे. या प्रकल्पामुळे अकोला तालुक्यातील काटी, पाटी, किनखेड, केळीवेळी, रोहणा वडद या ६ गावातील १८०० हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातल्या कोरडवाहू भागाला नवसंजीवनी मिळणार आहे. त्यातून अकोला हे जलसंपन्न व शेतीक्षम क्षेत्र म्हणून विकसित होईल.

या प्रकल्पाला महामंडळाने १४ जुलै २००९ मध्ये ६४.३२ कोटी रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता दिली होती. ही मान्यता दरसूची २००८-९ वर आधारित होती. पण त्यानंतर या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी काहीच कारवाई करण्यात आली. तत्कालीन सरकारच्या उदासीनतेमुळे त्यावेळच्या राज्यपालांनी १० मार्च २०१५ रोजी दिलेल्या निर्देशानुसार सर्व सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार संबंधित पाटबंधारे विकास महामंडळांना दिले. त्यानंतर महामंडळाने तांत्रिक बाबींची चर्चा करून ऑगस्ट २०२३ मध्ये सरकारकडे या प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव पाठवला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री म्हणून निर्णय घेत, याची पहिली ४५४.६२ कोटी रुपयांची सुप्रमा मान्य केली.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1932755193499881799

बार्शिटाकळीत १२ मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत बार्शीटाकळी तालुक्यातील भेंडीमहाल (१० मेगावॅट) आणि रेडवा (२ मेगावॅट) या दोन सौर प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या दोन्ही प्रकल्पांमुळे बार्शी टाकळी तालुक्यातील दगड पारवा, कान्हेरी, रेडवा, धाबा बार्शीटाकळी, पातूर, महागाव, बहिरखेड, घोटा नंदापूर, महान आदी गावातील २,५९५ शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा आणि पूर्ण दाबाने वीजपुरवठा होणार आहे. भेंडीमहाल प्रकल्पासाठी ४५ कोटी रुपये तर रेडवा गावातील सौद प्रकल्पासाठी ९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील सौरऊर्जा क्षेत्राने महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमात १६,००० मेगावॅट विकेंद्रित सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट घोषित केले.

नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालयाच्या इ्मारतीचे भूमिपूजन

अकोल्यात नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय महायुती सरकारने १६ मे २०२३ च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. या महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या पदांना अंतर्गत आणि बाहेरून भरती करण्यासाठी मान्यता दिली होती. त्यासाठी सरकारने एकूण ३१६.६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यातील २४९.४१ कोटी रुपयांचा निधी इमारतीच्या बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन, अद्ययावत व सुसज्ज इमारतीचे लोकार्पण यावेळी केले. तसेच महिला व बालविकास भवनाचे लोकार्पण केले. या दरम्यान, त्यांनी स्वागत कक्ष, हिरकणी कक्ष, आनंदी कक्ष याची पाहणी केली. तसेच नागरिकांसाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी तयार केलेली किऑस्क सुविधेची पाहणी केली. त्यानंतर अकोला शहरात अमृत 2.0 योजनेंतर्गत ६२९.०६ कोटी रुपयांच्या मलनि:सारण (टप्पा १) प्रकल्पाचे काम, तसेच शहरात प्रधानमंत्री ई-बस सेवा योजने अंतर्गत १८.९९ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या ई-बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन केले. तसेच अकोला तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामाचा कोनशिला समारंभ, अकोला शहरात १५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत सांस्कृतिक भवनाच्या बांधकामाचा कोनशिला समारंभ, त्याचबरोबर साधारण १० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या ऑलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावाच्या बांधकामाचा कोनशिला समारंभ, तसेच अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात १५१.५६ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नवीन वार्डच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कर्तव्यदक्ष पोलिसांसाठी निवासाची सोय

अकोल्यातील दक्षता नगर येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता १२९.२३ कोटी निधीतून २४६ घरे बांधण्यात येणारआहे. तसेच इथल्या परिसराचा विकासदेखील केला जाणार आहे. २४ तास कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांसाठी यामुळे निवासाची सोय होणार आहे. हायब्रीड ॲन्युइटी कार्यक्रमांतर्गत मुर्तिजापूर-दहीगाव-गुडधी-उमरी-अकोला राज्य महामार्ग २८४, अकोला-मलकापूर-कानशिवनी-मोरगांव काकड-बोरगांव खुर्द या जिल्ह्यातील प्रमुख महामार्गाच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यासाठी ४१०.१० कोटी रुपये निधी देण्यात आला. त्याचप्रमाणे अकोटमधील रावेर, पातूर्डा, पिंपळगाव, खांडवी, जळगाव जामोद हिवरखेड अकोट या मार्गावरील (रंभापूर ते हिवरखेड ते वारखेड भागापर्यंतच्या रस्त्याची सुधारणा हायब्रीड ॲन्युइटी कार्यक्रमांतर्गत केली जाणार आहे. यासाठी ३११.४४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्याचबरोबर अकोला शहर आणि अकोट शहरात ९ कोटी रुपये खर्च करून सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

अकोला जिल्ह्यात २६०० कोटी रुपयांच्या विकासनिधीतून पायाभूत सोयीसुविधा उभारण्याबरोबरच अकोल्याच्या प्रगतीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. जलसंपदा, आरोग्य, शिक्षण, ऊर्जा, पोलिसांसाठी घरे, शहरातील कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही, शहरातील मल:निस्सारण आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी यंत्रणा निर्माण करून इथल्या लोकांच्या जीवनमानात सुधारण घडवून आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सेवक देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे सुरू आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *