गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील सुनील पुंगाटी(Sunil Pungati) या सतरा वर्षांच्या मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण त्यांच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची असल्याने सुनीलच्या आईने आपले मंगळसूत्र विकून हॉस्पिटलमध्ये १ लाख रुपये जमा केले. पण उपचारासाठी आणखी पैशांची गरज होती. बिकट अशा आर्थिक कोंडीत सापडलेल्या सुनीलच्या आई-वडिलांची परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी याची तात्काळ दखल घेत सुनीलवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून उपचार करण्याचे आदेश दिले. देवेंद्र फडणवीस यांच्यातील हा संवेदनशीलपणा मानवगाथेचे दर्शन घडवतो.
राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपल्यातील संवेदनशीलतेचे आणि माणुसकीचे दर्शन घडवले आहे. गडचिरोलीतील भामरागड या अतिदुर्गम भागात राहणारा सुनील पुंगाटी गंभीर आजारी पडला होता. त्याच्या आई-वडिलांनी चांगल्या उपचारांसाठी त्याला गडचिरोलीहून नागपूरमधील खाजगी हॉस्पिटमध्ये आणले. पण तिथला उपचार खर्च महागडा होता. सुनीलच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची आहे. तरीही आईने मुलाच्या उपचारासाठी आपले मंगळसूत्र विकले. त्यातून मिळालेले काही पैसे, तसेच उरलेले पैसे व्याजाने घेऊन एक लाख रुपये हॉस्पिटलमध्ये भरले. उपचारांसाठी पैशांची वेळोवेळी गरज लागेल म्हणून सुनील आई-वडील उपाशी राहून पै-पै वाचवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्याकडे खाण्यासाठीही पैसे शिल्लक राहिले नव्हते. त्यात हॉस्पिटलकडून आणखी पैसे भरण्याचा निरोप आला. त्यावेळी सुनीलच्या आई-वडिलांना काहीच सुचत नव्हते. एकीकडे मुलाचा जीव वाचावा यासाठी धडपड सुरू होती. तर दुसरीकडे पैशांची सोय होत नव्हती म्हणून चलबिचल होत होती. सुनील पुंगाटीच्या आजारपणाबद्दल आणि त्याच्या आई-वडिलांचे पैशांविना होत असलेल्या हालाखीची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका मॅसेजद्वारे समजली. तेव्हा त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर यांना सरकारी योजनेतून सुनीलवर उपचार सुरू करण्याचे निर्देश दिले.
सुनील रमेश पुंगाटी (वय १७, रा. हितापाडी ता. भामरागड, जि. गडचिरोली) याला २५ जानेवारी रोजी ताप आला होता. त्याचा ताप काही केल्या कमी होत नव्हता. त्यामुळे त्याची तब्बेत अजून खालावली. दरम्यान, सुनीलचा ताप डोक्यात गेल्याने त्याची अवस्था अजून गंभीर झाली. त्यामुळे सुनीलचे वडील रमेश पुंगाटी यांनी त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला नेले. नागपूरच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू केले. तेथे त्याच्यावर आतापर्यंत लाखभर रुपये खर्च झाले होते. इतके पैसे पुंगाटी कुटुंबाकडे नव्हते. पण सुनीलच्या आईने आपले मंगळसूत्र विकून काही पैसे मिळवले. तर काही पैसे रमेश यांनी व्याजाने घेऊन हॉस्पिटलमध्ये भरले होते. पण हॉस्पिटलकडून अजून पैसे भरण्याची मागणी होऊ लागली. अधीच खचून गेलेल्या सुनीलच्या आई-वडिलांची आता तर पायाखालची जमीनच सरकली होती. त्यांना काय करावे सुचत नव्हते. मुलाचा जीव वाचवण्यासाठी या आई-वडिलांनी आपल्याकडे होते नव्हते ते सर्व पैसे हॉस्पिटलमध्ये भरले होते. त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी दोन-तीन दिवस काही खाल्ले देखील नव्हते. अशा परिस्थितीत पैसे कोठून आणि कसे आणायचे असा प्रश्न त्यांना पडला होता. शेवटी सर्व बाजुंनी कोंडी झालेल्या निराश झालेल्या रमेश पुंगाटी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपल्या मुलाला वाचवण्याची विनंती केली.
रमेश पुंगाटी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सर्व परिस्थिती मांडली. त्यांनी त्यात लिहिले होते की, ‘माझा मुलगा व्हेंटिलिटरवर आहे. तो वाचेल की नाही माहित नाही. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. पण आता आमच्याकडे पुढील उपचारासाठी पैसे शिल्लक नाही. त्यामुळे आमच्या जिल्ह्याच पालकमंत्री म्हणून माझ्या मुलाचे पालकत्व स्वीकारा आणि त्याला यातून बरे करण्यासाठी मदत करा.’, अडचणीत सापडलेल्या एका वडिलाची आर्त हाक ऐकून, त्यांनी लिहिलेली परिस्थिती वाचून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर यांच्याशी चर्चा करून सुनीलवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून उपचार करून घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार रामेश्वर यांनी सुनीलच्या आई-वडिलांशी संपर्क साधून सुनीलवर नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून मोफत उपचार सुरू केले आहेत.
मंगळसूत्र विकून भरलेले पैसे परत मिळणार!
सुनीलला चांगल्या उपचारासाठी नागपूरच्या खाजगी रुग्णालयात नेताना त्याच्या आई-वडिलांनी बरेच खटाटोप करून कसेबसे लाखभर रुपये हॉस्पिटलमध्ये भरले होते. सुनीलच्या आईने पैशांची गरज भागवण्यासाठी स्वत:चे मंगळसूत्र विकले. तरीही अजून पैसे लागणार होते. तेव्हा सुनीलच्या वडिलांनी व्याजाने पैसे घेऊन ते हॉस्पिटमध्ये भरले होते. पण आता हे भरलेले लाखभर रुपये सुनीलच्या आई-वडिलांना पुन्हा दिले जाणार आहेत. सुनीलच्या उपचारांचा संपूर्ण खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून केला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या मदतीमुळे सुनीलच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सुनीलच्या उपचारासाठी फक्त आर्थिक मदत केली नाही. तर त्यांनी एक जबाबदार नेता काय असतो आणि त्याने अशा परिस्थितीत काय निर्णय घ्यायला हवा. याचे उदाहरण लोकप्रतिनिधींसमोर ठेवले आहे. ही मदत, ही तत्परता देवेंद्रजींनी दाखवलेल्या माणुसकीची होती. त्यांनी फक्त सुनीलच्या उपचारावर मदत करण्यापुरते सीमित न राहता, सुनीलच्या आईने विकलेले मंगळसूत्र त्यांना पुन्हा मिळवून देण्याची जबाबदारीही घेतली. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार हॉस्पिटमध्ये भरलेले १ लाख रुपये त्यांना परत करण्याचे आदेश देण्यात आले. सुनीलचा संपूर्ण खर्च आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून केला जात आहे. देवेंद्रजींच्या या निर्णयामुळे फक्त सुनीलवर उपचार नाही झाले तर संपूर्ण कुटुंबावर आलेला ताण, झालेल्या वेदना यावर काही प्रमाणात मलमपट्टी झाली आहे. देवेंद्रजींनी वेळोवेळी गरजू व्यक्तींसाठी तत्परता दाखवून आपल्यातील मानवतेचे दर्शन घडवले आहे. अशा कृतींमधूनच नेत्याचे ‘लोकेनेते’पण दिसून येते.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य कक्ष – हात मदतीचा, आपल्या देवाभाऊचा
२०१४ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात वैद्यकीय सहाय्यता कक्षाची स्थापना केली. या कक्षाच्या माध्यमातून गरजुंना लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात. यामुळे लाखो गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळाली आहे. पूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजुंना मंत्रालयात यावे लागत होते. त्यात अनेकवेळा कागदपत्रांची पूर्तता, प्रशासकीय प्रक्रिया आणि मंत्रालयातील गर्दी यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल व्हायचे. त्यांचा बराचसा वेळा या प्रक्रियेत जात होता. तो कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या कक्षाच्या माध्यमातून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना अत्यावश्यक आर्थिक मदत मिळणार आहे. यामुळे गरजू रुग्णांना जिल्हा पातळीवरच सहकार्य उपलब्ध होणार आहे.
इतर लेख: