२०१४ ते २०१९ या कालावधीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून राबवलेल्या विविध विकासकामांमुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून आला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या १०५ जागा निवडून आल्या आणि याची मागील वर्षाच्या निवडणुकीतील जागांशी तुलना करायची झाली तर या निवडणुकीत भाजपाचा स्ट्राईक रेट ७० टक्के राहिला आहे. जो २०१४ मध्ये ४७ टक्के होता. यावरून देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मिळवलेल्या यशाचे गमक कळेल.
२०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये जागा कमी पण स्ट्राईक रेटमध्ये वाढ – BJP Strike Rate in Maharashtra
२०१४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष वैयक्तिक पातळीवर निवडणुकांना सामोरा गेला होता. त्यावेळी पक्षाने साधारण २६० जागांवर उमेदवार दिले होते. त्यातील १२२ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. तर यावेळी म्हणजे २०१९ मध्ये भाजपाने युती म्हणून निवडणूक लढवली. त्यामध्ये भाजपाच्या वाट्याला १५० अधिक १४ मित्र पक्ष असे एकूण १६४ जागा आल्या होत्या. त्यातील भाजपाचे १०५ जागांवर आमदार निवडून आले. सलग दुसऱ्यांदा शंभरचा आकडा गाठणे १९९० नंतर आतापर्यंत कोणत्याही पक्षाला जमले नव्हते. पण भाजपाने मात्र दुसऱ्यांदा १०० चा आकडा पार करून पक्षाची ताकद राज्यात वाढल्याचे दाखवून दिले. भारतीय जनता पक्षाला २०१९ च्या निवडणुकीत १ कोटी ४१ लाख ९९ हजार ३७५ मते मिळाली. हा विजय २०१४ च्या विजयापेक्षा मोठा विजय मानला जातो. कारण मागच्या निवडणुकीत भाजपाने २६० जागा लढवून १२२ जागा जिंकल्या होत्या. तर यावेळी १६४ जागा लढवून १०५ जागा जिंकल्या आहेत. लढवलेल्या जागांच्या तुलनेत जिंकलेल्या जागांची तुलना केली असता यावेळी पक्षाला अधिकचे यश मिळाले आहे. विजयाचा हा स्ट्राईक रेट जवळपास ७० टक्के राहिला आहे. त्याचबरोबर ज्या पक्षाचे सरकार सलग ५ वर्षे राहिले आहे. त्या पक्षाला आगामी निवडणुकीत इतके चांगले यश आतापर्यंत इतर कोणत्याही पक्षाला मिळालेले नाही. ५ वर्षे सत्तेत राहिलेल्या पक्षाच्या विरोधात अॅण्टी इन्कम्बसी असण्याची शक्यता असते. पण ती या निवडणुकीत दिसली नाही. जरी भाजपाच्या जागा मागल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी झालेल्या असल्या तरी यामध्ये विरोधी पक्षाच्या जागांमध्ये वाढ दिसून येत नाही. पक्षांतर्गत आणि महायुतीत काही ठिकाणी बंडखोरी झाल्यामुळे या जागा कमी झाल्याचे दिसून येते. तसेच ज्या उमेदवारांनी बंडखोरी केली होती. ते पक्षाशी संबंधित असल्याने त्यांनी भाजपाला पाठिंबा दर्शवला आहे.
सलग दुसऱ्या टर्ममध्ये १०० हून अधिक जागा – 2019 Maharashtra Elections Bjp Seats
२०१९ ची विधानसभा निवडणूक ही भारतीय जनता पक्षासाठी खूपच महत्त्वाची ठरली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत भाजपाने सलग दुसऱ्या टर्ममध्ये शंभरहून अधिक आमदार निवडून आणून मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व सिद्ध झाल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्षांनी वैयक्तिक पातळीवर निवडणुका लढवल्या होत्या. पण निकालानंतर भारतीय जनता पक्षाने स्थापन केलेल्या सरकारमध्ये शिवसेना पक्ष नंतर सहभागी झाला होता. या परिस्थितीनंतर २०१९ च्या निवडणुकांना सामोरे जाताना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी युती म्हणून ही निवडणूक लढवली. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी झालेल्या निवडणुकांचे निकाल २४ ऑक्टोबर २०१९ रोजी जाहीर झाले. यात भाजपा १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. भाजपा पुन्हा एकदा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना युतीचे सरकार येणार हे विजयी जागांवरून दिसून येत होते.
उमेदवारांच्या तुलनेत मतांची टक्केवारी वाढली
२०१४ च्या निवडणुकीत भाजपाने वैयक्तिक २६० जागा लढवल्या होत्या. त्यावेळी पक्षाचे १२२ आमदार निवडून आले होते आणि मतांची टक्केवारी होती २७.८१ टक्के. तर दुसरीकडे २०१९ मध्ये भारतीय जनता पक्ष युतीमध्ये १६४ जागा लढल्या. त्यातील १०५ जागांवर विजय मिळाला आणि मतांची टक्केवारी होती २५.७५ टक्के. २०१९ मध्ये पक्षाने जिंकलेल्या जागा पाहता २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये पक्षाची टक्केवारी कमी झाल्याचे दिसून येते. पण हे एवढेच सत्य नाही. कारण २०१४ मध्ये भाजपाने वैयक्तिक जास्तीच्या जागा लढवून उमेदवारांच्या तुलनेत ३१.१५ टक्के मते मिळवली होती. ती २०१९ मध्ये तुलनेने कमी जागा लढवूनदेखील उमेदवारांच्या तुलनेत ४४.५१ टक्के मते मिळवली. म्हणजेच २०१९ मध्ये भाजपाचे उमेदवार कमी असूनही त्यांचा स्ट्राईक रेट (BJP Strike Rate in Maharashtra) वाढल्याचे दिसून येते. २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या फक्त ३ उमेदरावारांचे डिपॉझिट जप्त झाले. म्हणजे या या तीन जागांवर पक्षाला अपेक्षित अशी मते मिळाली नाहीत. २०१४ मध्ये पक्षाला अशाप्रकारे जवळपास ४९ ठिकाणी कमी मते मिळाली.
शहरी आणि निमशहरी भागात भाजपाला चांगले यश
२०१९ च्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष युती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. तरीही या दोन्ही पक्षांना अंतर्गत बंडखोरीचा मोठा फटका या निवडणुकीत बसल्याचे दिसून येते. बंडखोरीमुळे भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना ३० जागांवर फटका बसला आहे. तसेच बंडखोरी केलेल्या उमेदवारांपैकी साधारण १२ उमेदवार निवडून आले आहेत. असे असूनही भाजपाने राज्यातील बऱ्याच विभागांमध्ये चांगले यश मिळवले आहे. विशेषत: शहरी आणि निम-शहरी भागात भाजपाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विदर्भामध्ये एकूण ६२ जागा आहेत. त्यातील २९ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. या निकालावरून विदर्भातील देवेंद्र फडवणीस यांची लोकप्रियता दिसून येते. तसेच त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शेतकऱ्यांबाबत आणि विकासाच्या निर्णयाचे विदर्भवासियांनी चांगले स्वागत केले.
मुंबई आणि पुण्यासारख्या शहरी भागातही भाजपाला अपेक्षित यश मिळाले. मुंबईतील एकूण ३६ जागांपैकी १५ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर पुण्यातील ११ जागांपैकी ९ जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले. यावरून हेच दिसून येते की, शहरातील मध्यमवर्गीय आणि व्यापारी मतदार हा पूर्णपणे विकासाच्या बाजूने असून त्यांनी भाजपाला संधी दिली. उत्तर महाराष्ट्रातील ३६ जागांपैकी १८ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत; तर मराठवाड्यात ४६ पैकी १३ जागांवर भाजपाला यश मिळाले. विभागनिहाय पक्षाला मिळालेल्या विजयाचे विश्लेषण करायचे झाल्यास मराठवाड्यात भाजपाला काही स्थानिक मुद्द्यांवरून कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते.
देवेंद्रजींच्या नेतृत्वाला महाराष्ट्राचा सकारात्मक कौल
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या दरम्यान राबवलेले सुप्रशासन आणि विकासात्मक धोरणामुळे राज्यातील जनतेने पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या नेतृत्वाला प्रतिसाद देत भाजपाच्या १०५ जागा जिंकून दिल्या. देवेंद्रजींनी मुख्यमंत्री म्हणून अनेक महत्त्वाच्या विषयांना हात घातला. प्रशासनातील मरगळ झटकण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना ठरावीक मुदतीत त्यांचे काम पूर्ण करून घेण्याचा लोकसेवा अधिकार मिळवून दिला. मुंबईमध्ये मेट्रोचे जाळे निर्माण केले. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सुरू केले. मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण मिळवून दिले. जलयुक्त शिवार सारख्या योजनेतून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय घेतला. या सर्व प्रकल्पांमुळे राज्यात देवेंद्रजींची प्रतिमा विकासप्रेमी मुख्यमंत्री म्हणून निर्माण झाली. त्यामुळे जनतेने पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनाच कौल दिला.
२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजप एक मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा निवडून आला. भारतीय जनता पक्षाने १०५ जागा जिंकत आपल्या स्ट्राईक रेटमध्ये वाढ करत पक्षाची लोकप्रियता आणि संघटन कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित केले. सर्वांत मोठा पक्ष म्हणून अधिकच्या जागा जिंकूनही भाजपाला राज्यातील राजकीय घडामोडींमुळे विरोधी पक्षात बसावे लागले. जनतेने दिलेल्या सकारात्मक निकालानंतरही देवेंद्रजींनी पक्ष आदेशाचा सन्मान करत विरोधी पक्षनेते पद स्वीकारले. त्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा एकदा पक्षाचा आदेश प्रमाण मानून राज्याचे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले.